न्यूझीलंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अ गटातील सामन्यात पाकिस्तानचा 54 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. अशाप्रकारे या स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानसह भारताचाही प्रवास संपला.
नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्यानंतर न्यूझीलंडने 20 षटकांत 6 गडी गमावून 110 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 11.4 षटकांत 56 धावांत गारद झाला.
हा सामना अतिशय महत्त्वाचा होता . पाकिस्तानचा विजय भारताला उपांत्य फेरीत नेऊ शकला असता. अ गटातून, ऑस्ट्रेलियाने चारही सामने जिंकून आधीच उपांत्य फेरी गाठली होती, तर दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड, भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होती. दोन सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह भारताचे चार गुण होते आणि या सामन्यापूर्वी त्यांचा निव्वळ धावगती न्यूझीलंडपेक्षा चांगला होता. जर न्यूझीलंडने हा सामना गमावला असता तर पाकिस्तान आणि भारतासह त्याचे चार गुण झाले असते.
न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव करत चार सामन्यांत तीन विजय आणि एक पराभवासह सहा गुण मिळवले आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. 2016 नंतर पहिल्यांदाच न्यूझीलंड संघाने T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक गटातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉर्जिया प्लिमर सुझी बेट्ससह न्यूझीलंडसाठी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली. या दोन्ही फलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध संघाला दमदार सुरुवात करून पॉवरप्लेदरम्यान विरोधी संघाला यश मिळू दिले नाही.