Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लॉकडाऊनची सकारात्मकता, स्वतःची भेट

लॉकडाऊनची सकारात्मकता, स्वतःची भेट
webdunia

श्री. अमेय पद्माकर कस्तुरे

, गुरूवार, 16 एप्रिल 2020 (20:25 IST)
सध्या कोरोना नावाच्या विषाणूने पूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. दिवसेंदिवस बाधितांची वाढणारी संख्या ही खरंच चिंताजनक बाब आहे. भारताच्या माननीय पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे बरेच जण हे आपापल्या घरात राहत आहेत. पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आदेशांचे पालन करणे आणि एक सुजाण नागरिकाच्या नात्याने त्यांनी दिलेल्या सूचनांचे आदर व पालन करणे हे आपले कर्तव्यच आहे. 
 
लॉकडाऊनमुळे माझी स्वतःची ऑफिस मधून आल्यावर सुरू होणारी (साधारण १ तास १५ मिनिटांची) "सांज भटकंती" देखील बंद झाली आहे. कधी वाटते पिंजऱ्यात अडकलेला पक्ष्याला कसे वाटत असेल जेव्हा पंख असताना सुद्धा त्याला हवेत उडता येत नसेल. त्या पाखराचे दुःख आता आपण नक्कीच समजू शकतो. घरात बसून आलेला क्षीण हा वर्क फ्रॉम होम सुरू असताना पण वाढतो. पण ही नकारात्मकता जर वेगळी ठेवली किंबहुना या नकारात्मकतेला जर मनातूनच काढून टाकले तर या लॉकडाऊनची सकारात्मकता ही वादळ सरल्यानंतर येणाऱ्या सूर्याच्या किरणांसारखी लख्ख आणि निर्मळ असेल. ह्या लेखात आपण लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सकारात्मक बाजूंचा विचार करता येईल अश्या काही गोष्टी मी नमूद करत आहे. 
 
कार्य जीवनाविषयी म्हणायचे तर, लॉकडाऊन अनाउन्स झाले आणि आम्हा इंजिनियराला वर्क फ्रॉम होम करण्याची एक संधी मिळाली. मी स्वतः यांत्रिकी अभियंता (मेकॅनिकल इंजिनिअर) असल्याने घरी राहून मला कधी काम करता येईल यावर माझा विश्वासच नव्हता. कामाचे असणारे स्वरूप असे आहे की कार्यस्थळी बसूनच Analysis Softwares वापरता येतात, पण लॉकडाऊन झाले आणि रिमोट डेस्कटॉप सारख्या प्रणालीचा वापर करून घरच्या लॅपटॉप वरूनपण ऑफिसचा कॉम्प्युटर आणि Analysis ची सॉफ्टवेअर वापरता येऊ लागलीत आणि इतके वर्ष अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य झाली.
 
वैयक्तिक जीवनाविषयी म्हणायचे, तर मुंबईतल्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनातून पुन्हा मला माझ्या मूळ गावातील म्हणजेच इंदूरला लहानपणी घालवलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण यायला लागली. ऑफिस करिता, सकाळी साडेसातला घरातून बाहेर जाणारा मी, आता आठ वाजेपर्यंत झोपू लागतो. नेहमी दिवसात ऑफिस मुळे लवकर उठणे आणि रात्री उशिरा झोपणे ही दिनचर्या हळू-हळू संपुष्टात येऊ लागली. सकाळी उठल्यावर साधारण 15 मिनिटे योगासने करणे किंवा योगासन नाही केल्यास सायंकाळी आवडत्या गाण्यांवर डान्स करणे हा घरी बसून स्वतःला आनंदी आणि फिट ठेवण्याचा एक प्रयत्न असतो. 
 
नेहमीच्या दिवसांत, ऑफिस करिता सकाळी लवकर निघून गेल्यामुळे माझा सात वर्षांचा मुलाला कधी मी भेटतच नसे, कारण मी ऑफिसमध्ये जाताना तो नेहमी झोपलेला असे. आता आम्ही थोड्या फार फरकाने झोपून उठतो. सुट्टी असल्यामुळे आठवड्यातून १-२ वेळा त्याला अंघोळ घालण्याचा अनुभव घेतो. अंघोळीनंतर केलेल्या देवपूजेस वडिलांनी मंत्रोपचार करणे आणि मुलाने पूजा करणे हा अनुभव सुद्धा मला घेता येतो. 
सकाळी माझ्या परिवारासोबत एकत्र बसून चहा घेणे व गप्पा मारताना जगात होणाऱ्या  घडामोडींवर चर्चा करणे हे सुद्धा खूप छान वाटते. नेहमीच्या दिवसांत, सकाळी घरातून लवकर बाहेर पडावे लागल्याने सोबत चहा घेणे हे फक्त शनिवार-रविवार असतानाच शक्य होत असे पण लॉकडाऊन मुळे आता हे सर्व सोबत अनुभवता येत आहे. 
 
दिवसभर ऑफिसचे काम करत असताना, दुपारचे जेवण कुटुंबा सोबत करणे, सायंकाळी त्यांच्या सोबत चहा घेणे हा देखील एक आनंददायी अनुभव आहे. दिवसाचे ऑफिसाचे काम संपले की, लहानपणी उन्हाळी सुट्टीत "अष्ट चंग पे"  हा चिंचेच्या बियांचे पासे बनवून खेळणारा खेळ आता कित्येक वर्षानंतर पुन्हा खेळायला लागलो. 
मला गाणे म्हणण्याची आवड आहे. माझी आई स्वतः संगीत विशारद असल्याने तिच्या कडून मिळालेली "गाण्याची विरासत" मी नेहमी जपायचा प्रयत्न करतो. ह्या लॉकडाऊनमुळे, ऑफिसच्या प्रवासाचा वेळ वाचू लागलाय, त्यामुळे गाणे म्हणणे, डान्स करणे, लेखन करणे, घरात असणारी संगीत वाद्य वाजवणे, थोर लेखकांची व्याख्याने यूट्यूब वर पाहणे, चित्र काढणे असे बरेच काही करणे शक्य होऊ लागल्या. दैनंदिनात हरवलेला मी हा कुठेतरी स्वतःला सापडू लागलोय. 
 
त्यात भर म्हणजे, आम्ही शाळकरी मित्र-मैत्रिणी आता व्हिडिओ कॉल मुळे पुन्हा एकत्र येऊन संवाद साधू लागलोय. दिवसभराचे काम संपवून रात्री शाळकरी मित्र-मैत्रिणींसोबत गप्पांची मजा काही औरच आहे. शाळा सोडून आम्हा सर्वांना आता जवळपास २२ वर्षे उलटून गेली आहेत. शाळेतले आम्ही सर्व आता आई-बाबांच्या रूपात आलो आहोत पण तरीही शाळेतील मित्र मंडळी व्हिडिओ कॉल मध्ये भेटलो की जुन्या आठवणी काढून जणू आम्ही शाळेच्या गणवेशातच सर्वजण अजून तसेच एकमेकांसमोर आल्यासारखे वाटते. व्हिडिओ कॉल मध्ये आपल्या आयुष्यात असणाऱ्या बऱ्याच गोष्टी एकमेकांसोबत चर्चा करून आणि शाळेतल्या लहानपणीच्या आठवणी काढून पुन्हा लहान होण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
 
मला खात्री आहे की वाचकांपैकी बरेच जण ह्यामधील काही ना काही गोष्टी तर नक्कीच करत असतील. लॉकडाऊन मधील सकारात्मक बाजू खूप जास्त आहेत त्यामुळे चला तर त्या नकारात्मक बाजूंना दूर सारूया आणि आपल्या घरात राहून सरकारी यंत्रणांना आणि आपल्या साठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस यंत्रणांना सहकार्य करूया आणि ह्या कोरोना नावाच्या विषाणूला दूर सारून आपल्या देशाला ह्या संकटातून बाहेर काढूया. घरी आपल्या कुटुंबीयांसोबत राहणे हे "क्वारंटाईन" ह्या संकल्पनेखाली एकटे राहण्यापेक्षा कित्येक पटीने चांगले आहे. 
वाचकांना माझ्या खूप खूप सदिच्छा, आपणा सर्वांची प्रकृती उत्तम राहावी ही देवा चरणी प्रार्थना
 
आपलाच - श्री. अमेय पद्माकर कस्तुरे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉकडाऊनमध्ये लग्नात न येण्यासाठी निमंत्रण : फेसबुकवर पार पडला जवानाचा विवाह सोहळा