Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किरण मानेंची नवी फेसबुक पोस्ट, 'माझ्याविरोधात मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू'

Kiran Mane's new Facebook post
, रविवार, 16 जानेवारी 2022 (13:59 IST)
फेसबुकरील राजकीय पोस्टमुळे 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप अभिनेते किरण मानेंनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातूनही स्टार प्रवाह वाहिनीविरोधात आवाज उठू लागलाय. त्यातच किरण माने यांनी फेसबुकवरूनच आपली भूमिका अधिक स्पष्ट करत, नव्या घडामोडींचे संकेत दिलेत.
आज  किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, "आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू."
"आज मीडियावाले सेटवर जाणार आहेत. अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे. करुद्या आरोप ,जाऊद्या झाडून, ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. प्रॉडक्शन हाऊसविरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे. चारेक संघविचारी खरोखर माझ्याविरोधात आहेत. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते 'सत्य' सांगतीलच!"
"पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा! मी बी कंबर कसलेली हाय. कच्च्या गुरूचा चेला नाय मी! तुका म्हणे रणी... नये पाहो परतोनी!"
 
'मालिकेचं शूटिंग बंद नाही'
दरम्यान, मुलगी झाली हो मालिकेचं शूटिंग सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या गुळुंब ग्रामपंचायचीने थांबवल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.
 
मात्र चित्रीकरण थांबवलं नसल्याचं या मालिकेचे लाइन प्रोड्युसर सचिन ससाणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं
त्यांनी सांगितलं की, सरपंचांच्या त्या पत्रानंतर गावाची बैठक झाली. एका व्यक्तीच्या म्हणण्यावरून गावचा रोजगार बुडायला नको अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. गावकऱ्यांनी कलाकारांचं देखील म्हणणं ऐकलं आणि शुटिंगला परवानगी दिली.
 
किरण माने यांना राजकीय पोस्टमुळे नाही, तर त्यांच्या वर्तनामुळे काढून टाकण्यात आल्याचंही ससाणे यांनी स्पष्ट केलं.
 
"सेटवरती स्वतःच्या बाजूने डायलॉग लिहून घेणं, सिरीयलचा ट्रॅक बदलून टाकणं अशा गोष्टी त्यांनी केल्या. दिग्दर्शकाला ते उलट बोलायचे. फेसबुकवरच्या माने यांच्या पोस्टबाबत आणि कामातील गैरवर्तनाबद्दल त्यांना तीन वेळा वॉर्निंग देण्यात आली होती. तरीही शूटिंग बंद पडावं म्हणून राजकीय दबाव त्यांनी तयार केला," असं सचिन ससाणे यांनी सांगितलं.
 
किरण मानेंना पाठिंबा
अभिनेत्री अनिता दाते यांनी किरण माने यांना पाठिंबा दिलाय. अनिताने पोस्टमध्ये म्हटलंय की, "एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने ह्यांच्या बाजूने आहे.
 
"कोणत्याही अभिनेत्याला / अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे हे चुकीचे आहे . अशा निर्मिती संस्था आणि चॅनल ह्यांनी त्या कलाकाराला कामा वरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अशा व्यवस्थांचा मी निषेध करते.
 
व्यवस्था समजून घेणे ,व्यवस्थेला प्रश्न विचारणे, आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीने मांडता येणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे असच मी मानते. त्या बाबत किरण माने ह्याचे कौतुक आहे. एखादया व्यक्तीची पोस्ट समजून घेण्या ऐवजी त्याची गळचेपी करणे हे चुकीचे आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो,चर्चा करू शकतो.. मात्र त्याचं तोंड बंद करणे, त्याला धमकावणे, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचे लक्षण आहे. "
राजकीय वर्तुळातूनही किरण मानेंना पाठिंबा मिळताना दिसतोय.
त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी किरण मानेंच्या पाठीशी असल्याचं सांगितलंय.
याआधी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या वादाच्या पहिल्याच दिवशी किरण मानेंना पाठिंबा दिला होता.
 
हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे?
स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत 'विलास पाटील' ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आलं आहे.
 
किरण माने हे विविध मुद्द्यांवर फेसबुकवर राजकीय भूमिका घेतात, या कारणामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
किरण माने यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्टदेखील लिहिली आहे. फेसबुकवरील पोस्टमध्ये माने म्हणतात, 'काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा...गाड दो, बीज हू मैं, पेड बन ही जाऊंगा !'
किरण यांना काढून टाकण्यात आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या समर्थनार्थ 'आय स्टॅण्ड विथ किरण माने' हा हॅशटॅग ट्विटर आणि फेसबुकवर सुरु केला आहे.
 
किरण माने यांच्या फेसबुक पोस्ट चर्चेत आल्या होत्या. ते राजकीय पोस्ट लिहित असल्याने त्यांना अनेक धमकीचे मेसेज येत असल्याचे देखील त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते. फेसबुकवर त्यांनी अनेकदा राजकीय भूमिका घेतली होती.
 
किरण माने यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.
 
माने म्हणाले होते, ''काल शूटिंग संपल्यानंतर मला प्रॉडक्शन हाऊसकडून फोन आला. तुम्हाला आम्ही रिप्लेस करतोय, तुम्ही उद्यापासून या मालिकेत काम करणार नाही. काही लोक तुमच्यावर नाराज आहेत असं त्यांनी मला सांगितलं. चॅनेलमध्ये काम करणाऱ्या एका मित्राने सांगितलं की, एका महिलेने तुम्ही राजकीय पोस्ट करता म्हणून तुमच्या विरोधात तक्रार केली आहे.''
 
''अभिनेता म्हणून माझं काम पाहायला हवा. मी कधीही असुविधांबाबत प्रॉडक्शनला तक्रार केली नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करत होतो. ते सर्व बाजूला ठेवून मी फेसबुकला काय लिहितो, यावरुन मला कसं काय काढता येऊ शकतं. फेसबुकवर मी पुरोगामी विचार मांडतो. तुकारामांचे अभंग घेऊन ते आजच्या काळाशी जोडून त्याचे निरुपन करतो. ते विरुद्ध विचारांच्या लोकांना झोंबतं. मला अनेकदा ट्रोल करण्यात आलं. मला अर्वाच्य शिवीगाळ देखील करण्यात आली.''
यासंदर्भात बीबीसी मराठीने मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई यांच्याशी संपर्क केला. सुरुवातीला त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. परंतु त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
घई म्हणाल्या, ''माने यांच्या राजकीय भूमिकेचा आणि त्यांना काढून टाकण्याचा काही संबंध नाही. माने यांना रिप्लेस करण्याचा निर्णय हा प्रोफेशनल होता. काही प्रोफेशनल कारणं होती त्याबाबत माने यांना माहिती आहे. त्यांना त्याबाबत अनेकदा कल्पना देखील दिली होती. त्यांना अनेकदा सूचना देऊनही त्या कारणांचे समाधान न झाल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.''
 
किरण माने यांना काढून टाकण्याची घटना समोर आल्यानंतर काहींनी किरण माने हे देखील असभ्य भाषेत रिप्लाय करत असल्याचे स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केले. त्याबाबत विचारले असता माने म्हणाले, ''मला नाठाळपणे कोणी बोलत असेल तर मी तशाच पद्धतीने उत्तर देतो. मी कुठल्याच पोस्टमध्ये असभ्य भाषा वापरली नाही.''

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Happy Birthday Siddharth Malhotra :सिद्धार्थ मल्होत्रा ​​आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे