बांगलादेशचा अनुभवी फलंदाज तमिम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तमिमचा हा निर्णय आश्चर्यकारक आहे, कारण तीन महिन्यांनी वनडे विश्वचषक सुरू होणार आहे. तमिम हा बांगलादेशकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन वनडे मालिकेतील पहिल्या वनडेत बांगलादेशच्या पराभवानंतर तमिमने हा निर्णय घेतला. पत्रकार परिषदेत तमिम खूपच भावूक झाला होता. डोळ्यात अश्रू आणत त्यांनी 16 वर्षांची कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला.
तमिम म्हणाला, “माझ्यासाठी हा शेवट आहे. मी माझे सर्वोत्तम दिले आहे. मी माझ्या परीने प्रयत्न केले आहेत. या क्षणापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, बीसीबी अधिकारी, माझे कुटुंबीय आणि माझ्या दीर्घ प्रवासात माझ्यासोबत राहिलेल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मला चाहत्यांचेही आभार मानायचे आहेत. तुमचे प्रेम आणि माझ्यावरील विश्वासामुळे मला बांगलादेशसाठी सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. माझ्या आयुष्याच्या पुढील अध्यायासाठी मला तुमच्या प्रार्थना मागायच्या आहेत. कृपया मला तुमच्या प्रार्थनेत ठेवा.
बांगलादेश संघाने वनडेतील नवीन कर्णधाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. शाकिब अल हसन टी-20 आणि लिटन दास कसोटीत संघाचे नेतृत्व करत आहे. 34 वर्षीय तमिमने गेल्या वर्षी T20 ला अलविदा केला. तो एप्रिलमध्ये आयर्लंडविरुद्धच्या एक कसोटी सामन्याच्या मालिकेत खेळला होता. तमिमने फेब्रुवारी 2007 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषकात भारताविरुद्ध बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात त्याने अर्धशतक झळकावले. तो आपल्या देशासाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा (8313) आणि शतके (14) करणारा फलंदाज आहे.
तमिमने 70 कसोटी सामन्यांमध्ये दहा शतकांसह 5134 धावा केल्या, ज्यामुळे संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला . यादरम्यान त्याची सरासरी 38.89 होती. तमिमने कर्णधार म्हणून 37 पैकी 21 एकदिवसीय सामने जिंकले आहेत आणि बांगलादेशला ODI सुपर लीगमध्ये तिसऱ्या स्थानावर नेले आहे. यामुळे भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी संघ थेट पात्र ठरला. 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्याने बांगलादेशचे नेतृत्व केले होते.