इंग्लंड आणि ग्लॉस्टरशायरचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून मोटर न्यूरॉन आजाराने (एमएनडी) ग्रस्त होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. क्रिकेट जगतात त्यांना प्रेमाने सिड असेही म्हटले जात असे.
डेव्हिड लॉरेन्सचा जन्म 28 जानेवारी 1964 रोजी झाला. त्याने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ग्लॉस्टरशायरकडून पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला आणि लवकरच त्याच्या आक्रमक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या कारकिर्दीत, त्याने 170 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 477 बळी घेतले, ज्यामध्ये वॉरविकशायरविरुद्धच्या एका डावात 7 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर, लॉरेन्सने 1988 ते 1992 पर्यंत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. त्याने एकूण 5 कसोटी सामने खेळले आणि 18 विकेट्स घेतल्या. 1991 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध द ओव्हल येथे झालेल्या कसोटीत त्याने 5 विकेट्स घेतल्या
2023 मध्ये लॉरेन्सला मोटर न्यूरॉन आजाराचे निदान झाले, परंतु त्यांनी हार मानली नाही आणि शेवटपर्यंत धैर्याने लढा दिला. ते ग्लॉस्टरशायर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष देखील होते आणि त्यांनी ही भूमिका अत्यंत सन्मानाने आणि समर्पणाने बजावली. त्यांचे कुटुंब, पत्नी गेयनोर आणि मुलगा बस्टर यांनी सर्व चाहते आणि हितचिंतकांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि या कठीण काळात काही वैयक्तिक शांती मिळावी असे आवाहन केले आहे.