Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फिटनेसः ग्रीन पावडर, ग्रीन सप्लिमेंट्समुळे आरोग्य सुधारतं का? वाचा

Webdunia
बुधवार, 6 मार्च 2024 (11:08 IST)
फिटनेस बाजारात आजकाल सुपर ग्रीन सप्लिमेंट्सचं फॅड निघालं आहे. या सप्लिमेंट्स विकणाऱ्या कंपन्या ही मॅजिक पावडर असल्याचा दावा करतात. ही पावडर नुसत्या पाण्यात मिसळून प्यायल्याने लोकांचं आरोग्य सुधारतं असं त्यांचं म्हणणं आहे.
 
ही पावडर खाणारे लोकही याच्या संभाव्य फायद्यांची भली मोठी यादीच देतात. जसं की, यामुळे केस मजबूत होतात, नखं सुंदर राहतात, शरीराला ताकद मिळते आणि शरीरावरील सूज कमी होते.
 
या पावडरच्या पॅकेजिंगवरही प्री आणि प्रोबायोटिक्स, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे यासारख्या घटकांच्या सूची दिलेली असते.
 
परंतु तज्ज्ञांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, हे पोषक घटक आपल्या आहारातून अगदी सोप्या आणि स्वस्त पद्धतीने मिळवता येतात.
 
एनएचएसमध्ये नोंदणीकृत आहारतज्ञ तमसिन हिल सांगतात की, त्यांनी पहिल्यांदा सोशल मीडियावर अशा पावडरची जाहिरात पाहिली.
 
या ग्रीन सप्लिमेंट्सच्या बाजारात ऍथलेटिक ग्रीन्स पहिल्या क्रमांकावर आहे. या व्यवसायाचं मूल्य 94.5 कोटी युरो इतकं आहे. ही कंपनी दावा करते की त्यांची सुपरफूड पावडर एजी 1 घेतल्याने लोकांना अधिक उत्साही वाटतं, त्यांची त्वचा तुकतुकीत दिसू लागते.
 
बीबीसीशी बोलताना तमसिन हिल सांगतात की, "मी पॅकेटच्या मागील बाजूस घटकांचे जे तपशील दिले होते ते पाहिले. ते पाहून मला असं वाटलं नाही की हे घटक तुमच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकतील."
 
2021 मध्ये बीबीसीच्या ड्रॅगन्स डेन या कार्यक्रमात रिअल सुपरफूड्स या कंपनीने सहभाग घेतला होता. या कंपनीने दावा करताना असं म्हटलं होतं की, त्यांची सुपर ग्रीन पावडर पचन, आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहाण्यासाठी सुद्धा चांगली आहे.
 
फ्री सोल या कंपनीच्या एफएस ग्रीन्स पावडरवर देखील असेच दावे करण्यात आलेत. यात अश्वगंधा, गोल्डन किवी आणि मका यांसारख्या प्रमुख घटकांद्वारे पचन आणि रोगप्रतिकार शक्ती प्रदान करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
ऍथलेटिक ग्रीन्सच्या प्रवक्त्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आमच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या टीमने एजी 1 साठी निर्मिती आणि सुधारणा प्रक्रियेचा भाग म्हणून हजारो अभ्यासांचे पुनरावलोकन केले आहे."
 
तर फ्री सोल टीमने सांगितलं की, त्यांच्या उत्पादनात "वैद्यकीयदृष्ट्या अभ्यास केलेल्या आणि पेटंट केलेल्या घटकांचा समावेश आहे."
 
दुसरीकडे बीबीसीने रियाल सुपरफूड्सशी देखील संपर्क केला होता. यावर त्यांनी सांगितलं की, ते त्यांच्या ऑनलाइन मार्केटिंगमध्ये कोणतेही वैज्ञानिक दावे करत नाहीत.
 
फूड स्टँडर्ड्स असोसिएशनने या उत्पादनांना ब्रिटनमध्ये विक्रीची परवानगी दिली आहे.
 
'आपल्या आरोग्याशी संबंधित चिंतेवर परिणाम'
विशेषतः या तीन उत्पादनांचे विश्लेषण करताना मिस हिल म्हणतात, "आपण संशोधन पाहिल्यास, या दाव्यांना वैज्ञानिक आधार मिळत नाही आणि त्यांच्याकडे असलेले पुरावे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत."
 
त्या पुढे सांगतात, "हा अभ्यास खूपच मर्यादित आहे. यापैकी बऱ्याच जणांचा अभ्यास केवळ एका पेट्री डिश पुरता मर्यादित आहे."
 
मिस हिल सांगतात की, त्यांना असं वाटतं अल्ट्रा-प्रोसेस्ड म्हणून गणली जाणारी या उत्पादनांची निर्मिती गुंतागुंतीची आहे. यामुळे आपल्या आरोग्याशी संबंधित चिंतेवर परिणाम होतोय.
 
आहारतज्ञ म्हणून स्वतःच्या अनुभवावरून त्या सांगतात की, "तरुण पिढ्या त्यांच्या आरोग्याबाबत अधिकाधिक जागरूक होत आहेत. लोकांच्या आरोग्याबाबत असलेल्या चिंतेचा गैरफायदा घेऊन पैसे खर्च करण्यासाठी त्यांची दिशाभूल केली जात आहे."
 
नोंदणीकृत पोषणतज्ञ आणि लेखिका जेना होप म्हणतात की, त्यांना सुरुवातीला सुपर ग्रीन उत्पादनांविषयी एक विशिष्ट आकर्षण वाटतं. बाजारात ही उत्पादनं मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. याचा अर्थ लोक याची खरेदीही मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
 
एका उद्योगाच्या अंदाजानुसार ग्रीन पावडरची बाजारपेठ 2023 मध्ये 22 कोटी युरोवरून 2030 पर्यंत जवळपास 39.5 कोटी युरो इतकी दुप्पट होईल.
 
होप बीबीसीशी बोलताना सांगतात, "याविषयी बाजारात दिशाभूल करणारी माहिती मिळते. तुम्हाला असं वाटत राहतं की निरोगी राहण्यासाठी, तुमच्या आतड्यांचे आरोग्य, ऊर्जा आणि झोप यासाठी या पावडरची नितांत गरज आहे."
 
"पण खरं तर तुम्ही निरोगी आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला त्याचे जास्त फायदे मिळू शकतात. महागड्या अशा या ग्रीन पावडरचे सेवन करण्याची काहीच गरज नाही."
 
'हे तर आठवडाभराच्या किराणा मालाचं बजेट'
सुपर ग्रीन पावडर सप्लिमेंट्सची किंमत वेगवेगळी असते. पण तुम्ही कोणती पावडर निवडता यावर तुम्हाला दिवसाला 90 ते 360 रुपयांचा खर्च येतो.
 
होप म्हणतात, "काही लोकांसाठी ते आठवडाभराच्या किराणा मालाचं बजेट असू शकतं."
 
"त्याऐवजी आपण भरपूर फळे, भाज्या, फ्रोजन पालक, हिरव्या भाज्या, बीन्स, मसूर, तृणधान्य, कडधान्ये खाण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि हे खरोखरच परवडणारं आहे."
 
होप सांगतात की, प्रोसेस शुगर, कृत्रिम स्वीटनर्स आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचे सेवन कमी केल्यास तुमच्या आरोग्यावर खरोखरच सकारात्मक परिणाम होईल.
 
'आहारात पथ्य पाळणाऱ्या लोकांसाठी फायद्याचं'
मिस हिल म्हणतात की, या सप्लिमेंट्समध्ये त्यांच्या दाव्यांना बळ देईल असं विज्ञान नसलं तरी त्या सप्लिमेंट्स शरीरासाठी हानिकारक नाहीत, त्यामुळे ज्यांना याचं सेवन करायचं आहे ते करू शकतात.
 
होप म्हणतात की, "आपण याचं सेवन करतोय हा विचार करूनच काही लोक निरोगी मानसिकतेत राहू शकतात".
 
"म्हणून जर तुम्ही तुमचा दिवस या हिरव्या पावडरसह सुरू केला, तर तुम्हाला आरोग्यदायी निवड केल्याबद्दल आणखीन आत्मविश्वास वाटू लागेल. पण ही पावडर तुम्हाला निरोगी बनवेलच असं नाही."
 
 
ज्या लोकांकडे वेळेची कमतरता आहे ते लोक याचं सेवन करू शकतात असंही होप यांनी सांगितलं.
 
त्या पुढे सांगतात की, "वास्तवात सगळ्यांसाठी एकच गोष्ट काम करेल असं नसतं. जर एखादा व्यक्ती अत्यंत तणावपूर्ण काम करत असेल तर त्याच्यासाठी हे थोड्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतं."
 
ज्यांना आहारात पथ्य असतात अशा लोकांसाठी देखील ते फायद्याचं ठरू शकतं.
 
निरोगी आहारासाठी टिप
ब्रिटिश डायटेटिक असोसिएशनचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या निकोला लुडलम-राईन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आपल्या शरीराला पोषण मिळावं यासाठी सर्व प्रकारचे अन्न आहारात असणं आवश्यक आहे."
 
ग्रीन सप्लिमेंट्स आरोग्यासाठी किंवा निरोगी आहारासाठी आवश्यक आहेतच असं नाही.
 
निरोगी आहारासाठी शिफारस करताना त्यांनी सांगितलं आहे की, "लोकांनी आठवड्यातून वेगवेगळ्या पालेभाज्यांचं सेवन करावं. आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. तृणधान्य, मोड आलेले कडधान्य यांचाही आहारात समावेश करावा. पण ज्यांना ग्रीन सप्लिमेंट घ्यायचे आहेत त्यांनी प्रथम आहारतज्ञ किंवा नोंदणीकृत पोषणतज्ञांचा सल्ला घ्यावा."
 
Published By- Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments