लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी पराभव करून हंगामातील त्यांचा सहावा विजय नोंदवला. गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने20 षटकांत दोन गडी गमावून 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून फक्त 202 धावा करता आल्या.
घरच्या मैदानावर सलग चार विजयांनंतर गुजरातचा हा पहिलाच पराभव आहे. लखनौकडून विल्यम ओ'रोर्कने तीन तर अवेश खान आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान, आकाश सिंग आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांच्यात 46धावांची भागीदारी झाली, जी विल्यम ओ'रोर्कने मोडली. त्याने सुदर्शनाला आपला बळी बनवले. 16 चेंडूत 21 धावा करून तो बाद झाला. यानंतर, आवेश खानने कर्णधार गिलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तो फक्त 35 धावा करू शकला. तर, जोस बटलरला 18 चेंडूत फक्त 33 धावा करता आल्या.
यानंतर, चौथ्या क्रमांकावर आलेल्या शेरफेन रदरफोर्डने शाहरुख खानसोबत डाव सांभाळला. दोघांनीही 40 चेंडूत 86 धावा जोडल्या. रुदरफोर्ड 38 धावा काढून बाद झाला आणि शाहरुख 57 धावा काढून बाद झाला. तथापि, दोघेही त्यांच्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.