भारतीय सलामीवीर केएल राहुलने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर नवा इतिहास रचला आहे. या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी राहुलने शानदार शतक झळकावले आहे. या शतकासह राहुल क्रिकेटचा मक्का नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकावणारा 31 वर्षांत पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. राहुलने एका चौकारासह आपले शतक पूर्ण केले. 29 वर्षीय राहुलने 212 चेंडूत शतक लावले.
राहुलच्या आधी, भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक आणि माजी सलामीवीर रवी शास्त्री यांनी जुलै 1990 मध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक लावले होते. आशियाबाहेर राहुलची आता चार कसोटी शतके आहेत. आशियाबाहेर सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सुनील गावस्कर अव्वल आहेत, ज्यांच्या नावावर 15 शतके आहेत. या नंतर राहुल आहे. त्याच्या पाठोपाठ वीरेंद्र सेहवाग चार, विनू माकंड तीन आणि रवी शास्त्री तीन शतक लावणारे आहेत.