न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या आणि ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्सविरुद्धच्या 6 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर तो क्रिकेटला अलविदा करणार आहे. त्यांनी ट्विटद्वारे ही घोषणा केली आहे.
टेलरने लिहिले, 'आज मी बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांनंतर आणि ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्सविरुद्धच्या 6 एकदिवसीय सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा करत आहे. 17 वर्षांपासून तुम्ही मला दिलेल्या अविश्वसनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, हा खूप मोठा सन्मान आहे.
टेलरने लिहिले, 'हा एक अद्भुत प्रवास होता. इतके दिवस देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे असे मला वाटते. क्रिकेटच्या महान खेळाडूंसोबत आणि विरुद्ध खेळणे हा एक मोठा सन्मान आहे. या काळात मी अनेक आठवणी आणि चांगले मित्र बनवले आहेत. पण प्रत्येक चांगली गोष्ट कधी ना कधी संपलीच पाहिजे. मला वाटते की ही वेळ माझ्यासाठी योग्य आहे. मी माझे कुटुंब, मित्र आणि त्या सर्व लोकांचे आभार मानतो, ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी पोहोचलो आहे.
37 वर्षीय रॉस टेलरने 2006 मध्ये न्यूझीलंडकडून पदार्पण केले होते. तो न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने कसोटी सामन्यात 7584 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या 8591 धावा आहेत.