मोहन जोशी आणि अश्विनी एकबोटे अभिनित 'मिस यु मिस' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. कधी कधी लहानांकडून सुद्धा खूप काही शिकता येते. आपल्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती देखील आपल्याला आयुष्यभर लक्षात राहणारा विचार शिकवून जातात. याच ओळीवर आधारित असणारा 'मिस यु मिस' सिनेमा येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. आई वडिलांच्या नात्याला अधिक घट्ट करतात, ती त्यांची मुलं. जेव्हा ही मुलंच आपल्या आई वडिलांचे पालक होतात तेव्हा नक्की काय घडते? आणि प्रत्येक नात्यात आवश्यक असणारा 'समतोल' जीवनात कसा सांभाळायचा? याचे उत्तम चित्रण आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. भावनाप्रधान आणि मनाला स्पर्शून जाणारी कथा या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. अहंकार आणि स्वाभिमान यात अदृश्य अशी एक रेष असते. ही रेष आपण कळत- नकळत पुसली तर काय घडू शकते याचे हुबेहूब दर्शन या सिनेमातून प्रेक्षकांना होणार आहे.
शाम निंबाळकर दिग्दर्शित 'मिस यु मिस' या सिनेमाची निर्मिती सुनील रघुनाथ महाडिक, क्षमा हिप्परगेकर, रोहनदीप सिंग आणि श्री ओमकार वर्षा प्रकाश गायकर, भास्कर चंद्रा यांनी केली आहे. जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, ग्रे कॅट प्रोडक्शन, आर. एस. महाडिक प्रोडक्शन आणि क्षमा एंटरटेनमेंट निर्मित 'मिस यु मिस' या चित्रपटामध्ये मोहन जोशी, अश्विनी एकबोटे, तेजस्वी पाटील, भाग्येश देसाई आणि किशोर नांदोस्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.