Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Corona diet: कोरोना संसर्ग झालेला असल्यास 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका

Corona diet: कोरोना संसर्ग झालेला असल्यास 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका
, शुक्रवार, 18 जून 2021 (16:06 IST)
अपर्णा राममूर्ती
कोरोनापासून रक्षण करण्यासाठी किंवा कोरोनावर उपचार म्हणून हळद किंवा काळी मिरी कशाप्रकारे उपयुक्त आहे, याबाबत आपण अनेक लेख वाचले असतील.
मात्र हळद आणि काळी मिरी उपयुक्त असण्याचं कारण काय, याची माहितीही आपण घेणं गरजेचं आहे.
कोरोना व्हायरस साथीच्या पहिल्या लाटेदरम्यान आपल्याला या विषाणूची ओळख झाली. पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचा प्रभाव तुलनेने जास्त दिसून आला.
दुसरी लाट ओसरल्यानंतर सध्या लॉकडाऊनमधून हळूहळू निर्बंधातून सूट देण्यात येत आहेत. पण तरीही कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे आपल्या सर्वांना चांगलंच माहीत आहे.
जरआपल्याला  कोरोनाचा संसर्ग झाला असेल, आणि आपण  कोरोनाचे उपचार घेत असाल, तर ही बातमी आपल्यासाठी  महत्त्वाची आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर आपल्याला आहारात काही आवश्यक बदल करावेच लागतात.
आपण घेत असलेल्या अन्नपदार्थांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. आपली प्रतिकारशक्ती पूर्णपणे आपल्या आहारावरच अवलंबून असते.
त्यामुळे प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते, हे विसरून चालणार नाही.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी तमीळच्या प्रतिनिधींनी आहारतज्ज्ञ मिनाक्षी बजाज यांच्याशी बातचीत केली. वाचकांच्या मनातील अनेक प्रश्नांना बजाज यांनी उत्तरं दिली.
प्रश्न - कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी कशा प्रकारचं अन्न ग्रहण करावं? हळद आणि काळी मिरी यांचं सेवन यावेळी महत्त्वाचं मानलं जातं, ते कशामुळे?
 
उत्तर - कोरोना साथीच्या काळात आपल्या प्रतिकारशक्तीबाबत खूप चर्चा झाली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या प्रतिकारशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारच्या आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे.
आपल्या आहारात अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण मुबलक असावं. ते शरीरात शोषलं जाण्यासाठी ऑक्सिजन रॅडिकल अॅबसॉर्बन्स कॅपॅसिटी (ORAC) व्हॅल्यू जास्त असलेले पदार्तथ शरीरात जायला हवेत. जीरा, हळदी, दालचिनी, काळी मिरी, शेवग्याची पाने, कोकोआ यांसारख्या मसाल्याच्या पदार्थ्यांचा आहारात समावेश असावा.
या पदार्थांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. विशेषतः कोरोना काळात तर हे पदार्थ आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत.
पण मुख्य मुद्दा म्हणजे यांचं प्रमाण किती असावं. रोगप्रतिकारशक्तीच्या दृष्टिकोनातून त्यांची शरीराला किती गरज आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
उदाहरणार्थ, हळद. जेवण बनवताना आपण हळदीचा वापर साधारणपणे करतो. त्याव्यतिरिक्त सकाळी आणि रात्री प्रत्येकी दोन चिमूटभर हळद आपण घेऊ शकतो. मात्र, यापेक्षा जास्त प्रमाणात हळदीचं सेवन केल्यास त्याचा यकृतावर परिणाम होऊ शकतो. यकृताला सूज येण्याचे प्रकार त्यामुळे घडू शकतात.
हळदीचं सेवन करताना सोबतच काळ्या मिरीचंही सेवन करणं महत्त्वाचं आहे. कारण मिरपूडमध्ये आढळून येणारं पेप्रीन हे मूलद्रव्य हळदीतील कुर्कुर्मिनसोबत संयोग साधून प्रभावी बनतं.
म्हणजेच, तुम्ही हळद टाकून दूध पिणार असाल तर किंचित मिरपूड टाकली तर उत्तम. हाच नियम दालचिनीलाही लागू आहे.
आपण तीन महिन्यांपर्यंत रोज प्रत्येकी 2-4 चिमूट दालचिनी पावडरचं सेवन करू शकतो. यापेक्षा जास्त काळ त्याचं सेवन करू नये.
शेवग्यांच्या पानांचंही तसंच. यामध्ये क जीवनसत्व, लोह, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात आढळून येतं. याशिवाय शेवग्यांच्या पानांची ORAC व्हॅल्यूही खूप जास्त आहे.
हे अन्नपदार्थ कोरोनापासून बचाव करण्यासाठी तसंच कोरोना उपचारादरम्यान प्रकृती वेगाने सुधारण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात.मात्र, त्याचा अर्थ उत्तम रोगप्रतिकारशक्तीसाठी फक्त हेच पदार्थ पुरेसे आहेत, असंही नाही.
आपल्या शरीराला सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांची आवश्यकता आहे. सर्व प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनरल आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत.
 
प्रश्न - कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांनी तरल पदार्थांचं जास्त सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्या प्रकारचे पेयपदार्थ आपल्यासाठी उपयुक्त आहेत?
 
उत्तर - आवळा किंवा गुजबेरीचा रस कधीही चांगला. साखर, मध किंवा गुळ न घालता या रसाचं सेवन केलं तर ते आपल्यासाठी खूपच आरोग्यदायी ठरतं.
त्याशिवाय, शेवग्यांची पाने, टोमॅटो, विविध प्रकारच्या भाज्या यांचं सूप, सांबार किंवा गरम दूध हे पदार्थ आपण घेऊ शकतो.
सफरचंद, बीट तसंच गाजर यांचा ज्यूसही आपल्याला घेता येईल. पण कोणतेही ज्यूस तयार करताना साखरेचा वापर टाळला पाहिजे. एका दिवसाआड आपण ज्यूस पिऊ शकतो.
शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण योग्य राखण्यासाठी ते उपयोगी ठरू शकतात. पण फक्त बीटचा ज्यूस पिऊन गंभीररित्या आजारी असलेले व्यक्ती लगेच ठणठणीत बरे होतील, असं नाही.
हे पदार्थ गंभीर रुग्ण नव्हे तर होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांसाठी तसंच इतर व्यक्तींसाठी उपयोगी आहेत. सोबतच सतत पाणी पित राहाणंही प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे.
प्रश्न - कोरोना संसर्ग झाल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत?
 
उत्तर - सर्वात धोकादायक म्हणजे मद्य. कोरोना झाल्यानंतर मद्याचं सेवन अजिबात करू नये. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शिवाय त्यामुळे अस्वस्थताही वाढते.
तसंच कोरोना संसर्ग झाल्यानंतर कोल्डड्रिंक, आईसक्रिम, पॅकबंद नारळपाणी, दुधाचा वापर केलेली किंवा साधी मिठाई यांसारखे पदार्थ टाळायला हवेत. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे शरीरातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. म्हणजेच ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं.
कोरोनामुळे फुफ्फुसांवर परिणाम झालेल्या व्यक्तींसाठी हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. कोरोनाची लक्षणे सौम्य असली तरी हे पदार्थ टाळलेलंच बरं असतं. त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या समस्या आपण टाळू शकतो.
त्याशिवाय मैद्यापासून बनवण्यात आलेले पदार्थ म्हणजेच नूडल्स, पास्ता, ब्रेड, बिस्किट खाणं टाळलं पाहिजे. पोषणयुक्त आहाराला आपण या काळात प्राधान्य दिलं पाहिजे. शरीरासाठी कार्बोहायड्रेटही आवश्यक असतं. पण ते अत्यल्प प्रमाणात घेतलं तरी पुरेसं असतं. या कालावधीत आपण भात खाणं कमी करू शकतो.
काही लोकांमध्ये डायरिया, उलटी यांसारखी लक्षणे दिसून येतात. त्यांनी पॅकबंद नारळ पाणी घेतलं तर काही हरकत नाही.
प्रश्न - कोरोना रुग्णांनी मांसाहार करावा का?
 
उत्तर - घरात शिजवलेलं मांस खाल्यास हरकत नाही. पण मांस योग्यरित्या शिजवलेलं पाहिजे. शिवाय ते ताजं-ताजं खाल्लं तर चांगलं.रुग्णांसाठी अंडी कोणत्याही परिस्थितीत चांगली.
मात्र, ऑम्लेट न करता उकडून खाल्लं तर शरीरासाठी ते उपयुक्त ठरतं.
पुरेसं शिजवलेलं चिकन आणि मासेही उत्तम. मात्र तुम्हाला डायरिया किंवा उलटीसारखा त्रास जाणवत असल्यास मांसाहार टाळावा.
 
प्रश्न - कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये नैराश्य आणि अस्वस्थता ही लक्षणे जाणवतात. त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य ठरतो?
 
उत्तर - अशा रुग्णांकरिता दहीभात उपयुक्त असतो. कोमट पाण्यात दही घालून खाऊ शकता.
डार्क चॉकलेट (नट्ससह) आणि रात्री झोपण्याआधी दूध पिणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं.
मधुमेहाचे रुग्ण आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी डार्क चॉकलेटचं सेवन करणं टाळावं.
 
प्रश्न - कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांनी योग्य आहार घेणं का महत्त्वाचं आहे?
 
उत्तर - कोरोना काळात आपली रोगप्रतिकारशक्ती हीच आपली तारणहार असते. ती वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार.त्यामुळेच आपण पोषक आहार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.
योग्य पोषकतत्वे शरीरात न गेल्यास रोगप्रतिकारशक्ती मंदावते. त्यामुळे इतर व्याधींनी आपल्याला ग्रासलं जातं.
पण आपली रोगप्रतिकारशक्ती फक्त आहारावरच अवलंबून नाही, हेसुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं.
आपल्या शरारीतील गुणसूत्रे, पर्यावरण, आजपर्यंतचा आहार या गोष्टींची त्यामध्ये प्रमुख भूमिका असते.
त्यामुळे सातत्याने पोषक अन्नपदार्थांचं सेवन करण्यालाच आपण प्राधान्य दिलं पाहिजे.
फळे, भाजीपाला, मांस यांचा समावेश असलेला परिपूर्ण आहार घ्यावा.
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Motivational Tips मानसिक शांती हवी असेल तर या 10 गोष्टी करा