Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल। कबीरांच्या या दोह्यात दडलेला अर्थ

kabir doha meaning
, सोमवार, 1 मार्च 2021 (16:06 IST)
चिटी चावल ले चली,
बीच में मिल गई दाल।
कहे कबीर दो ना मिले,
इक ले, इक डाल!!
 
"मुंगी " तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.'  पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
 
तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.
 
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.
 
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात. विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण /शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.
 
ती बघून, 'घेशील किती दोन करांनी' अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण, शासन व्यवस्थांना हाकायला खूप सोपी पडतात. 
 
पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते. आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.
 
भौतिक वस्तुंसाठीचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.
 
देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. 
 
नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो. म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंद ही त्यामुळे टिकावू बनतो. 

कबीरांच्या या दोह्यात असा मोठा "अर्थ "दडला आहे.
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बांधकाम साइटवर 11 फूट मगर आढळल्याने खळबळ