Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

‘मन फकीरा’ ६ मार्च रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

‘मन फकीरा’ ६ मार्च रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
, गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (16:02 IST)
‘मन फकीरा’ हा रोमँटिक ड्रामा प्रख्यात मराठी अभिनेत्री मृण्मयी प्रतिभा देशपांडे हिने लिहिला असून तीच या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन हे कलाकार प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहेत. या सिनेमाचा नुकताच संगीत अनावरण सोहळा मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला. ‘नात्यांचा खरा अर्थ सांगणारा’ हा सिनेमा आता ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन फकीरा’ हा मृण्मयी देशपांडेचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला पहिलाच चित्रपट आहे.  
 
या संगीत अनावरण सोहळ्यासाठी दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन हे कलाकार उपस्थित होते. त्याशिवाय, संगीत दिग्दर्शक व गायक सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे आणि यशिता शर्मा हेदेखील उपस्थित होते. या संगीत सोहळ्याचे मृण्मयी देशपांडे आणि सुव्रत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या संगीत सोहळ्यात या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक व गायक सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रींगारपुरे, यशिता शर्मा, गौतमी देशपांडे, निकिता गांधी या सर्व गायकांनी वाद्यवृंदाच्या साथीने ‘मन फकीरा’ चित्रपटातील मन फकीरा, घरी गोंधळ, सांग ना, समथिंग इज राईट अश्या या चार बहारदार सुरेख गाण्यांची प्रात्यक्षिक जेमिंग मैफिल रंगवली यामध्ये सिनेमाचे कलाकार सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन देखील सामील झाले. त्याचबरोबर सुव्रत जोशीने मधुचंद्राच्या पहिल्या रात्री जोडप्यांमध्ये नक्की काय गंमती–जमंती होतात यावर पोट धरून हसवणारे स्टॅन्ड-अप कॉमेडी सादर केले, या सिनेमाची गाणी वैभव जोशी, क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून आली आहेत. या कार्यक्रमादरम्यान वैभव जोशी यांच्या काही प्रेमावरील रंगतदार कविता चित्रफीत रूपात दाखवण्यात आल्या. अश्या या धमाकेदार, बहारदार आणि वेगळा सादरीकरण असलेला संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला. 
 
     “या सिनेमाची गाणी खूप वेगळ्या धाटणीची आहेत. ही सर्वच गाणी श्रवणीय झाली आहेत. मला आंतरराष्ट्रीय पातळीवरची आणि आजच्या तरुण पिढीला आवडतील अशी गाणी हवी होती. सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल यांनी अशाच पद्धतीची खूप उत्तम दर्जाची  गाणी ‘मन फकीरा’साठी रचली आहेत. ‘मन फकीरा’ हे गाणे इतके श्रवणीय झाले आहे की ते प्रेक्षकांच्या तोंडी बसेल. वैभव जोशी आणि क्षितिज पटवर्धन यांनी या सिनेमाची गाणी लिहिली आहेत. नुकतेच या सिनेमाचे नवीन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून या चित्रपटाच्या गाण्यांनादेखील तसाच प्रतिसाद मिळेल, असा मला विश्वास आहे,” मृण्मयी देशपांडेने म्हटले.
 
“मला आणि सिद्धार्थ महादेवनला या चित्रपटाची गाणी ही आजच्या तरुण पिढीला आवडतील अशी तयार करायची होती. या सिनेमामध्ये चार गाणी आहेत आणि चारही गाणी तरुण पिढीला नक्कीच आवडतील. ही सर्व गाणी सिनेमाच्या कथेला चांगल्याप्रकारे पुढे घेऊन जातात. आम्हाला ‘मन फकीरा’ करताना खूप आनंद मिळाला आणि त्याचे सर्व श्रेय आम्ही सिनेमाच्या दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे हिला देतो. मृण्मयीचा लेखन आणि दिग्दर्शन केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळेदेखील अधिकच मजा आली. या सिनेमाची सर्व गाणी प्रेक्षकांना आवडतील असा आम्हाला विश्वास आहे,” असे मत चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक सौमिल शृंगारपुरे यांनी मांडले.
 
‘फ्रेम्स प्रॉडक्शन’ कंपनीचे हेमंत रूपरेल, रणजीत ठाकूर आणि ‘स्मिता फिल्म प्रॉडक्शन्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी यांची आहे. हा सिनेमा ६ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'आरआरआर'साठी मानधन घेण्यास अजचा नकार