बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा हे तिरंगा न फडकावल्याप्रकरणी वादात अडकले आहेत. दुबईत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप स्पर्धेचा सामना रंगला. अटीतटीच्या लढतीत भारताने विजय मिळवला. बीसीसीआयचे सचिव तसंच आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष या नात्याने जय शहा या सामन्याला उपस्थित होते.
सामना संपल्यानंतर त्यांना तिरंगा देण्यासाठी एक व्यक्ती पुढे आला. तो व्यक्ती शहा यांना काही सांगत असल्याचं व्हीडिओत दिसतंय. जय शहा त्या व्यक्तीला तिरंगा घेण्यासाठी नाही म्हणताना दिसत आहेत. सध्या त्यांचे हे व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
काही देशांपूर्वीच झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान राबवलं होतं. सत्ताधारी भाजपतर्फे या अभियानासाठी जोरदार मोहीम हाती घेतली.
त्याचा परिणाम देशभरात पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांचे चिरंजीव आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी तिरंगा फडकवायला नकार दिल्याने विरोधी पक्षांनी टीका केली आहे.
काँग्रेसने व्हीडिओ शेअर करताना म्हटलं आहे, तिरंग्यापासून दूर राहण्याची त्यांची जुनी सवय आहे. ती लगेच कशी जाईल?
काँग्रेसने नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेवर तिरंगाविरोधी म्हणून टीका केली आहे. भाजपची भूमिका निश्चित करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका निर्णायक मानली जाते.
काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी खोचक शब्दात ट्वीट करून लिहिलं की, "माझ्याकडे बाबा आहेत. तिरंगा तुमच्याकडेच ठेवा."
राष्ट्रीय लोकदलाने व्हीडिओ शेअर करताना लिहिलं की, "संघाची परंपरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव पुढे चालवत आहेत. तिरंग्याचा आदर करण्याऐवजी ते त्याचा अपमान करत आहेत."
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही शहा यांच्यावर टीका केली आहे. अशा पद्धतीने तिरंग्याला झटकणे हा 133 कोटी जनतेचा अपमान आहे.
दरम्यान भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत शानदार विजय मिळवत दमदार सलामी दिली.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केल्यानंतर भारतीय संघाने त्यांना 19.5 षटकांत 147 धावांवर रोखलं होतं. पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत भारताने 19.4 षटकांत 5 गडी राखून विजय मिळवला.
अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तानचे 3 गडी 25 धावांच्या मोबदल्यात बाद केले. त्यासोबतच फलंदाजीतही पाकिस्तानला धक्का देत केवळ 17 चेंडूंमध्ये वेगवान 33 धावा केल्या. हार्दिकच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रविंद्र जाडेजानेही आपल्या बॅटची चमक दाखवत शेवटपर्यंत लढत दिली.
त्याने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या गड्यासाठी केलेल्या मजबूत भागिदारीमुळे भारताचा विजय दृष्टिपथात आला. जाडेजाने 28 चेंडूंमध्ये 35 धावा केल्या. तसेच विराट कोहलीनेही 34 चेंडूंमध्ये 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
तत्पूर्वी, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांच्या अचून गोलंदाजीच्या बळावर भारताने पाकिस्तानला 147 धावांवर रोखण्यात यश मिळवलं.
पाकिस्तानकडून सलामीवर मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 4 षटकांत 26 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. त्याला हार्दिक पांड्याने 25 धावांत 3 तर अर्शदीप सिंगने 33 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद करून साथ दिली.
गेल्या वर्षी टी-20 क्रिकेट विश्वचषक सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध पुन्हा उभे ठाकले होते.
या सामन्यातील भारताची संघनिवड हा चर्चेचा विषय ठरली. कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतला खेळवण्याऐवजी दिनेश कार्तिकला या सामन्यात संधी दिल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.