पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रविवारी विश्वचषक विजेते गॅरी कर्स्टन यांची एकदिवसीय आणि T20I साठी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी कसोटी क्रिकेटमधील भूमिका स्वीकारणार आहे. त्याच्यासोबतच पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अझहर महमूद याची सर्व फॉरमॅटमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या तिघांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे . कर्स्टन सध्या भारतात असून ते गुजरात टायटन्सचे फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत. ही लीग संपल्यानंतर लगेचच ते पाकिस्तान संघात सामील होतील. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणातच टीम इंडियाने 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता.या वर्षी टी-20 विश्वचषकाशिवाय पाकिस्तानला पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप 2025 आणि टी-20 विश्वचषक 2026 खेळायचा आहे. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान आहे, तर 2026 टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका सह यजमान असतील. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेची जबाबदारी स्वीकारणार आहे.
यानंतर पाकिस्तानला ऑक्टोबरमध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळायची आहे. पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कर्स्टन 22 मे पासून आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत. या दौऱ्यात पाकिस्तानला चार टी-20 सामने खेळायचे आहेत आणि तिथून टीम जूनमध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी प्रयाण करेल. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक संपल्यापासून पाकिस्तान मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे.अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कर्स्टन आणि गिलेस्पी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. गिलेस्पीला इंग्लिश काऊंटी संघ ससेक्समध्ये प्रशिक्षणाचा विस्तृत अनुभव आहे.