- रोहन नामजोशी
पोटाचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न निर्माण होतो असं म्हणतात. सुटलेलं पोट हा चेष्टेचा विषय असतो. पण त्याहीपेक्षा तो मोठा काळजीचा विषय असतो.
फिटिंगचे कपडे मिळत नाही, चालल्यावर धाप लागते, दोन मजले चढायचे असले तरी त्याच सुटलेल्या पोटात गोळा येतो.याचबरोबर सुटलेल्या पोटामुळे हृदयविकार, मधुमेह, अशा अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.
सध्याची जीवनशैली, बैठं काम, खाण्याचं अनियमित वेळापत्रक अशा अनेक कारणांमुळे पोट सुटायला सुरुवात होते आणि ते कमी करणं जिकिरीचं होऊन बसतं.
सुटलेल्या पोटाबद्दल पडलेले 9 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं मिळवण्याचा या लेखाच्या माध्यमातून प्रयत्न करू या.
1.पोट का सुटतं? त्याची कारणं काय?
पोट सुटण्याची अनेक कारणं आहेत. फॅट वाढले की पोट सुटतं हे इतकं साधं आहे. फॅट्स मध्ये विसरल फॅट आणि सबक्युटेनिअस फॅट असे फॅटचे दोन प्रकार असतात.
विसरल फॅट हे पोटाच्या दोन अवयवांना वेटोळे घालून असतात.
अल्होकोहोल सेवनाचं प्रमाण पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात असतं. तसंच बाहेर खाण्याचं प्रमाणही पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे पुरुषांमध्ये विसरल फॅट मोठ्या प्रमाणात वाढतात.
त्याच्याबरोबर सबक्युटेनिअस, म्हणजे त्वचेला लागून असलेले फॅटपण वाढतात. त्यामुळे एकूणच पोटाचा घेर वाढतो.
पुरुषांचं असो किंवा बायकांचं असो, जास्त खाल्ल्याने पोट सुटतं असं डॉ. जगन्नाथ दीक्षित सांगतात. व्यायाम न करणे हे दुसरं कारण आहे. वारंवार खाणे हे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे असं ते सांगतात.
वारंवार खाल्ल्याममुळे इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होतं. त्याची पातळी वाढली की वजन वाढतं.
खाण्याची उपलब्धता हे पोट वाढण्याचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे असं डॉ.दीक्षित सांगतात.
लोकांची खाद्यपदार्थ खरेदी करण्याची क्षमता वाढली आहे आणि वारंवार खाणं हा पोट सुटण्यामागे महत्त्वाचं कारण आहे असं ते पुढे सांगतात.
आहारतज्ज्ञ डॉ. ज्ञानदा चितळे सुद्धा याच बाबींचा पुनरुच्चार करतात. “हल्ली सगळ्या गोष्टी हाताशी असतात. चालणं कमी झालं आहे. तसंच स्मार्टफोनवर स्विगी, झोमॅटो असल्याने लगेच हवं ते हवं तेव्हा खायला मिळतं. हे पोट सुटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे.” त्या सांगतात.
2.पोट सुटण्याचं वय नेमकं काय असतं?
पोट सुटण्याचं नेमकं वय नसतं. विशीत ते फारसं दिसत नाही. कारण या वयोगटातले लोक तसे आरोग्याबद्दल सजग असतात त्यामुळे त्यांच्यात ही समस्या फारशी दिसत नाही.
पस्तिशी चाळीशीत ही समस्या दिसते. कारण आयुष्य स्थिरस्थावर झालेलं असतं, शारीरिक हालचालही कमी होते. व्यावसायिक ताणतणाव असल्याने पोटाचा घेर वाढतो असं डॉ. चितळे यांना वाटतं.
तर डॉ.दीक्षित यांच्या मते 29 ते 34 या काळात पुरुषांचं पोट सुटण्याचं प्रमाण जास्त असतं असं ते सांगतात.
व्यवसायात स्थैर्य आलेलं असतं, संघर्ष कमी झालेलं असतो, पैसा येतो. त्यामुळे पोट सुटतं.
3. पोटाचा घेर ही समस्या आहे हे कसं ओळखावं?
पोटाता घेर ही समस्या आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी कमरेचा घोर मोजावा. पुरुषांच्या कमरेचा घेर 94 सेमी पेक्षा जास्त असेल तर ही नक्कीच मोठी समस्या आहे असं समजावं.
हे मोजमाप दक्षिण आशियाई, चीन आणि जपानी पुरुषांसाठी तयार करण्यात आलं आहे. जर तुमच्या कमरेचा घेर यापेक्षा जास्त असेल तर डॉक्टरला भेटण्याची हीच योग्य वेळ आहे असं समजावं.
4. पोट सुटण्यासाठी हानिकारक खाद्यपदार्थ आणि द्रव्यपदार्थ कोणते?
पोट सुटण्यासाठी सगळ्यात जास्त हानिकारक पदार्थ म्हणजे सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ, एकूणच फॅट असलेले पदार्थ पोट सुटण्यासाठी जबाबदार असतात.
त्याचबरोबर तळलेले पदार्थ, रिच डेझर्ट, गोड पदार्थ आणि फायबर कमी असलेले पदार्थ यामुळे वजन वाढतं असं डॉ. ज्ञानदा चितळे यांचं मत आहे.
अल्कोहोल सुद्धा पोट सुटण्यासाठी जबाबदार आहे. जोपर्यंत अल्कोहोलचा शेवटचा थेंब तुमच्या शरीरातून जात नाही तोपर्यंत शरीर तिथून फॅट घेण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे वजन वाढतं.
अल्कोहोल सेवन करताना जे खाद्यपदार्थ असतात तेही पोट सुटण्यासाठी तितकेच जबाबदार असतात असं त्या पुढे म्हणतात.
बीअरमुळे पोट सुटतं असाही एक समज आहे. पण चितळे यांच्या मते किती पिता यावर ते अवलंबून आहे. ओकेजनली घेतली तर फार पोट सुटत नाही पण आठवड्यातून तीनदा वगैरे घेतली तर नक्कीच वजन वाढतं.
नॉन अल्कोहोलिक द्रव्यपदार्थात चहा आणि कॉफी सर्वांत जास्त हानिकारक आहेत असं डॉ.दीक्षित यांचं मत आहे.
दारू पेक्षाही दारूबरोबर असलेले खाद्यपदार्थ पोट सुटण्यासाठी जास्त जबाबदार असतात असं डॉ. दीक्षित यांचं मत आहे. कारण दारू पिताना खाण्याचं भान राहत नाही. बराच वेळ खाल्लं जातं
एखाद्या व्यक्तीचं पोट सुटलेलं दिसलं की त्याला “काय बिअर जास्त होतेय का?” असा प्रश्न विचारला जातो.
बीअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे ते जास्त प्रमाणात प्यायला जातं. म्हणजे 8 बाटल्या बिअर प्यायली तर 200 मिली व्हिस्की प्यायल्यासारखं आहे असं त्यांना वाटतं.
5.भात कमी खाल्ल्याने पोट कमी होतं का?
पोट कमी करायचं असेल तर भात खाणं कमी करा असा सल्ला सरसकट दिला जातो. मात्र दक्षिण भारतात भात जास्त खाल्ला जातो, तिथे लोकांचे पोट सुटलेले असतात आणि उत्तर भारतात लोक गहू जास्त खातात तिथेही लोकांची पोटं सुटलेली असतात त्यामुळे तुम्ही किती वेळा खाता आणि किती खाता यावर सगळं अवलंबून आहे असं डॉ.दीक्षित यांचं मत आहे.
भाताची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की त्यात फायबर कमी आणि कार्बोहायड्रेट जास्त असतात.
त्यामुळे भात किती खाता आणि कसा खाता यावरही सगळं अवलंबून असतं.
भाताबरोबर भाज्या, इतर सॅलड किती खाता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. भाताबरोबर इतर गोष्टी खाल्ल्या तर वजन वाढत नाही.
नुसता भातावर भात खाल्ला तर त्यातून मिळणाऱ्या कॅलरी फॅटमध्ये परावर्तित होतात आणि वजन वाढतं. असं डॉ. चितळे यांना वाटतं.
6. पोट कमी करण्यासाठी जिमला जायलाच हवं का?
या प्रश्नाचं उत्तर थेट नाही असं आहे. तुम्ही किती खाता, त्यावरून किती कॅलरी डेफिसिट तयार होतो, यावर सगळं अवलंबून असतो.
पोट वाढल्याने पोट कमी करण्याचे व्यायाम केल्याने पोट कमी होत नाही हेही समजून घेतलं पाहिजे. असं एकाच जागेवरचं फॅट कमी होत नाही.
जिमला जाणं शक्य नसेल तर कोणत्याही कार्डिओ अक्टिव्हिटी ने वजन कमी होऊ शकतं असं डॉ.चितळे यांना वाटतं.
कमी खाल्लं तर पोट कमी होतं, पण त्याबरोबर योग्य व्यायामही करायला हवं असं मत डॉ. दीक्षित व्यक्त करतात.
24 तासात व्यायाम करण्यासाठी एक तास नक्की देता येतो असं डॉ.दीक्षित यांना वाटतं. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम काय आहे हाही एक महत्त्वाचा भाग आहे असं ते म्हणतात.
7.कमी खाल्ल्याने पोट कमी होतं?
हा सगळा लाईफस्टाईलचा प्रश्न आहे. तुमच्या शरीराला किती कॅलरीज हव्यात, त्यापेक्षा थोड्या कमी कॅलरीज घेतल्या तर फॅट कमी होतं.
इंटरमिटंट फास्टिंग किंवा किटो डाएट सारखे प्रकार आयुष्यभर करता येत नाही त्यामुळे ते बंद केलं की परिस्थिती पूर्ववत होते.
त्यामुळे कमी खाण्यापेक्षा काय खातोय आणि किती खातोय हे जास्त महत्त्वाचं आहे असं डॉ.चितळे म्हणतात.
8. ढेकर दिल्याने पोट कमी होतं का?
हसू आलं ना? पोट कमी करण्याबद्दल लोकांनी हा प्रश्न गुगलवर विचारला आहे. पण ढेकर फक्त तृप्तीची देता येते.
कारण असं करता आलं असतं तर सगळंच किती सोपं होतं ना?.
ढेकरा दिल्याने पोट कमी होत नाही असं आहारातज्ज्ञ एकमुखाने सांगतात.
त्यामुळे पुढच्या वेळेला जेवण झाल्यानंतर ढेकर दिली तर फक्त समाधान वाटेल वजन कमी होणार नाही.
9. पोट कमी करण्यासाठी करावं तरी काय?
डाएट करताना पोटावरचं फॅट कमी करणं फार कठीण आहे.
वजन कमी केल्यामुळे विसरल फॅटची पातळी कमी होते, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न सुटतात असं जॉन हापकिन्स विद्यापीठातील आहारातज्ज्ञ केरी स्टुअर्ट यांना वाटतं.
जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार कार्बोहायड्रेट्स कमी असलेले खाद्यपदार्थ खाल्लं तर वजन झपाट्याने कमी होतं.
पोट कमी करण्यासाठी हेल्दी खाण्याचा प्लॅन तयार करावा असं केरी स्टुअर्ट म्हणतात.
कार्बोहायड्रेट्स कमी असलेले अन्नपदार्थ खाण्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जे पर्याय उपलब्ध असतात ते हेल्दी असतात आणि तिथून पोटाचा घेर कमी होण्यास सुरुवात होते.
शरीराची सातत्याने हालचाल हाही पोटाचा घेर कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. त्यामुळे शरीरातलं इन्सुलिनचं प्रमाणही कमी होतं.
त्यामुळे पोट कमी करायचं असेल तर रोज अर्धा ते एक तास व्यायाम करायला हवा.
प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाण्यातून हद्दपार करायला हवेत.
अल्कोहोलचं सेवन कमी करायला हवं, तसंच धुम्रपान तातडीने सोडायला हवं.
सरतेशेवटी कमरेचा घेर 40 च्या आत असायलाच हवा हे पुरुषांनी लक्षात ठेवायला हवं. तरच पोटाच्या घेराची चिंता तुम्हाला सतावणार नाही.