Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मियांदादच्या कुटुंबाच्या आग्रहामुळे पाकिस्तानला मिळाले दोन 'हिंदू' लेगस्पिनर

मियांदादच्या कुटुंबाच्या आग्रहामुळे पाकिस्तानला मिळाले दोन 'हिंदू' लेगस्पिनर
, मंगळवार, 17 जानेवारी 2023 (23:10 IST)
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण सोबतच भारताच्या फाळणीमुळे जगाच्या नकाशावर दोन देश अस्तित्वात आले, एक म्हणजे भारत आणि दुसरा म्हणजे पाकिस्तान. या फाळणी दरम्यान हजारो लाखो लोक निर्वासित झाले. बरीच मुस्लिम कुटुंब भारतातून पाकिस्तानात गेली तर हजारो हिंदू कुटुंब पाकिस्तानातून भारतात आली.
 
या स्थलांतरितांमध्ये कला, साहित्य, खेळ विश्वातले दिग्गज लोक सुद्धा होते.
 
अशाच स्थलांतरितांमध्ये होते वजीर, हनीफ, मुस्ताक, सादिक मोहम्मद हे मोहम्मद बंधू. क्रिकेटविश्वात मोहम्मद बंधूंची नावं प्रसिद्ध होती. हे गुजरातमधल्या जुनागडचे रहिवासी होते. जुनागड सोडून ते पाकिस्तानात गेले.
 
पण या फाळणीच्या वेळी काही हिंदू कुटुंबं सुद्धा पाकिस्तानात स्थलांतर झाली असल्याचा अंदाज आहे.
 
अशाच स्थलांतरित हिंदू कुटुंबांपैकी होते कनेरिया कुटुंब आणि सोनवरिया कुटुंब. या दोन्ही कुटुंबांनी गुजरातहून पाकिस्तान गाठलं.
 
आणि मियांदाद यांच्या सांगण्यावरून ही दोन हिंदू कुटुंबे पाकिस्तानात स्थलांतरित झाली होती.
 
झालं असं होतं की, पाकिस्तानचे फलंदाज जावेद मियांदाद यांचे वडील गुजरातमधील पालनपूरचे रहिवासी होते आणि 1940 च्या दशकात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते.
 
पुढे भारत आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आल्यावर भारतातील मुस्लिम कुटुंबांनी पाकिस्तानची वाट धरली. यात मियांदाद यांचंही कुटुंब होतं. त्यावेळी मियांदाद यांचे शेजारी आणि त्यांच्या वडिलांचे खास मित्र दलपत सोनावरिया यांनी सुद्धा पाकिस्तानला यावं म्हणून मियांदाद यांच्या वडिलांनी आग्रह धरला. सोबत प्रभाशंकर कनेरिया यांच्या कुटुंबालाही आग्रह केला.
 
त्यावेळी भारतातील हिंदू कुटुंबांनी पाकिस्तानात जाणं म्हणजे कठीण मानलं जायचं. पण मियांदाद यांच्या वडिलांनी या कुटुंबांना संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं.
 
जावेद मियांदाद यांच्या वडिलांचा मान राखून ही दोन्ही गुजराती कुटुंबं पाकिस्तानात जाऊन कराचीत स्थायिक झाली.
 
आज या गोष्टीला 75 वर्षांहून अधिकचा काळ लोटलाय.
 
पाकिस्तानात स्थायिक झाल्यानंतर या हिंदू कुटुंबांनी तिथल्या उपक्रमांमध्ये आणि विशेषतः क्रिकेटमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली.
 
1955 मध्ये जन्मलेल्या जावेद मियांदाद यांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये चार चांद लावले. आणि मियांदाद यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे पाकिस्तानला अनिल दलपत आणि दानिश कनेरिया हे दोन हिंदू क्रिकेटपटू मिळाले.
 
1963 साली सोनावरिया कुटुंबात अनिल दलपत यांचा जन्म झाला. अनिल दलपत हे दानिश कनेरियाला सिनियर होते. 1983-84 दरम्यान अनिल दलपत यांनी पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट संघात यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळवलं.
 
असं म्हटलं जातं की, जावेद मियांदाद यांचा अनिल दलपत यांच्यावर वरदहस्त असल्यामुळे त्यांना पाकिस्तानी संघात स्थान मिळालं होतं.
 
आणि अनिलने कॅच सोडला....
1985 सालच्या मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये बेन्सन हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट (मिनी वर्ल्ड कप) आयोजित करण्यात आली होती. यात अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते.
 
मेलबर्न मध्ये मॅच सुरू होती. यावेळी इम्रान खानच्या एका बॉलवर अनिल दलपतने कॅच सोडली आणि विकेट गमावली. विकेट घेता न आल्याने भारताची पब्लिक खुश झाली मात्र इम्रान खान चांगलाच संतापला होता.
 
यावेळी इम्रान खानचा राग क्लोज-अप कॅमेरा अँगलमध्ये कैद झाला होता.
 
त्यावेळी अशी चर्चा होती की, दलपत मियांदादचा 'माणूस' असल्याने इम्रान खान आणखीन जास्त चिडला होता.
 
आता या चर्चा खऱ्या असल्या किंवा नसल्या तरी, हे बाकी तितकंच खरं होतं की, अनिल दलपत सोनावरियाला पाकिस्तानी संघात सामील करून घेण्यासाठी मियांदादने शिफारस केली होती.
 
अनिल दलपत प्रमाणेच त्याचा जवळचा नातेवाईक असलेल्या दानिश कनेरियाला सुद्धा पाकिस्तानच्या संघात प्रमुख खेळाडू म्हणून स्थान मिळालं होतं.
 
अनिल दलपतची क्रिकेट कारकीर्द अल्पायुषी ठरली. त्यांनी पाकिस्तानसाठी फक्त 9 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले.
 
पण त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या कराची व्हाईट्स आणि कराची ब्लूजसाठी 137 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्यांनी 430 विकेट्स (307 कॅच, 123 स्टम्पिंग) घेतल्या होत्या.
 
मात्र दानिश कनेरियाची क्रिकेट कारकीर्द चांगलीच बहरली.
 
अब्दुल कादिर यांच्यानंतर पाकिस्तानचा सर्वोत्तम लेगस्पिनर म्हणजे दानिश कनेरिया. त्याने पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामने खेळले आणि यात 261 विकेट्स घेतल्या.
 
पाकिस्तानी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये वसीम अक्रम, वकार युनूस आणि इम्रान खान यांच्यानंतर दानिश कनेरियाचा चौथा क्रमांक लागतो.
 
पाकिस्तानचा दिग्गज लेग-स्पिनर अब्दुल कादिरने 236 विकेट्स घेतल्या होत्या. कनेरियाने कादिरपेक्षा सहा कसोटी सामने कमी खेळले, पण कादिरचा 236 विकेट्सचा रेकॉर्ड पण मोडला. साधारण 2000 ते 2001 साली दानिश कनेरिया 20 वर्षांचा असताना त्याने इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
 
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला फारशी कमाल दाखवता आली नाही. मात्र त्याचवर्षी पाकिस्तान संघाने बांगलादेशचा दौरा केला होता. या पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात त्याने अशी काही धडाकेबाज गोलंदाजी केली की त्याची गाडी परत रुळावर आली.
 
बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या ढाका कसोटीत सामन्यात त्याने पहिल्या इनिंग मधल्या सहा विकेट्स धरून एकूण आठ विकेट्स घेतल्या.
 
त्यानंतर चितगाव इथं पार पडलेल्या कसोटी सामन्यात दानिशने 11 विकेट घेत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
 
त्यावेळी कनेरियाबद्दल असं म्हटलं जायचं की, तो फक्त एखाद्या सामान्य संघांविरुद्धचं चांगली खेळी करू शकतो. पण त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 34 विकेट तर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्धही 34 विकेट घेतल्या.
 
असं म्हटलं जातं की, भारतीय उपखंडातील संघांना स्पिनर्सचा तसा त्रास होत नाही. पण कनेरियाने भारताविरुद्ध 43 आणि श्रीलंकेविरुद्ध 36 विकेट घेऊन या दोन्ही संघांना घाम फोडला होता.
 
त्याचप्रमाणे, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 36, वेस्ट इंडिजविरुद्ध 28 विकेट्स घेतल्या.
 
मेलबर्न आणि सिडनीच्या खेळपट्ट्या त्याने विशेष गाजवल्या. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात एकूण 34 विकेट घेतल्या होत्या.
 
पाकिस्तानी संघाविषयी असं म्हटलं जातं की, त्यांना त्यांच्या मायदेशात पार पडलेल्या सामन्यांमध्ये जास्त यश मिळतं. पण कनेरियाचं तसं नव्हतं, त्याने पाकिस्तानात 109 विकेट घेतल्या आहेत तर 152 विकेट इतर देशांच्या खेळपट्ट्यांवर घेतल्या.
 
पाकिस्तानने जेवढे कसोटी सामने जिंकले आहेत त्यात कनेरियाने घेतलेल्या एकूण विकेट्स 120 आहेत. तर जे सामने अनिर्णित राहिलेत त्यातली कनेरियाच्या विकेटची संख्या 64 आहे.
 
राहुल द्रविड, शिवनारायण चंद्रापॉल आणि मार्क बाऊचर यांना कसोटी सामन्यात बाद करणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट असायची. पण कनेरियाने चंद्रापॉलची विकेट एकदा दोनदा नव्हे तर सहा वेळा घेतलीय. तर द्रविड आणि बाउचरला त्याने पाच वेळा आउट केलंय.
 
याशिवाय जॅक कॅलिस, हाशिम आमला आणि ग्रॅम स्मिथ यांच्या सुद्धा विकेट पडल्या.
 
जेव्हा परिस्थिती सामान्य असते तेव्हाही पाकिस्तानला जायचं म्हटल्यावर संकोच वाटेल. पण 1947 साली झालेल्या फाळणीच्या काळात कनेरिया कुटुंबाने पाकिस्तानला जायचा घेतलेला निर्णय पथ्यावर पडला आणि पाकिस्तानी संघाला दानिश कनेरिया सारखा हिरा गवसला.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राच्या जीआरमध्ये हिंदीचा 'राष्ट्रभाषा' असा उल्लेख; राज्यभरातून होतेय टीका gr photo