Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रणजी ट्रॉफी : जातीय दंगलींच्या भीतीतून उदय ते IPL च्या ग्लॅमरमुळे मागे पडलेला फॉर्म

Webdunia
गुरूवार, 14 मार्च 2024 (11:10 IST)
मुंबईच्या संघानं 42 व्या रणजी चषकाच्या विजयाकडे वाटचाल केली आहे. मुंबईनं विदर्भापुढे विजयासाठी 538 धावांचे आव्हान ठेवलंय. तिसऱ्या दिवसाचा खेळ थंबला तेव्हा विदर्भानं बिनबाद 10 धावा केल्या आहेत. यावर्षी रणजी ट्रॉफीचा मान, सन्मान पुन्हा थोडा वाढला आहे. तो आयपीएलच्या स्तरावर कदाचित कधीच येणार नाही. कारण आयपीएल ही जगातली सर्वांत श्रीमंत वलयांकित स्पर्धा आहे.
 
आयपीएल ही म्हटलं तर स्थानिक स्पर्धा असली तरी तिचं रूप जागतिक आहे. जगातले मोठे खेळाडू त्या स्पर्धेत खेळण्यासाठी राष्ट्रप्रेमही बाजूला ठेवतात. त्यामुळे रणजी ट्रॉफी भारतीय स्पर्धांमधील राणी पुन्हा होणार नाही, पण ती दासी राहू नये. भारतीय क्रिकेटचा डोलारा हा आयपीएल येईपर्यंत रणजी ट्रॉफीच सांभाळत होती.जगात तीन देशांची देशांतर्गत क्रिकेटची सिस्टीम अत्यंत भक्कम आहे. एक इंग्लंड, दुसरी ऑस्ट्रेलिया आणि तिसरा भारत. भारतात तिचा पाया हा स्वातंत्र्यपूर्व काळात घातला गेला.
 
पंचरंगी ते रणजी
भारतात क्रिकेट इंग्रजांनी आणलं. पारशी लोकांनी ते वाढवलं. संस्थानिकांनी त्यात पैसे ओतले. हिंदू, मुस्लिम प्रजेने हा खेळ आपला मानला आणि बघता बघता हा खेळ भारतीय मातीत रुजला. सुरवातीला हा खेळ रुजवायचं काम तिरंगी, चौरंगी आणि पंचरंगी स्पर्धांनी केलं. मुंबईत सुरू झालेल्या या स्पर्धांत खेळणाऱ्या टीम्स धर्मावर आधारित होत्या.
 
पंचरंगी म्हणजे युरोपियन, पारशी, हिंदू, मुस्लिम असे चार आणि एक इतर धर्मियांचा (बौद्ध, ज्यू, भारतीय ख्रिश्चन) असे संघ असायचे. ह्या स्पर्धांना हजारोंची गर्दी उसळत असे. आजच्या आयपीएलसारखीच. धर्माच्या आधारावरील टीम्स असूनही त्यातून कधी जातीय दंगली पेटल्याचं उदाहरण मात्र नाही. उलट चित्र वेगळं होतं.
 
उदाहरणच द्यायचं, तर मुश्ताक अली ह्या महान क्रिकेटपटूचे गुरू म्हणजे कर्नल सी. के. नायडू. ते हिंदू होते, त्यामुळे हिंदू संघाकडून खेळायचे. मुश्ताक मुस्लिम असून हिंदूंच्या नेटवर सीकेंबरोबर सराव करत. इतका सलोखा होता. पण 1940 उजाडेपर्यंत देशातली परिस्थिती बदलली.स्पर्धेमुळे जातीय तेढ वाढू नये, दंगली पेटू नयेत म्हणून महात्मा गांधींनी पंचरंगी स्पर्धा बंद करण्याची विनंती केली. मग पंचरंगी स्पर्धेची जागा रणजी ट्रॉफीने घेतली. आणि तिथून ही स्पर्धा भारतातल्या देशांतर्गत स्पर्धांची पट्टराणी झाली.
 
'रणजी'चं बदलतं रूप
1946 साली बीसीसीआयनं पंचरंगी स्पर्धा रद्द करून रणजी ट्रॉफीची सुरुवात केली होती, तेव्हा या स्पर्धेला ‘द क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ इंडिया’ असं नाव देण्यात आलं. पुढे नवानगरचे महाराजा आणि इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळलेले रणजीतसिंह यांच्या नावावरून या ट्रॉफीचं ‘रणजी ट्रॉफी’ असं नामकरण झालं.काळानुसार रणजी ट्रॉफीचं रूप बदलत गेलं. सुरुवातीला देशातल्या पाच झोनमध्ये संघ विभागले जायचे, आणि त्यातून आधी नॉक आऊट पद्धतीनं ही स्पर्धा खेळली जायची. मग पाच संघांतून साखळी फेरी खेळवली जायची. त्यामुळे स्पर्धा वाढली. मग 2002-03 च्या मोसमापासून एलिट आणि प्लेट सिस्टीम मुळे रणजी ट्रॉफीत आमूलाग्र बदल झाला. पंधरा अव्वल संघांचा एलिट ग्रुप आणि इतर संघांचा प्लेट ग्रुप अशी संघांची विभागणी होऊ लागली.
 
एलिट ग्रुपमधले दोन संघ प्लेट ग्रुपमधून येत, म्हणजे प्लेट ग्रुपमध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या संघांना पुढच्या वर्षी एलिट ग्रुपमध्ये स्थान मिळू लागलं. आता ग्रुप ए, बी आणि सी अशी तीन विभागांत संघांची विभागणी केली जाते.
भारतीय क्रिकेटमध्ये आधी संस्थानांचे, महाराजांचे संघ सशक्त होते. मग मेट्रो शहरांचे रणजी संघ सर्वांत सशक्त झाले. मुंबई संघ तर आजही चॅम्पियन आहे. मुंबईच्या खेळाडूसाठी रणजी कॅप मिळणं हा मानाचा तुरा होता.
 
मुंबईचं स्थानिक क्रिकेट इतकं घट्ट विणलेल होतं की तिथून खेळाडू ताऊन सुलाखून यायचा. मुंबईचं एके काळी इतकं वर्चस्व होतं, की भारतीय संघात 6-7 खेळाडू मुंबईचेच असंत.
 
भारतीय संघाच्या फलंदाजीचा भार तर मुंबई वाहत असे. विजय मर्चंट पासून सुरू झालेली परंपरा आज यशस्वी जैस्वाल पुढे नेतोय. सध्याही मुंबईचे किती खेळाडू भरतीय संघात आहेत ते पाहा.
 
पुढे रणजीचा लंबक दक्षिणेकडे सरकला. तिथून जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज निर्माण व्हायला लागले. विश्वनाथ, जयसिंह, पतौडीने त्यांची फलंदाजी, ताकदवान केली.
 
मग बेदी चाणक्याच्या भूमिकेत शिरला. त्याने शेंडीला गाठ मारून मुंबईला हरवण्याचा विडा उचलला. त्यामुळे मुंबईच्या दादागिरीला थोडे हादरे बसले.
 
नव्वदीत तत्कालिन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशात मुक्त अर्थव्यवस्था आणली. मध्यम वर्ग झपाट्याने बदलला. घराघरात टीव्ही आला.
 
त्यावेळी उदयाला आलेल्या तेंडुलकरने छोट्या शहरात आणि गावात क्रिकेटमध्ये यश मिळवण्याचं स्वप्न विकलं.
 
क्रिकेट गावात गेलं. रणजीचा विस्तार वाढला. जाळं देशभर पसरलं. भारतीय संघात जायची ती महत्त्वाची शिडी झाली.
 
पण त्यानंतर आयपीएल आली. येताना ती अनेक अलंकार घेऊन आली. पैसाच पैसा, दोन महिन्यांचा उत्सव, सतत टीव्हीवर प्रक्षेपण, वर्तमान पत्रांची पानं त्यासाठी राखून ठेवलेली.
 
लवंगी फटाक्या एव्हढा परफॉर्मन्स ऍटमबॉम्बचा आवाज करू लागला. त्यामुळे बघता बघता पट्टराणीपद रणजीऐवजी आयपीएलला मिळालं.
 
आयपीएलनं बदललं भारतीय क्रिकेट
तरुण क्रिकेटपटूंची महत्वाकांक्षा बदलली. आयपीएल हे त्यांचं ध्येय झालं. कमी मेहनतीमध्ये मोठा मोबदला मिळू लागला. मग कोण कसोटीसाठी मेहनत करणार?
 
आयपीएल मुळे चांगल्या गोष्टीही झाल्याच.
 
आयपीएलने भारतीय क्रिकेट आणि जुन्यापासून नव्या क्रिकेटपटूंना मालामाल केलं. आत्मविश्वास वाढवला.
 
फारसं शिक्षण नसलेली, गरिबीत राहणारी मुल नावारूपाला आली. बघता बघता स्वतःला आणि कुटुंबाला वरच्या आर्थिक स्तरात घेऊन गेली.
 
आयसीसी भारतीय क्रिकेटची बटिक झाली आणि बघता बघता आयपीएल भारतीय संघात शिरायची शिडी नाही तर लिफ्ट झाली.
पण मग इतर देशांतर्गत स्पर्धांची रया गेली. खेळाडू त्या स्पर्धा टाळू लागले. अनफिट असताना आयपीएल खेळू लागले.
 
सचिन, लक्ष्मण, द्रविड कुंबळेच्या काळापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खूप वाढलं होतं. पण तरीही संधी मिळाली, की ही मंडळी रणजी खेळत. आपल्या रणजी संघाला विजय मिळवून देणे ही अभिमानाची गोष्ट होती.
 
पुढे हे प्रेम कमी होत गेलं. आता तर आईचं दूध विसरलं गेलंय.
 
मोठे खेळाडू न खेळल्यामुळे रणजीचा दर्जा कमी होतो. त्या धावा, ते बळी ह्यांना किंमत राहत नाही.
 
पाच दिवस क्रिकेट खेळण्याची सवय राहत नाही. ते देशाबाहेर जास्त जाणवतं.
 
बरं वार्षिक करार करायला सर्व तयार असतात. कारण हमी रक्कम मिळते. पण यावेळी बीसीसीआयनं रणजी खेळणं टाळणाऱ्या खेळाडूंना करारातून वगळलं.
 
मंडळाने रट्टा दिला आणि खेळाडू भानावर आले. रणजी ट्रॉफीवर पुन्हा प्रकाशझोत आला. मुंबईनेही आपली परंपरा रणजी जिंकून राखली.
 
आता मुंबई क्रिकेट असोसिएशन सुद्धा जागं व्हायला हवं. वेस्ट स्टँडमध्ये बसून सामना बघणारा मित्र तिथल्या सुविधांमुळे - खरं तर दुर्विधांमुळे - वैतागला होता.
 
एकेकाळी रेडीओवर अजित वाडेकर आता फलंदाजी करणार, हे ऐकल्यावर ब्रेबर्न स्टेडियम भरून जायचं. पुढे ती परंपरा, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, सचिन तेंडुलकरने चालवली.
 
आता एकदा जैस्वाल रणजी खेळणार म्हणून भरलेलं स्टेडियम पाहायची इच्छा आहे. तरंच मुंबईत तरी रणजीचं वैभव परत आलं असे मानेन.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पाकिस्तान दौऱ्यासाठी बीसीसीआयला भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही?

IND vs SA: संजू सॅमसन T20 मध्ये सर्वात जलद सात हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला

भारताने दक्षिण आफ्रिकेवर 61 धावांनी विजय मिळवला

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

पुढील लेख
Show comments