कदाचित काही वर्षांपूर्वी महिलांसाठी आयपीएल स्पर्धा घेण्याबाबत आपण बोलू शकलो नसतो. कारण त्या वेळी तशी शक्यताही वाटत नव्हती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने बजावलेल्या कामगिरीनंतर महिलांसाठी आयपीएल स्पर्धा प्रत्यक्षात येण्याच्या आपण अगदी उंबरठ्यावर पोहोचलो असल्याचा विश्वास भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केला आहे.
महिलांची आयपीएल स्पर्धा घेण्यासाठी महिला क्रिकेटचा एकंदर सर्वसाधारण दर्जाही तितका उच्च असण्याची गरज असल्याचे मान्य करून मिताली म्हणाली की, काही वर्षांपूर्वी आपण त्याबाबत समाधानी नव्हतो. परंतु इंग्लंडमध्ये जालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विविध संघ आणि खेळाडूंच्या आकडेवारीवरून महिला क्रिकेटने बरीच मजल मारल्याचे आपल्याला ध्यानात येते. या वेळी विश्वचषक स्पर्धेत खेळताना जगभरातील महिला क्रिकेटचा दर्जा उंचावला असल्याचे मी पाहिले. इतकेच नव्हे तर अनेक खेळाडूंनी खूपच वरच्या स्तरापर्यंत मजल मारल्याचेही मला दिसून आले.
विविध देशांच्या महिला क्रिकेट संघांच्या कामगिरीबद्दल मिताली म्हणाली की, प्रत्येक संघाने 250 ते 300 धावांची मजल मारली आहे. तसेच प्रत्येक संघात शतक झळकावणाऱ्या खेळाडू आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक संघात पाच किंवा अधिक बळी घेऊ शकणाऱ्या गोलंदाजही आहेत, हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. कदाचित ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथे महिलांसाठी सुरू असलेल्या बिग बॅशसारख्या लीग स्पर्धांमुळे हा बदल घडून आला असावा.
विविध देशांमधील टी-20 लीग स्पर्धांमध्ये खेळलेल्या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत आपापल्या देशाच्या संघांमधून भरीव कामगिरी केलेली दिसून आली. याचाच अर्थ असा की, भारतातही महिलांची आयपीएल स्पर्धा सुरू करण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. जगभरातील अनेक देशांमधून या स्पर्धेसाठी दर्जेदार आणि गुणवान खेळाडू येतील, असे सांगून मिताली म्हणाली की, आपल्याकडेही आता महिला क्रिकेटसाठी चांगली पायाभरणी झाली आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये गुणवान महिला खेळाडू पुढे येत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना चांगले वातावरण मिळते आहे आणि चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता त्यांना गरज आहे ती नियमितपणे परदेशी खेळाडूंशी स्पर्धा करण्याची, आणि नेमकी हीच बाब महिलांच्या आयपीएलमधून साध्य होणार आहे.