Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IBD: इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज या पोटाच्या गंभीर आजारामागचं प्रमुख कारण संशोधकांच्या हाती

Webdunia
शुक्रवार, 7 जून 2024 (16:10 IST)
इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज (IBD) हा आतड्यांचा गंभीर आजार होण्यामागचं प्रमुख कारण युकेच्या संशोधकांनी शोधून काढलं आहे.हा आजार असलेल्या लोकांपैकी 95 टक्के जणांच्या डीएनएमध्ये संशोधकांना एक कमकुवत ठिपका आढळला आहे.
 
त्यामुळे काही रोगप्रतिकार पेशींना आतड्यांमध्ये अतिरिक्त इन्फ्लेमेशन (एक प्रकारची सूज, जळजळ, दाह) निर्माण करणं शक्य होतं.
 
संशोधकांच्या टीमला आधीच अस्तित्वात असणारी औषधे सापडली आहेत, जी या आजाराला बरं करत असल्याचं प्रयोगशाळेतून प्रयोगांमध्ये दिसून आलं आहे. या औषधांची आता मानवी शरीरावर चाचणी घेतली जाणार आहे.
 
क्रोन्स डिसिज (Crohn’s disease) आणि अल्सरेटीव्ह कोलायटीस (ulcerative colitis)हे इन्फ्लमेटरी बॉवेल डिसिज म्हणजे आतड्यांच्या आजाराचे सर्वाधिक आढळणारे प्रकार आहेत.
 
युकेमधील जवळपास पाच लाख लोकांना हा आजार होत असल्याचा अंदाज आहे.
किशोर वयात किंवा तरुणपणात या आजाराची अनेकदा सुरूवात होते.
 
27 वर्षांची लॉरेन गोलाइटली हिच्यामध्ये ती 16 वर्षांची असताना या आजाराची लक्षणं पहिल्यांदा आढळून आली होती. त्यावेळेस तिच्या पोटात पेटके यायचे आणि विष्ठेतून रक्त यायचं.
 
मात्र पार्टी केल्यामुळं हा त्रास होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र ती 21 वर्षांची असताना शस्त्रक्रिया करून तिचं अॅपेंडिक्स काढावं लागलं होतं आणि त्यावेळेस डॉक्टरांच्या लक्षात आलं होतं की तिला क्रोन्स डिसिज झाला आहे.
 
तीन वर्षांपूर्वी तिच्या आतड्यांचा काही भाग निकामी झाल्यामुळे तिला विष्ठा बाहेर टाकण्यासाठी एका शस्त्रक्रियेद्वारे एक कृत्रिम पिशवी (Emergency Stoma) बसवावी लागली होती. आणि तिला अजूनही शस्त्रक्रियांची आवश्यकता असल्यामुळे खूप वेदनादायी उपचार घ्यावे लागतात.
 
"मला ज्या पद्धतीने जीवन जगायचं होतं, ते हे जीवन नाही," असं ती म्हणते
 
मग नेमकं कुठं चुकतं आहे?
इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज (IBD)या आजारात रोगप्रतिकार व्यवस्थेचा अत्यंत गुंतागुंतीचा एक भाग म्हणजे मॅक्रोफेजेस नावाच्या पांढऱ्या रक्त पेशी.
 
या पेशी आतड्याच्या आतील भागाला म्हणजे अस्तरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात आणि सायटोकाइन्स नावाचं रसायन सोडतात. यातून मोठ्या प्रमाणात इन्फ्लेमेशन होतं म्हणजे खूप जास्त प्रमाणात जळजळ होते किंवा वेदना होतात.
 
जळजळ होणं किंवा वेदना होणं हा संसर्ग झाल्यानंतरचा शरीराच्या सामान्य प्रतिसादाचा एक भाग असतो. मात्र खूपच जास्त प्रमाणात जळजळ होणं किंवा वेदना होत असल्यास त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.
 
फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट अॅंड युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील संशोधकांच्या गटानं इन्फ्लेमेटरी बॉवेल डिझीज (IBD)या आजाराचं कारण शोधण्याचा प्रयत्न करताना सखोर जनुकीय किंवा अनुवांशिक विश्लेषण केलं.
यातून त्यांना आढळलं की डीएनएचा एक भाग इन्फ्लेमेशन नियंत्रित करणारा मॅक्रोफेजेसचा मुख्य घटक असतो.
 
"तो पिरॅमिडच्या सर्वात वर असतो," असं फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटचे डॉ. जेम्स ली म्हणतात.
 
इन्फ्लेमेशनसाठी कारणीभूत असणारी रसायनं जी मायक्रोफेजेसकडून स्त्रवत असतात त्याचं नियंत्रण हा जीन किंवा जनुक करतो. काही लोकांमध्ये जन्मत:च हे जनुक असतं ज्यामुळे त्यांच्या शरीराची प्रवृत्ती हा आजार होण्याची असते.
 
डॉ. ली यांनी मला सांगितलं की ज्या लोकांना इन्फ्लेमेटरी बॉवेल डिझीज (IBD)हा आजार होतो त्यांच्या शरीरात जे काही चुकीचं घडतं त्यात हा मध्यवर्ती भाग असतो.
 
या प्रक्रियेमुळे इन्फ्लेमेटरी बॉवेलसाठी कारणीभूत असलेल्या महत्त्वाच्या पेशींपैकी एका पेशीमध्ये दोष निर्माण होतो.
 
जग इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज पासून मुक्त होईल का?
 
नेचर या मासिकात विस्तारानं दिलेल्या माहितीनुसार पुढील प्रयोगांमधून दिसून आलं आहे की कॅन्सर सारख्या इतर आजारांसाठी आधीच मंजूरी मिळालेल्या काही औषधांमुळे या आजारावर नियंत्रण मिळवता येतं.
 
इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज हा आजार झालेल्या रुग्णांकडून घेण्यात आलेल्या नमुन्यांवर त्याचे प्रयोग करण्यात आले आहेत.
 
"या आजारात कसं आणि का चुकीचं घडतंय फक्त एवढंच फक्त आमच्या लक्षात आलेलं नाही तर या आजारावर उपचार करण्याचा संभाव्य नवीन मार्गदेखील आम्हाला सापडला आहे," असं डॉ. ली म्हणाले. ते रॉयल फ्री हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत.
 
मात्र अजूनही आतड्यांच्या या आजारावर तात्काळ स्वरुपात नवीन इलाज उपलब्ध असणार नाही.
 
संशोधकांना जरी आधीच अस्तित्वात असलेल्या औषधांमध्ये या आजारावर उपचार करण्याची क्षमता दिसून आली असली तरी या आजारात मॅक्रोफेजेसवर उपचार करताना शरीरात इतर साईड इफेट्स होणार नाहीत यावर त्यांना मार्ग शोधायचा आहे.
 
त्याचबरोबर या आजारावर औषधं अतिशय योग्यरित्या परिणामकारक ठरण्याबाबत खातरजमा करणं आवश्यक आहे आणि आजारावर उपचार करताना रुग्णांची चांगल्या इन्फ्लेमेशन बाजू निकामी होऊन रुग्ण संसर्गास संवेदनाक्षम होता कामा नये हे देखील पाहावं लागणार आहे.
 
पाच वर्षांमध्ये या संदर्भातील वैद्यकीय चाचण्या सुरू करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.
 
"हे संशोधन म्हणजे क्रोन्स डिसिज आणि कोलायटीस पासून जगाला एक दिवस मुक्त करण्याच्या शक्यतेच्या दिशेने खरोखरंच एक उत्साहवर्धक पाऊल आहे," असं क्रोन्स अॅंड कोलायटीस युके या संस्थेचे रुथ वेकमन यांनी सांगितलं.
 
त्या पुढे म्हणाल्या की, "क्रोन्स आणि कोलायटीस हे गुंतागुंतीचे आजार आहेत. रुग्णांना या आजारांना आयुष्यभर तोंड द्यावं लागतं आणि ते पूर्ण बरे करण्यावर सध्या उपचार नाही. मात्र या प्रकारच्या संशोधनामुळे हे आजार का होतात यासारख्या काही मोठ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यास मदत होते."
 
मात्र जनुकीयदृष्ट्या संवेदनाक्षम असणं हा कथेचा अर्धा भाग आहे. मात्र हा आजार होण्यासाठी आणखी काही गोष्टी घडाव्या लागतात. यात आहार आणि अॅंटिबायोटिकचा वापर देखील महत्त्वाचा असतो.
 
इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज (IBD)ची लक्षणं
डायरिया
पोटात वेदना किंवा पेटके येणं
विष्ठेतून रक्त येणं
गुदद्वारातून रक्त येणं
थकवा जाणवणं
काही कारण नसताना वजन कमी होणं
जरी या आजाराची काही लक्षणं इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) या आजारासारखी दिसत असली तरी हा आजार वेगळा आहे. इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज (IBD) हा आजार झाल्याचं निदान तेव्हाच करता येतं जेव्हा बॉवेल्समध्ये इन्फ्लेमेशन होतं म्हणजे आतड्यांमध्ये जळजळ होते किंवा वेदना होते.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख