Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

upcoming Marathi film Vama-Ladhai Sanmanachi
, शुक्रवार, 16 मे 2025 (16:35 IST)
स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडतो. एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील लढा, तिच्या स्वाभिमानाची लढाई आणि त्या संघर्षातून निर्माण झालेला तिचा आत्मविश्वास हे सारं या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात स्त्रीच्या सन्मानाची, अस्तित्वाची व स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळेल. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली असून दोन वेगळ्या धाटणीची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 
 
महाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ या जबरदस्त गाण्याला वैशाली सामंत यांचा दमदार आवाज व सुचिर कुलकर्णी यांचे कमाल संगीत लाभले आहे. तर गाण्याचे बोल तरंग वैद्य यांचे आहेत. आकर्षक सादरीकरण आणि उत्साही संगीताने हे गाणे सध्या सर्वत्र हिट ठरत आहे. तर 'वामा- लढाई सन्मानाची' या प्रेरणादायी गाण्यात कैलास खेर यांच्या जोशपूर्ण आवाजाने अधिकच रंगत आणली आहे. मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रिजू रॉय यांनी संगीत दिले आहे. 
 
 दिग्दर्शक अशोक आर. कोंडके म्हणतात," ‘ही कथा केवळ महिलांची व्यथा सांगणारी नसून तिच्या आत्मविश्वासाने पुन्हा उभे राहाण्याच्या ताकदीची आहे. यातून आम्ही एक सामाजिक संदेश, सामाजिक जबाबदारी आणि विचारक्रांतीचा आरंभ करण्याचा प्रयत्न केला आहे. 'वामा - लढाई सन्मानाची' चित्रपटात हिंसाचारासोबतच भावनिक प्रवासावरही लक्ष केंद्रित केले आहे. एक सामान्य स्त्री जेव्हा अन्यायाविरोधात आवाज उठवते तेव्हा समाजात परिवर्तन घडवण्याचे बळही तिच्यात आपसूकच येते. हेच या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.''
 
चित्रपटाचे निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात," ‘महिला सशक्तीकरणावर आधारित या चित्रपटात मनोरजंन तर आहेच याशिवाय समाज परिवर्तनाचा संदेशही यातून देण्यात आला आहे. मला असे वाटते 'वामा- लढाई सन्मानाची' या चित्रपटामुळे प्रेक्षकांची मानसिकता बदलण्यास नक्कीच मदत होईल. जेव्हा प्रेक्षक सशक्त स्त्रीची भूमिका पडद्यावर पाहातात, तेव्हा त्यांच्या मनात महिलांविषयी आदर आणि समतेची भावना निर्माण होते आणि म्हणूनच आम्ही हा चित्रपट खास प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. हा चित्रपट केवळ महिलांसाठी नसून संपूर्ण समाजाला स्त्री-पुरुष समानतेचे महत्व पटवून देणारा आहे.''
 
 ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून येत्या २३ मे रोजी 'वामा- लढाई सन्मानाची' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी त्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार