बहुप्रतीक्षित पर्यावरणानुकूल टेस्ला कार यंदा भारतीय रस्त्यांवर धावण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये इलेक्ट्रिक कार निर्माण करणारी टेस्ला ही नामांकित कंपनी आहे. या कंपनीची मॉडेल ३ सेदान कार भारतीय बाजारात यंदा दाखल होणार आहे. या कारचे बुकिंग वर्षभरापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीने आता ही कार भारतात सादर करण्याचे संकेत दिले आहेत. टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एल. एन. मस्क यांनी यंदा उन्हाळ्यात ही कार भारतात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
मॉडेल ३ सेदान कारची किंमत सुमारे २४ लाख रुपये आहे. कारचे उत्पादन २0१७ अखेरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र बुकिंग मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आले होते. ही कार २0१८ साली भारतात येईल, कारण कंपनी सर्वप्रथम ही कार अमेरिकेतील बाजारात आणणार आहे. त्यानंतर ती इतर देशांमध्ये पाठवण्यात येईल. तसेच ५७ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या मॉडेल एस आणि मॉडेल एक्स या कार देखील भारतीय बाजारात सादर करण्यता येणार आहेत. मागील वर्षी टेस्ला कंपनीने ७६२३0 कार विकल्याची माहिती जानेवारी महिन्यात दिली होती. मात्र कंपनीचे उद्दिष्ट ८0 हजार कार विकण्याचे होते. देशातील महानगरांमध्ये प्रदूषण वाढत असल्यामुळे शून्य उत्सर्जन असलेल्या विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.