Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लता मंगेशकर यांनी मोहम्मद रफींना 'मी महाराणीच आहे' असं का सुनावलं होतं?

Why did Lata Mangeshkar tell Mohammad Rafi that 'I am Maharani'? Marathi  Cinema News  Webdunia Marathi
, मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (09:36 IST)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज (28 सप्टेंबर) वाढदिवस. लतादीदींनी केवळ भारतीय पार्श्वगायन क्षेत्रातच आपली मोहोर उमटवली नाही तर चाहत्यांच्या हृदयावरदेखील त्यांनी अधिराज्य केलं आहे.
 
बीबीसी एशिया नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचे अनेक पैलू उलगडून दाखवले. त्या मुलाखतीवर आधारित हा लेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.
 
लतादीदींचं बालपण
लतादीदींना गाण्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. मास्टर दिनानाथ मंगेशकर म्हणजे मराठी नाट्य-संगीतातलं मोठं नाव.
 
लतादीदी सांगतात, "घरात संगीताचंच वातावरण असायचं. आई गायची नाही. पण तिला गाणं समजायचं. वडील तर सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच तानपुरा घेऊन बसायचे.
एकदा एका शिष्याला ते गाणं शिकवत होते. संध्याकाळी त्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागलं, तर त्यांनी त्या मुलाला रियाज करायला सांगितलं.
मी बाल्कनीत बसून त्याचं गाणं ऐकत होते. त्याला म्हणाले, "तू ही बंदीश चुकीची गात आहेस. ही अशी गातात. मी त्याला ती बंदीश कशी गातात, हे दाखवलं. इतक्यात वडील आले आणि मी तिथून पळाले. त्यावेळी मी चार-पाच वर्षांची होते. तो मुलगा गेल्यावर बाबा आईंना म्हणाले, गायक इथे घरी आहे आणि मी परक्यांना शिकवतोय."
 
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता वडिलांनी लतादीदींना तानपुरा दिला आणि तिथून या गानसम्राज्ञीच्या गाण्याची सुरुवात झाली.
 
कौंटुबिक आठवणी
आयुष्यभर संगीताची सेवा करणाऱ्या लतादीदींनी लग्न केलं नाही. याबद्दल त्या म्हणतात, 'ते राहून गेलं...'
त्या सांगतात, "घरातील प्रत्येकाची जबाबदारी माझ्यावर होती. अशात अनेक वेळा लग्नाचा विचार मनात आला तरी ते करू शकले नाही. खूप कमी वयात मी काम सुरू केलं. कामही भरपूर होतं. वाटलं लहान भावंडांना मार्गी लावावं, मग विचार करू. त्यानंतर बहिणीचं लग्न झालं. त्यांना मुलं झाली. त्यांना सांभाळायची जबाबदारी होती. आणि मग असं करतंच वेळ निघून गेली."
 
वडिलांच्या मृत्यूनंतर लतादीदींनीच त्यांच्या संपूर्ण घराची जबाबदारी उचलली होती. "मात्र आपण कठोर कधीच नव्हतो," असं त्या सांगतात."भावंडांसाठी मी आई आणि वडील दोन्ही भूमिका पार पाडल्या. मी त्यांना कधीच रागावले नाही. आमच्यामध्ये कधीच भांडण झालं नाही. सांगलीत आम्ही मोठ्या घरात राहायचो. आमच्या वडिलांनी ते घर बांधलं होतं," असं त्या सांगतात.
 
लहानपणीच्या आठवणी
लतादीदी लहानपणी फार खोडकर होत्या. या खोडकर स्वभावामुळे कधीकधी आईच्या हातचा मारही बसायचा.
त्या सांगतात, "आईने मारल्यावर मला राग यायचा आणि मी रागात आपले कपडे एका गाठोड्यात बांधून म्हणायचे मी जाते घर सोडून. मी खरंच घरातून निघून जायचे. घराजवळ एक तळं होतं. मी त्यात पडेल की काय म्हणून आईला भीती वाटायची आणि ती घरच्या गड्यांना मला बोलवायला पाठवायची."एकदा अशीच घर सोडून जात होते. बाल्कनीत बाबा होते. ते म्हणाले, "आम्ही तुला खूपच त्रास देतो ना. जा, जा तू घर सोडून. वडील असं म्हणत होते आणि मी मागे वळून वळून बघत होते, कुणी घ्यायला का येत नाही म्हणून.."
 
किशोर कुमारांची पहिली भेट
40च्या दशकात दीदींनी सिनेमांसाठी गाणं सुरू केलं तेव्हा त्या घरून मालाडपर्यंत लोकलनं जायच्या. स्टेशनवरून बॉम्बे टॉकीज स्टुडिओपर्यंत त्या पायी जायच्या.
 
वाटेत किशोरदाही भेटायचे. मात्र त्यावेळी दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. किशोरदा त्यांच्याकडे बघायचे, कधी हसायचे. कधी हातातली छडी फिरवत बसायचे.
एक दिवस किशोर कुमार मागे-मागे थेट स्टुडियओपर्यंत गेले. त्यावेळी लतादीदी प्रकाश खेमचंद यांच्या सिनेमात गाणं गात होत्या.
 
त्यांनी खेमचंद यांनाच सांगितलं, "हा मुलगा माझा पिच्छा करतो आणि मला बघून हसतो." तेव्हा खेमचंद यांनी सांगितलं की हा अशोक कुमारांचा लहान भाऊ आहे. अशाप्रकारे दोघांची ओळख झाली आणि दोघांनी त्या सिनेमात पहिल्यांदा एकत्र गाणं गायलं.
 
मोहम्मद रफींशी भांडण
लता दीदींनी 60च्या दशकातच आपल्या गाण्यांसाठी रॉयल्टी घ्यायला सुरुवात केली होती. मात्र त्यांना वाटायचं सर्वच गायकांना रॉयल्टी मिळाली पाहिजे.त्या सांगतात, "मी, मुकेश भैय्या आणि तलत मेहमूद आम्ही असोसिएशन स्थापन केली आणि रेकॉर्डिंग कंपनी एचएमव्ही आणि निर्मात्यांकडे गायकाला रॉयल्टी मिळाली पाहिजे, अशी मागणी केली. मात्र कुणीही ते मान्य केलं नाही. तेव्हा या सर्वांनी एचएमव्हीसाठी गाणंच बंद केलं."
"त्यावेळी निर्माते आणि रेकॉर्डिंग कंपनीने मोहम्मद रफींना समजावलं, हे गायक का भांडत आहेत. त्यांना गाण्याचे पैसे मिळतात. मग त्यांना रॉयल्टी कशासाठी पाहिजे. रफी भैय्या भोळे होते. ते म्हणाले, मला रॉयल्टी नको. त्यामुळे आम्हा सर्व गायकांच्या या मोहिमेला धक्का बसला," अशी आठवण त्या सांगतात.
 
"त्यानंतर मुकेशजींनी सांगितलं म्हणून सर्व गायक रफी साहेबांना भेटले आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. याचा मोहम्मद रफींना राग आला."ते म्हणाले, "मला काय विचारता. ही महाराणी बसली आहे तिलाच विचारा." त्यांच्या या वाक्याने लतादीदींनाही राग आला.
 
त्या म्हणाल्या, "बरोबर बोललात तुम्ही. मी महाराणीच आहे." तर रफी आणखी भडकले. म्हणाले, "मी तुझ्यासोबत कधीच गाणार नाही." तर लतादीदीही म्हणाल्या, "तुम्हाला तसदी घ्यायची गरज नाही. मीच तुमच्याबरोबर गाणार नाही." त्यानंतर लतादीदींनी अनेक संगीतकारांना फोन करून सांगितलं की त्या रफींसोबत गाणार नाहीत. हे भांडण तीन-साडे तीन वर्ष चाललं.
 
अजून आठवतो तो काळ
लतादीदी सांगतात, "त्या काळच्या सर्वच नट्यांसोबत माझी चांगली मैत्री होती. नर्गिस दत्त, मीना कुमारी, वहिदा रहमान, साधना, सायरा बानो सगळ्यांसोबत माझे जवळचे संबंध होते. दिलीपसाहेब मला छोटी बहीण मानत. नव्या लोकांमध्ये मला काजोल आणि राणी मुखर्जी आवडतात."
 
लतादीदी सांगतात, "आम्ही काम सुरू केलं तो काळ कठीण होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाण्यासाठी पळावं लागायचं. उन, वारा, थंडी, पाऊस कशाचीच तमा न बाळगता फिरावं लागायचं. मात्र जे काम करायचो, त्यात खूप समाधान मिळायचं. गाण्यांवर मेहनत घ्यायचो. त्यामुळे गाणी आवडायची. मुकेश भैय्या फारच सज्जन होते आणि किशोर कुमार तर कमालच. त्यांचे किस्से सांगायला बसले तर हसून हसून तुमचं पोट दुखेल."
लतादीदींनी पार्श्वगायन सुरू करण्याआधी काही सिनेमांमध्ये भूमिकाही केल्या आहेत.कधी हिरोची बहीण तर कधी हिरोईनची... छोट्या-छोट्या भूमिका त्यांनी केल्या. मात्र त्यांचं मन रमलं ते गाण्यातच.काम करून आल्यावर वडिलांसोबत रियाज करायच्या. सहगल त्यांना फार आवडायचे. दिवसरात्र घरात फक्त सहगलची यांचीच गाणी.
 
1942मध्ये पार्श्वगायनाच्या दुनियेत त्यांनी पाय ठेवला आणि मग मागे वळून कधी पाहिलंच नाही. सिनेसृष्टी शंभर वर्षांची झाली आहे आणि त्यातली 70 वर्षं लतादीदींच्या गाण्यांनी सजली आहे आणि या गाण्यांची जादू तर येणाऱ्या शेकडो वर्षांपर्यंत कायम राहणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेकअप करायचे की ह्यांचे दात बघायचे