सामन्यादरम्यान सोशल मीडियावर येणेही टाळतो
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या प्रमुख गोलंदाजांचे अपयश हे कसोटी मालिकेतल्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे बिनीचे शिलेदार सपशेल अपयशी ठरले. या पराभवानंतर भारतीय फलंदाजांना चाहतंच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुजाराच्या संथ खेळावरही यादरम्यान चांगलीच टीका झाली. पण मी ट्रोलर्सची कधीच पर्वा करत नसल्याचे पुजाराने प्रसिध्दी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर कौतुक करावे म्हणून मी फलंदाजी करत नाही. अनेकांना माझी शैली समजत नाही, कारण ते मर्यादित षटकांचे क्रिकेट जास्त पाहतात. अरे हा खूप कंटाळवाणे खेळतो, किती चेंडू खेळणार आहे? अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे लोकांचे मनोरंजन करणे हे माझे ध्येय नाही. माझ्यासाठी माझा संघ विजयी झाला पाहिजे हे महत्त्वाचे आहे. मग मी सौराष्ट्रकडून खेळत असेल किंवा भारताकडून. मी परिस्थितीनुरूप खेळतो. मी शक्य तितके सोशल मीडियावर येणे टाळतो. विशेष करुन फलंदाजी करत असताना मी सोशल मीडियावर येतच नाही. पुजाराने आपली बाजू स्पष्ट केली. न्यूझीलंडमधील अपयशाबद्दल विचारले असता तो म्हणाला, दुसर्या कसोटी सामन्यादरम्यान मी ज्या पद्धतीने फटका खेळलो तो चुकीचा होता. मी शक्यतो पूलचे फटके खेळणे टाळतो, मात्र त्या क्षणी तो फटका मी कसा काय खेळलो हेच मला समजले नाही. मला आजही त्याची सल कायम आहे.
मी मैदानात एकदा स्थिरावलो की माझी विकेट सहजा-सहजी देत नाही. न्यूझीलंड दौरा आटोपल्यानंतर पुजाराने तत्काळ रणजी करंडक स्पर्धेत सहभागी होणे पसंत केले. सौराष्ट्र विरुद्ध बंगाल अंतिम सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बाजी मारली, पुजारानेही या विजयात मोलाचा वाटा उचलला.