एसटी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची जीवनवाहिनी झाली आहे. आपल्याला गाव खेड्यापर्यंत पोहोचवणारी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव : एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.
वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे सुरू झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारताच्या ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.
बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे नाव असले तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून बॉम्बे स्टेट होते. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, असे एसटी महामंडळाचे नाव होते.
पहिल्या एसटी बॉडी ही लाकडी होती तर छप्पर चक्क कापडी होते. या बसची आसनक्षमता 30 होती. नंतर हळूहळू शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या कंपन्यांच्या बसगाड्या येऊ लागलेला होत्या.
पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला.
एसटीची सेवा "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. ह्या सेवेचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यांत विस्तार झाला आहे.
एसटीने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत. डिसेंबर २००२ मध्ये दादर- पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवीत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.
एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे.
बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा दिली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात. तसेच २०१७पासून महामंडळाने 'शिवशाही' या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी. तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे.