ICC Cricket World Cup 2023 :एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची 13 वी आवृत्ती दोन दिवसांत सुरू होणार आहे. उद्घाटनाचा सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबरला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. याच मैदानावर 19 नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे डोळे लावून बसला आहे.
विश्वचषकाचे सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे स्पर्धा आहेत. या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. 10 पैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर इंग्लिश संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला.
विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार
विश्वचषक स्पर्धेत 10 संघ सहभागी होत आहेत. यजमान भारताव्यतिरिक्त श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि इंग्लंड हे संघ भाग घेत आहेत.
वर्ल्डकपचा उद्घाटन सामना 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
भारताचा पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर वर्ल्ड कप सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर चाहत्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेता येईल.