Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

टीम इंडियाची मालिकेत बरोबरी, इंग्लंडला 8 धावांनी नमवले

टीम इंडियाची मालिकेत बरोबरी, इंग्लंडला 8 धावांनी नमवले
अहमदाबाद , शुक्रवार, 19 मार्च 2021 (07:59 IST)
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत व इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर 8 धावांनी रोमहर्षक विजय मिळवत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 185 धावा केल्या. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवचे तुफानी अर्धशतक व श्रेयस अय्यरच्या झटपट खेळीमुळे टीम इंडियाला 200 धावांच्या जवळ पोहोचता आले. प्रत्युत्तरात इंग्लंडला 8 बाद 177 धावांपर्यंत मजल मारता आली.
 
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने आपला पहिला गडी जोस बटलरच्या रूपात गमावला. भुवनेश्‍वरच्या गोलंदाजीवर तो चहरकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 9 धावा केल्या. बटलर बाद झाल्यानंतरही सलामीवीर जेसन रॉयने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला डेव्डिह मलान या सामन्यात अपयशी ठरला. राहुल चहरने त्याची 14 धावांवर दांडी गुल केली. मलानपाठोपाठ जेसन रॉयही माघारी परतला. हार्दिक पंड्याने त्याला बाद केले. रॉयने 6 चौकार व एका षटकाराहसह 40 धावा केल्या. त्यानंतर बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी भारताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या चिंतेत भर टाकली.
 
विजयासाठी 50 पेक्षा जास्त धावांची गरज असताना राहुल चहरने बेअरस्टोला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. बेअरस्टो 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने स्थिरावलेल्या बेन स्टोक्स व कर्णधार इऑन मार्गन यांना बाद करत सलग 2 धक्के दिले. स्टोक्सने 23 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 46 धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर शेवटच्या षटकांत जोफ्रा आर्चरने हाणामारी करत सामन्यात रंगत निर्माण केली. पण, त्याचे प्रयत्न तोकडे पडले. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3, हार्दिक पांड्या व राहुल चहर यांनी प्रत्येकी 2 तर भुवनेश्‍वरने एक बळी घेतला.
 
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. रोहितने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. रशीदच्या पहिल्याच षटकात रोहित-राहुलने 12 धावा वसूल केल्या. रोहित-राहुल स्थिरावणार असे वाटत असताना आर्चरने रोहितला झेलबाद केले. सामन्याच्या चौथ्या षटकात रोहित बाद झाला. त्याने एक चौकार व एका षटकारासह 12 धावा केल्या.
 
सूर्यकुमारची पदार्पणात अर्धशतकी खेळी
रोहितनंतर आलेल्या सूर्यकुमारनेही आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर सूर्यकुमार-राहुलने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. मागील दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या राहुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याला आर्चरने 14 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला विराट कोहलीही एक धाव काढून बाद झाला. त्याला रशीदने तंबूत धाडले. या पडझडीनंतर ऋषभ पंतला साथीला घेत सूर्यकुमारने किल्ला लढवला. त्याने 28 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो झेलबाद झाला. 31 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी करत सूर्यकुमारने 57 धावा फटकावल्या.
 
त्यानंतर श्रेयस अय्यरने पंतसह संघाची धावसंख्या पुढे नेली. छोटेखानी भागीदारी उभारल्यानंतर पंत बाद झाला. आर्चरने त्याला 30 धावांवर बाद केले. त्यानंतर अय्यर व हार्दिक पांड्या यांनी शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. मोठा फटका खेळण्याच्या नादात हार्दिक पांड्या 11 धावांवर झेलबाद झाला. बेन स्टोक्सने त्याचा ऑफ साईडला भन्नाट झेल टिपला. पंड्या बाद झाल्यानंतर  अय्यरही खेळपट्टीवर जास्त काळ टिकला नाही. अय्यरने 18 चेंडूत 5 चौकार व एका षटकारासह 37 धावांची खेळी केली. जोफ्रा आर्चरने 4 तर, आदिल रशीद, मार्क वूड, सॅम करन व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हिंटेज कारसाठी हे धोरण लागू होणार - नितीन गडकरी