Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बीसीसीआयचं महिला खेळाडूंना 'दिवाळी गिफ्ट', समान मॅच फीमुळे समानता येईल का?

Webdunia
गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (19:21 IST)
जान्हवी मुळे
भारतातल्या महिला क्रिकेटला नवं बळ मिळालं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गुरुवारी (27 ऑक्टोबर 2022 रोजी), महिला खेळाडूंना समान वेतन देण्याविषयी महत्त्वाची घोषणा केली.
 
जय शहा यांनी ट्वीट केलं आहे की भारताच्या 'करारबद्ध महिला खेळाडूंना' आता पुरुष खेळाडूंइतकीच मॅच फी (एका सामन्यासाठीचं वेतन) मिळणार आहे.
 
विषमता दूर करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे 'पहिलं पाऊल' असल्याचं सांगत ते म्हणाले की भारताच्या "महिला आणि पुरुष खेळाडूंना आता समान मॅच फी दिली जाईल, भारतीय क्रिकेटमध्ये लिंगसमानतेच्या एका नव्या युगात आपण जातो आहोत."
 
दहा दिवसांपूर्वीच बीसीसीआयनं वार्षिक सभेमध्ये पुढील वर्षी महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगचं (WIPL) आयोजन करणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर शहा यांनी ही घोषणा केली आहे.
 
सध्या भारताच्या महिला क्रिकेटर्सना प्रत्येक वन डे आणि ट्वेन्टी२० सामन्यासाठी 1 लाख रुपये तर प्रत्येक कसोटीसाठी 4 लाख रुपये एवढी मॅच फी दिली जात होती.
 
पण आता त्यांनी भारताच्या पुरुष क्रिकेटर्सएवढी, म्हणजे एका कसोटीसाठी 15 लाख रुपये, एका वन डे साठी 6 लाख रुपये आणि एका ट्वेन्टी20 मॅचसाठी 3 लाख रुपये एवढी रक्कम वेतन म्हणून मिळेल.
 
साहजिकच, महिला खेळाडूंना खूप मोठी पगारवाढ मिळणार आहे, जो एक ऐतिहासिक निर्णय ठरावा. खेळात आणि समाजातही समानतेच्या दृष्टीनं सामन वेतन हे महत्त्वाचं पाऊल मानलं जातं.
 
ऐतिहासिक निर्णयावर खेळाडूंच्या प्रतिक्रिया
भारताच्या आजी-माजी महिला क्रिकेटर्सनी या निर्णयाचं मनापासून स्वागत केलं आहे.
 
भारताच्या माजी कर्णधार आणि बीसीसीआयच्या माजी प्रशासन समितीतील सदस्य डायना एडलजी यांनी हा निर्णय म्हणजे महिला खेळाडूंसाठी 'दिवाळी गिफ्ट' असल्याची भावना बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे.
 
"बीसीसीआयच्या घोषणेमुळे मला अतिशय आनंद झाला आहे. मी जय शहा यांचे तसंच बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बोर्डाच्या कार्यकारिणीचे आभार मानते.
 
"त्यांनी महिला क्रिकेटर्सना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. ते महिला खेळाडूंची दखल घेत आहेत हे पाहून खरंच खूप बरं वाटलं."
 
डायना पुढे म्हणाल्या, "पुढच्या वर्षी महिलांच्या आयपीएलचंही आयोजन होणार असून भारतीय महिलांनी आता उंच झोका घेतला आहे. त्यांच्या कामगिरीचं हे फळ आहे. मला खरंच वाटतं की आता भारतीय महिलांनी बीसीसीआयला परतफेड म्हणून आयसीसीची ट्रॉफी (वर्ल्ड कप) जिंकायला हवी."
 
भारताची माजी कर्णधार मिताली राजनं ट्विटरवरून आपला आनंद व्यक्त केला. "हा भारतातल्या महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक निर्णय आहे. समान वेतन आणि पुढच्या वर्ष होणारी महिलांची आयपीएल यांमुळे आपण भारतातल्या महिला क्रिकेटच्या नव्या युगात पाऊल टाकतो आहोत. जय शहा सर आणि बीसीसीआयचे आभार, आज खरंच खूप आनंदात आहे."
 
2022 सालच्या महिला विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश झालेल्या यस्तिका भाटियानंही या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.
 
'पिक्चर अभी बाकी हैं'
बीसीसीआयचं हे समान वेतन धोरण सध्या बोर्डाचं रिटेनर काँट्रॅक्ट मिळवणाऱ्या म्हणजे बोर्डासोबत वर्षभरासाठी करार केलेल्या खेळाडूंपुरतं मर्यादित आहे. या कराराचा विचार केला, तर भारतात महिला क्रिकेटर्सना अजूनही पुरुष क्रिकेटर्सपेक्षा खूपच कमी पैसे मिळतात.
 
हा करार मॅच फीपेक्षा वेगळा असतो.
 
दरवर्षी भारताकडून खेळणाऱ्या खेळाडूंची कामगिरी आणि अनुभवाच्या अधारे काही श्रेणींमध्ये विभागणी केली जाते आणि त्यानुसार त्यांना आधी निश्चित केलेली रक्कम दिली जाते. खेळाडू काही सामन्यांत खेळू शकले नाहीत किंवा त्यांची निवड झाली नाही तरी या रकमेत काही बदल होत नाही.
 
सध्या भारताच्या महिला खेळाडूंची ग्रेड ए, बी, आणि सीमध्ये विभागणी करण्यात आली आहे आणि त्यांच्याशी बीसीसीआयनं प्रत्येकी अनुक्रमे रु. 50 लाख, रु. 30 लाख आणि रु. 10 लाख एवढ्या रकमा देऊन करार केले आहेत.
 
याउलट पुरुष क्रिकेटर्सची चार ग्रेड्समध्ये विभागणी झाली आहे. ग्रेड ए प्लसमधील प्रत्येक खेळाडूला सात कोटी, ग्रेड ए मधील खेळाडूला पाच कोटी, ग्रेड बीमधील खेळाडूला तीन कोटी आणि ग्रेड सीमधील खेळाडूला एक कोटी रुपये मिळतात.
 
सध्या पुरुषांमध्ये ग्रेड ए प्लसमध्ये तीन तर ग्रेड ए मध्ये दहा क्रिकेटर्स आहेत. तर महिला क्रिकेटमध्ये केवळ सहा जणींना ग्रेड ए करार मिळाला आहे.
 
म्हणजेच कमी महिलांना कराराचं संरक्षण मिळतंय आणि त्यांना प्रत्येक करारासाठी पुरुषांच्या तुलनेत कमी पैसे मिळतायत. महिला वर्षभरात पुरुषांपेक्षा सामनेही कमी खेळतात.
 
त्यामुळे समान मॅच फी हे एक स्वागतार्ह पाऊल असलं, तरी त्याचा इतक्यातच समानता आली, असा अर्थ लावायचा की आणखी काही करायला हवं?
 
समान वेतनाच्या बाबतीत क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत प्रगती झाली असली, तरी अजूनही ती पुरेशी नाही. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही पुरुष आणि महिला खेळाडूंना समसमान वेतन मिळत नाही. पण दोन्हीमधला फरक हळूहळू कमी होतो आहे.
 
"तुम्हाला सगळंच एका झटक्यात मिळणार नाही," असं डायना एडलजी नमूद करतात.
 
त्या बीसीसीआयच्या कमिटी ऑफ एडमिनिस्ट्रेटर्सच्या सदस्य होत्या, तेव्हा महिला क्रिकेटला समान वागणूक मिळावी यासाठी काही पावलं उचलण्यात आली होती.
 
यामध्ये महिला क्रिकेटमधल्या माजी खेळाडूंना वन-टाईम बोनस, कसोटी क्रिकेटर्सना पेन्शनची योजना आणि महिला खेळाडूंना प्रवास, हॉटेल आणि सरावासाठी पुरुष खेळाडूंसारख्याच सुविधा उपलब्ध करून देणे अशा गोष्टींचा समावेश आहे.
 
"हळूहळू आपण अशा पातळीवर येऊ जिथे महिला खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या कराराबाबतही समान विचार करावा लागेल," असं डायना सांगतात.
 
बीसीसीआय त्या दिशेनं विचार करत असल्याचं वृत्त आहे, पण समान करारापर्यंत पोहोचण्यासाठी महिला क्रिकेटला अजून बरीच मजलही मारायची आहे.
 
पुरुष क्रिकेटर्सना जास्त पैसे मिळतात यामागचं कारण म्हणजे महिला क्रिकेटच्या तुलनेत पुरुषांच्या क्रिकेटची ब्रँड व्हॅल्यू मोठी आहे आणि त्यांच्याकडे जास्त स्पॉन्सर्स येतात.
 
महिला क्रिकेटला आता कुठे बीसीसीआयनं पंखाखाली घेतलं आहे आणि चांगल्या सुविधा देऊ केल्या आहेत. महिला खेळाडूंची कामगिरी सुधारण्यात त्यामुळे निश्चितच आणखी मदत होते आहे. पण महिला क्रिकेटला चाहते आणि प्रेक्षकांकडून आणि खेळाडूंकडूनही आणखी पाठिंब्याची गरज आहे.
 
डायना सांगतात, "महिलांचं आयपीएल, ब्रॉडकास्टिंगचे करार - ही सगळी महिला क्रिकेटसाठी चांगली लक्षणं आहेत. त्यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढेल आणि चाहतेही खेळाकडे येतील. मग स्पॉन्सर्सचंही लक्ष इकडे वळेल.
 
"आपण महिला क्रिकेटचं आणि महिला क्रिकेटर्सच्या कामगिरीचं चांगलं मार्केटिंग केलं, तर या खेळाचं भविष्य उज्वल होईल असं मला वाटतं. बीसीसीआय योग्य पावलं टाकत आहे. म्हणतात ना, 'पिक्चर अभी बाकी हैं..."
 
चाहत्यांचा विचार केला, तर महिला आणि पुरुष खेळाडूंना समान पैसे मिळायला हवेत, असं भारतातल्या 85 टक्के लोकांना वाटतं, असं बीबीसीनं 2020 साली केलेल्या संशोधनातून दिसून आलं होतं.
 
भारतातल्या महिला खेळाडूंसाठी ही एक जमेची गोष्ट म्हणायला हवी.
 
इतर खेळांत काय परिस्थिती आहे?
महिला खेळाडूंना समान वेतन (प्राईझ मनी) मिळायला हवा, या मागणीला वाचा फोडण्याचं काम अमेरिकेच्या दिग्गज टेनिसपटू बिली जीन किंग यांनी 1970 च्या दशकात केलं होतं.
 
बिली जीन किंग यांच्या प्रयत्नांचा परिपाक म्हणून यूएस ओपन स्पर्धेनं पुरुष आणि महिला खेळाडूंना समान प्राईझ मनी देण्यास सुरुवात केली आणि अखेर इतर तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांनीही तेच पाऊल उचललं.
 
पण टेनिसमध्ये आजही बाकीच्या अनेक स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुषांना समान वेतन मिळत नाही. तसंच मोठ्या खेळाडूंना मिळणाऱ्या जाहिरातींच्या ऑफर्सचा विचार केला तर तिथेही पुरुष खेळाडूंना महिला खेळाडूंपेक्षा जास्त पैसे दिले जातात.
 
हॉकी आणि स्क्वॉशमध्ये समान वेतन लागू झालं आहे पण गोल्फ, बास्केटबॉल आणि फुटबॉलमध्ये अजूनही महिला आणि पुरुष खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांमध्ये मोठी विषमता आहे.
 
फुटबॉलमध्ये हा प्रश्न किती गंभीर आहे, याची जाणीव 2016 साली झाली होती, जेव्हा अमेरिकन फुटबॉलर होप सोलोनं देशातली फुटबॉल संघटना अर्थात युएस सॉकर फेडरेशनलाच कोर्टात खेचलं होतं.
 
त्या वर्षी विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभव होऊनही अमेरिकेच्या पुरुष फुटबॉल टीमला मिळालेली रक्कम ही 2014 साली विश्वचषक जिंकणाऱ्या अमेरिकेच्या महिला टीमला मिळालेल्या रक्कमेपेक्षा सात दशलक्ष डॉलर्सनं अधिक होती.
 
समान वेतनावरून वाद मिटावा म्हणून यूएस सॉकर फेडरेशननं महिला आणि पुरुष खेळाडूंना समान करार देऊ केले होते.

Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पाकिस्तान दौऱ्यासाठी बीसीसीआयला भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही?

IND vs SA: संजू सॅमसन T20 मध्ये सर्वात जलद सात हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला

भारताने दक्षिण आफ्रिकेवर 61 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments