Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुलोचना चव्हाण यांना व्ही. शांताराम जेव्हा म्हणाले, 'तुला भुताने झपाटलंय का गं?

Webdunia
शनिवार, 10 डिसेंबर 2022 (22:17 IST)
ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं आज (10 डिसेंबर) निधन झालं आहे.सुलोचनाबाईंनी 60 पेक्षा अधिक वर्षे आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी गायलेल्या लावण्यांची जादू कित्येक वर्षांनी आजही कायम आहे.मराठी विश्वकोशमधील माहितीनुसार, सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 साली मुंबईत झाला होता. त्यांचं माहेरचं नाव सुलोचना महादेव कदम असं होतं. त्यावेळी त्या सुलोचना कदम किंवा के. सुलोचना या नावाने ओळखल्या जायच्या.
 
वयाच्या 10 व्या वर्षी आपली गायन कारकीर्द सुरू करणाऱ्या सुलोचना यांना लग्नापूर्वीच सी. रामचंद्र, मोहम्मद रफी, मन्ना डे यांच्यासारख्या अनेक दिग्गज गायकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
 
पुढे 12 ऑगस्ट 1953 साली सुलोचना चव्हाण यांचा विवाह दिग्दर्शक श्यामराव चव्हाण यांच्यासोबत झाला. त्यानंतर त्यांना सुलोचना चव्हाण या नावाने ओळखलं जाऊ लागल्या.
 
'सांभाळ गं दौलत लाखाची' गाण्याचा प्रभाव
दूरदर्शनच्या वलयांकित कार्यक्रमात सुलोचना चव्हाण यांनी तेजस्विनी भोंजाळ यांना मुलाखत दिली होती.
 
सुलोचना चव्हाण यांचा जन्म लावणी तसंच नाट्य-कला क्षेत्राशी संबंधित असलेल्या कुटुंबातच झाला होता.
 
त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली याविषयी बोलताना सांगितलं,
 
आमच्या घरचंच काम असल्यामुळे त्या तालमी, गाणी ही नेहमी कानावर पडायची. त्यामुळे हळूहळू मला घरातच गाण्यांचं शिक्षण मिळालं.
आमच्या घरात वत्सला कुमठेकरांची एक रेकॉर्ड होती- 'सांभाळ गं दौलत लाखाची'.
 
का कुणास ठाऊक, आपल्यामध्ये एक म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे मला ते गाणं प्रचंड आवडायचं.
 
ते फड लावलं की आमची आई म्हणायची की ते आधी बंद कर, कारण त्यातील शब्द चांगले नाहीत. पण मला ते खूप आवडायचं.
 
पहिलं गाणं हिंदीत
गाण्याच्या या आवडीमुळे अगदी लहान वयात सुलोचना चव्हाण यांना गाण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 10 वर्षे.
 
त्या म्हणतात, “लहानपणी उर्दू नाटक लैला मजनूमध्ये मी छोट्या लैलाची भूमिका करायचे. तसंच चांदबीबी नाटकात अंजुमनची भूमिका करायचे. गुजराती नाटकात एका बालविधवेची भूमिका मी केली होती. त्यावेळी आमचे मेकअपमन दांडेकर हे होते. त्यांनी माझा आवाज ऐकून शामसुंदर पाठक यांच्या चित्रपटात गाण्यासाठी नेलं.
 
मी त्यावेळी परकर-पोलकाच वापरायचे. पाठक यांनी माझा आवाज ऐकला आणि पहिल्यांदा मला दोन डान्सची गाणी दिली.
 
‘मैं तो सो रही थी, बन्सी काहे को बजाई’ हे तिथे माझं पहिलं गाणं होतं. सुरुवात झाल्यानंतर पाठकबाबू यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात मला गाण्याची संधी दिली.
 
म्हणजेच मराठी लावणी क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या गायनाची सुरुवात ही हिंदी चित्रपटातून झाली होती.
 
त्यांनी पुढे गझलही गायले. त्यांनी सुरुवातीला गाणं गायलेल्या हिंदी चित्रपटांची संख्या 70 च्या आसपास आहे.
 
पहिली लावणी
सुलोचना चव्हाण यांनी रंगल्या रात्री अशा या मराठी चित्रपटात पहिल्यांदा लावणी गायली.
 
खरं तर इथूनच त्यांचा प्रवास प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखराच्या दिशेने सुरू झाला.
त्या सांगतात, “मी खरं तर मूळ हिंदीची कलाकार होते. सुरुवातीला एका ठिकाणी मी दोन मराठी लावण्या गायल्या होत्या. त्यानंतर माझ्या नवऱ्याने कलगीतुरा कार्यक्रमही सुरू केला होता. त्याठिकाणी म्हटलेली लावणी ऐकून वसंत पवार यांनी मला पहिली लावणी दिली.
 
जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ‘मला हो... म्हणत्यात लवंगी मिरची’ ही माझी पहिली लावणी. ती इतकी लोकप्रिय झाली, की त्या लावणीच्या बळावर मला अनेक पुरस्कार मिळाले.
 
पतीकडून लावणीचे धडे
वलयांकित कार्यक्रमात तेजस्विनी भोंजाळ यांनी म्हटलं, “या गाण्यासाठी सुलोचना चव्हाण यांनी कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती. नंतर मात्र लावणी कशी गावी, याचीही एक रित आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. ही रित त्यांना शिकवली त्यांच्या पतीने.
 
पती श्यामराव चव्हाण यांना ते केवळ चव्हाण असं म्हणून संबोधत असत.
त्याविषयी बोलताना सुलोचनाबाई म्हणतात, “मी गात असताना चव्हाण हे रेकॉर्डिंग रुममध्ये बसायचे. माझं गाणं जरा काही खटकलं की ते मला येऊन सांगायचे, सुले, हा शब्द असा सोड, या शब्दाची फेक अशी कर...मग हळूहळू मला सवय होत गेली. चव्हाण यांच्यामुळेच मला लावणीचा किताब मिळाला.”
 
माईकची भीती कधीच नाही
सुलोचना चव्हाण यांनी संगीताचं तालीम कधीच घेतलं नव्हतं. माईकचं तंत्र किंवा ध्वनी मुद्रण यांचं शिक्षणही त्यांनी कधीच घेतलं नाही. पण तरीसुद्धा त्यांना माईकची भीती कधीच वाटली नाही.
 
त्या म्हणतात, “मला माईकची भीती कधीच वाटली नाही. मी दहा वर्षांची असताना कृष्ण-सुदामाचं गाणं मी गायलं. इतर गाण्यांचं रेकॉर्डिंग सुरू असताना मी झोपी गेले होते. माझ्या गाण्यावेळी मला त्यांनी उठवलं.
 
"त्यावेळी स्टुडिओत स्टँडवर मोठे गोळे ठेवलेले असत. मला सांगितलं गेलं की गाणं चुकायचं नाही, चुकलं की हे गोळे डोक्यावर मारतात. त्यावेळी तंत्रज्ञानही इतकं प्रगत नव्हतं. चुकलं की फिल्म वाया जायची. त्यामुळेच की काय मला माईकसमोर आल्यानंतर काहीही वाटायचं नाही."
 
'तुला भुताने झपाटलंय का गं?'
त्यावेळी एका चित्रपटातील सगळी गाणी सुलोचनाबाई एका दिवसात रेकॉर्ड करत असत.
 
सकाळी 10 वाजता रेकॉर्डिंगला गेल्यानंतर रात्री 10 पर्यंत दहा-अकरा गाण्यांचं रेकॉर्डिंग केलं जायचं. काहीच वाटायचं नाही.
 
एकदा तर मल्हारी-मार्तंडचं रेकॉर्डिंग संपलं. त्यावेळी व्ही. शांताराम स्टुडिओमध्ये आले.
 
त्यांनी रेकॉर्डिस्ट मंगेश देसाई यांना विचारलं, किती गाण्यांचं रेकॉर्डिंग झालं?
 
देसाई उत्तरले, ‘दहा गाण्यांचं झालं.’
 
यावर शांताराम बापूंनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले,
 
“सुलोचना, तुला भुताने झपाटलंय का गं? अगं एका दिवसात दहा-दहा गाणी गायची?
 
मी म्हटलं, “हो आण्णा, मी गाते. दहा गाण्यांची एक कॅसेट मी एका दिवसातच गाते.”

Published By-  Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

पुढील लेख
Show comments