DPU Private Super Specialty Hospital एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, यांनी तातडीने सुरतहून पुण्याला चार्टर विमानाने फुफ्फुसे आणली. दुसऱ्या राज्यातून पुण्यामध्ये हवाईमार्गे फुफ्फुसे आणून यशस्वी प्रत्यारोपण करण्याची पुण्यातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. जिल्हा रुग्णालय, सुरत ते सुरत विमानतळ आणि नंतर पुणे विमानतळ ते डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे या मार्गे ग्रीन कॉरीडॉर तयार करण्यात आले होते. हे अवयव एका ५३ वर्षीय महिलेवर प्रत्यारोपित करण्यात आले, जी कबूतरांच्या संपर्कात आल्याने तीव्र फुफ्फुसाच्या आजाराने (अतिसंवेदनशील न्यूमोनिटिस) ग्रस्त होती. रुग्णाला २० सप्टेंबर २०२३ रोजी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तीला श्वासोच्छवासामध्ये अडथळा निर्माण झाल्याने व्हेंटिलेटरीची आवश्यकता भासु लागली, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती आणि त्यांचे नाव दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी अवयवप्राप्तीच्या प्रतीक्षा यादीत नोंदविले होते. २८ सप्टेंबर २०२३ रोजी, रुग्णालयाला ROTTO आणि महाराष्ट्र SOTTO कडून पुणे ZTCC मार्फत योग्य अवयव दाता उपलब्ध असल्याची माहिती मिळाली, सुरत जिल्हा रुग्णालयामध्ये ४२ वर्षीय मेंदूमृत पुरुषाच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. आणि अवयवदानाच्या सहमतीने पुढील प्रक्रिया सुरु झाली. सूचना मिळाल्यावर, CVTS सर्जन, ट्रान्सप्लांट पल्मोनोलॉजिस्ट आणि इतर पॅरामेडिकल तज्ञ यांचा समावेश असलेले डॉक्टरांचे पथक ताबडतोब सुरतला रवाना झाले. सुरतच्या जिल्हा रुग्णालयामधून संध्याकाळी ४ वाजता अवयव काढण्यात आले आणि २ तास १५ मिनिटांत संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटाने डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे सुखरूप आणण्यात आले. तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचार्यांच्या संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नामुळे अवयव आणण्याची प्रक्रिया यशस्वी पार पडली.
अवयव योग्य कालावधीत काळजीपूर्वक तसेच योग्य वेळेवर नियोजनबद्ध, गतिशील प्रक्रियेने व्हावे यासाठी हवाई मार्गाने अवयव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरत आणि पुणे वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले. २९ सप्टेंबर २०२३ रोजी हे अवयव पुण्यात वेळेत पोहोचवण्यात आले आणि त्याच दिवशी यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रत्यारोपणानंतर रुग्णाने अवयवाला चांगला प्रतिसाद दिला असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल.
डॉ.पी.डी. पाटील, कुलपती डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, म्हणाले, “अवयव प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे लोकांना नवीन जीवन मिळते आणि असंख्य रुग्णांसाठी हे प्रत्यक्षात आणताना आम्हाला अभिमान वाटतो. आज बहु-अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक आरोग्य सुविधा आणि सक्षम कुशल डॉक्टरांच्या टीममुळे आम्ही आणखी रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास सज्ज आहोत. आणि, हे प्रकरण त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे.”
यावर भाष्य करताना डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, म्हणाले, “आमचे ध्येय डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे आरोग्य सुविधा सक्षम करणे हे आहे. ज्याला अत्याधुनिक पायाभूत सुविधांची जोड असेल, जे रुग्णांच्या गुंतागुंतीच्या परिस्थितींना हाताळण्यास मदत करेल आणि आवश्यक रुग्णांना नवजीवन भेट देण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने सक्षम आहोत. मी सुरत आणि पुण्याच्या वाहतूक पोलिस विभागांचे आभार मानते आणि आमच्या कुशल डॉक्टरांचे मनापासून अभिनंदन करते ज्यांच्यामुळे ही अवयवदानाची प्रक्रिया सुलभतेने पार पडली.”
डॉ.यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले, “मी यामध्ये सहभागी असलेल्या तज्ञ डॉक्टरांचा आभारी आहे आणि आणखी एक जटिल अवयव प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सहभागी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. आम्ही विविध गंभीर उपचारांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि ही एक ऐतिहासिक शस्त्रक्रिया त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, म्हणाल्या, “आम्ही आमच्या रुग्णालयामध्ये आधुनिक आरोग्य सुविधा आणि उत्तम अनुभवी तज्ञ डॉक्टरांनी सुसज्ज आहोत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा विकसित करणे आणि आमच्या रुग्णांना सर्वोत्तम दर्जाचे उपचार उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे. हा ग्रीन कॉरिडॉर एक संस्था म्हणून आमची कार्यक्षम पद्धतीची उत्कृष्टता दर्शवते. म्हणूनच आम्ही रुग्णांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन वैद्यकीय पर्यायी शक्यता शोधत असतो."
डॉ. संदीप अट्टावार, संचालक - हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, म्हणाले, “एक मौल्यवान जीव वाचवू शकलो हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. सूचना मिळताच आम्ही त्वरीत शस्त्रक्रियेचे नियोजन केले आणि महत्वाचे म्हणजे अवयव वेळेत उपलब्ध झाले. डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे आम्हाला अशा जटिल शस्त्रक्रिया सहजतेने पार पाडण्यासाठी सक्षम करतात.”