महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहेत, तू अर्ज भरून पहावं..
मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं
मग ना पावसातल्या सभा,
ना प्रचाराचा घाम..
तुझे स्टार प्रचारक देवा
ग्यानबा तुकाराम..
प्रचाराच्या जाहिरातीत याच्या ओव्या कानी पडतील..
बॅनर बघून वीट येण्यापेक्षा
हात जोडले जातील..
सगळं सुखाचं होईल तेव्हा
विपरित काही घडणार नाही पांडुरंगा..
आणि तू सगळ्यांचा असल्यामुळे
एकही मत जात पाहून पडणार नाही..
तुझा कुणीच विरोधक नसल्यानं
सगळ्यांना बरंच वाटंल..
अजून तरी पांडुरंगा तुझा
कुणीच विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटंल…
अन् मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण
हे कोडंही लवकर सुटंल..
पहिली टर्म असली तरी देवा
बिनविरोध येशील
आणि मुख्य म्हणजे भल्याभल्यांना तुझ्या मंत्रिमंडळातही घेशील…
सगळ्यांत मोठा निर्णय पांडुरंगा असा घे..
कायद्यासोबत गृहखातं
छत्रपती शिवाजी महाराजांना दे..
मग काय टाक देवा
कोण कायदा हातात घेईल..
अरे एका नजरेत अख्खा
महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल..
लाडक्या भावांवरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पहावं…
त्या मुक्ताईकडे महिला व बालविकास खातं जावं..
(तुम्हाला वेगळा शब्द ऐकायची सवय आहे, माझ्या कवितेत वेगळं लिहिलंय)
आणि साक्षरतेचे विठ्ठला काय दिवस येतील..
बुद्धिला वैभव आणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षणमंत्री होतील..
अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वत: खाली बुडलं..
जे सदेह आले स्वर्गात आणि तू दार उघडलं, त्
या तुकोबांच्या हाती दे हिशेबाच्या वह्या
आणि अर्थमंत्री म्हणून घे ताबडतोब त्यांच्या सह्या..
एकदम झाला आवाज हो.. लखलख वीज कडाडली.
वीटेवरची सावली माऊली माझ्यावरती चिडली..
काय लावली केव्हापासूनची तुझी ही बडबड आहे..
पांडुरंग म्हणाला..
काय लावली केव्हापासूनची तुझी ही बडबड आहे..
हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे..
या थोरांना मंत्री करून मला सीएम करतोस हो रे… राजकारणात त्यांच्या नावाचा
होतो तेवढा वापर पुरे..
राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोयस
म्हणून केव्हाचा ऐकतोय…
पण ऐक आता एक उपाय
मी मन लावून सांगतोय..
माऊलीच्या रुपातला विठ्ठल
बापासारखा वागला
आणि जबाबदारीनं राष्ट्रासाठी
पुढं बोलू लागला..
मला म्हणाला गाथा, ज्ञानेश्वरी,
शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता?
अन् मग कसं काय रे त्या जयंत्यांना तुम्ही डीजे लावून नाचता?
या सगळ्यांना तुम्ही
सोयीनुसार जातीमध्ये वाटलंत..
डोक्यावरती तर घेतलंत
पण डोक्यात नाही घातलं..
शिवाजी आहे..
जर विचारांचा घेतला वसा..
सुराज्यासाठीच काम करा मग कुणीही खुर्चीत बसा..
आणि कर्तृत्त्वाची वेळ आहे
आता नको नुसती बडबड…
आधी मतदानाला वारी समजून
तू घराबाहेर पड..
आम्ही सगळे पाठिशी आहोत
तुम्ही खुशाल राहा..
अरे समोर महाराष्ट्र उभा आहे..
त्याच्यात पांडुरंग पाहा..”
- संकर्षण कऱ्हाडे