भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी जितेश शर्माचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील मालिकेतील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सॅमसनला गुडघ्याला दुखापत झाली होती. पहिल्या T20 सामन्यादरम्यान, सॅमसनला सीमारेषेजवळ चेंडू रोखण्याचा प्रयत्न करताना त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांना स्कॅनसाठी मुंबईत घेऊन गेले असून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात सॅमसन केवळ पाच धावा करून बाद झाला होता, मात्र गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. यासह भारत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. सॅमसनच्या जागी विदर्भाचा यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्माचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
जितेश शर्माने 12 आयपीएल सामन्यांच्या 10 डावात 234 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी २९.२५ इतकी आहे. त्याने 163.64 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत आणि 44 धावा ही त्याची सर्वात मोठी खेळी आहे. पंजाब किंग्जकडून जितेश शर्माने चमकदार कामगिरी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजीसाठीही तो ओळखला जातो. 29 वर्षीय जितेशने आयपीएल 2022 मध्ये पंजाबसाठी खालच्या क्रमाने स्फोटक फलंदाजी केली.
श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी सध्याच्या भारतीय संघात
हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.