भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अश्विन यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल अश्विनला हा पुरस्कार देण्यात आला आहे. अश्विन व्यतिरिक्त, भारतीय हॉकी संघाचे माजी गोलकीपर पीआर श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वर्षी 25 जानेवारी रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, देशातील नागरी पुरस्कारांसाठी एकूण 139 प्रतिष्ठित व्यक्तींची नामांकने करण्यात आली होती - पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. यापैकी 71 जणांना 28 एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनाच्या भव्य दरबार हॉलमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वरितांना नंतर एका वेगळ्या समारंभात पुरस्कार दिले जातील.
बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आणि पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अश्विनचे अभिनंदन केले. व्हिडिओमध्ये, अश्विन राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. बीसीसीआयने पोस्टवर लिहिले - भारताच्या माननीय राष्ट्रपतींकडून प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आर. अश्विनचे अभिनंदन. हे त्याच्या उल्लेखनीय कामगिरी आणि टीम इंडियासोबतच्या त्याच्या उत्कृष्ट कारकिर्दीची ओळख आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान गाब्बा कसोटी संपताच अश्विनने निवृत्तीची घोषणा केली होती. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 765 विकेट्स घेतल्या. त्यांनी सुमारे 14 वर्षे भारतीय क्रिकेट संघाची सेवा केली. त्याने त्याच्या कारकिर्दीत 537कसोटी, 156 एकदिवसीय आणि 72 टी-20 विकेट्स घेतल्या. तो 2011 चा विश्वचषक आणि 2013 चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.