Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मासिक पाळीच्या काळात मेन्स्ट्रुअल कपचा पर्याय खात्रीचा?

मासिक पाळीच्या काळात मेन्स्ट्रुअल कपचा पर्याय खात्रीचा?
पाळीच्या काळामध्ये सर्व स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध व्हावेत, ते सर्वांना परवडणारे असावेत म्हणून त्याच्या किंमती कमी असाव्यात यासाठी भारतामध्ये गेल्या काही काळामध्ये अनेक मोहिमा राबवण्यात आल्या.
 
त्याचे परिणामही हळुहळू दिसायला लागले. पण सॅनिटरी नॅपकिन्ससाठीचा खर्च दर महिना आणि अनेक वर्षांसाठी करावा लागतो. शिवाय वापरल्यानंतर त्याची योग्य रितीने विल्हेवाट लावणं हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
 
या सगळ्याचं उत्तर कदाचित ठरू शकतात ते - मेन्स्ट्रुअल कप्स. हे कप्स आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत, वापरायला सोपे आहेत आणि शिवाय असा कप विकत घेण्यासाठी एकदा खर्च केल्यास पुढची काही वर्षे कोणताही खर्च करावा लागत नाही.
 
पाळीदरम्यान महिलांकडून वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्स, टॅम्पॉन्स आणि मेन्स्ट्रुअल कपचा वैज्ञानिक अभ्यास संशोधकांनी केला. आणि त्यानंतर हे मेन्स्ट्रुअल कप्स टॅम्पॉन किंवा पॅड्सइतकेच सुरक्षित असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे.
 
पाळी दरम्यान होणारा रक्तस्राव सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पॉन्समध्ये शोधून घेतला जातो. मेन्स्ट्रुअल कप्स हे रक्त गोळा करतात.
 
टॅम्पॉनप्रमाणेच हे मेन्स्ट्रुअल कप्स योनीमध्ये बसवले जातात, पण हे कप्स पुन्हा वापरता येतात.
 
सध्या खरंतर अशा मेन्स्ट्रुअल कप्सची लोकप्रियता वाढत आहे. पण महिलांमध्ये या पर्यायाबद्दल फारशी सजगता नसल्याचं पाहणीमध्ये आढळून आलं.
 
'लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नल'मध्ये हा अभ्यास छापण्यात आला आहे. विविध श्रीमंत आणि गरीब देशांमध्ये करण्यात आलेल्या 43 अभ्यासांमध्ये या देशांतल्या 3300 महिला आणि तरुणी सामिल झाल्या होत्या.
 
मेन्स्ट्रुअल कप्स वापरताना - घालताना आणि काढताना वेदना होतील, कदाचित तो गळेल किंवा योनीला इजा होईल अशा शंका सर्वांत जास्त उपस्थित करण्यात आल्या.
 
पण प्रत्यक्षामध्ये अशा फारशा घटना घडल्या नसल्याचं पाहणीदरम्यान आढळलं.
 
हे मेन्स्ट्रुअल कप्स कसे वापरायचे आणि ते नेमके कसं काम करतात हे एकदा समजल्यानंतर 70% महिलांना इतर पर्यायांपेक्षा ते वापरण्यात रस असल्याचं 13 अभ्यास पाहण्यांमध्ये समोर आलं.
 
300 महिलांनी या अभ्यासात सहभाग घेतला. त्यात असं लक्षात आलं की मेन्स्ट्रुअल कप्स आणि पॅड्स आणि टॅम्पॉन्समधल्या 'लीकेज' (रक्त बाहेर येणं, गळणं)चा अभ्यास करण्यात ला. यातल्या 3 पाहण्यांमध्ये या तीनही पर्यायांमध्ये लीकेजचं प्रमाण समान आढळलं तर चौथ्या पाहणीमध्ये मेन्स्ट्रुअल कप्स वापरताना तुलनेने कमी प्रमाणात रक्त बाहेर येत असल्याचं आढळलं.
webdunia

 
मेन्स्ट्रुअल कप्स काम कसे करतात?
अतिशय मऊ आणि लवचिक रबर किंवा सिलिकॉनचा वापर करून मेन्स्ट्रुअल कप्स तयार केले जातात.
 
ते योनीच्या आतमध्ये सरकवल्यानंतर सक्शनमुळे (हवा काढून घेत) एकप्रकारचं सील तयार होतं आणि रक्तस्राव बाहेर न येता या कपमध्ये गोळा होतो.
 
टॅम्पॉन किंवा सॅनिटरी पॅड्सपेक्षा जास्त रक्त गोळा करण्याची या मेन्स्ट्रुअल कप्सची क्षमता असते. पण दर ठराविक कालावधीनंतर ते बाहेर काढून रक्ताचं विसर्जन करून ते स्वच्छ करणं गरजेचं असतं.
 
मेन्स्ट्रुअल कप्सचे दोन प्रकार आहेत - व्हजानल कप (Vaginal cup) - बेलच्या आकाराचा कप जो योनीमार्गात सुरुवातीलाच बसवला जातो आणि सर्व्हिकल कप (Cervical Cup) जो आणखी आतमध्ये बसवला जातो आणि गर्भनिरोधकाच्या पडद्यासारखा असतो.
 
'मी एक कप 20 वर्षं वापरला'
62 वर्षांच्या कॅथरिना पेटिट-व्हॅन होय या स्पेनमधल्या हेमेल हेम्पस्टीड ऍण्ड वॅलेन्शियामध्ये राहतात. एका मैत्रिणीकडून मेन्स्ट्रुअल कपविषयी समजल्यानंतर आपण 1980च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये कप वापरायला सुरुवात केली आणि पुढची अनेक दशकं मेन्स्ट्रुअल कप वापरल्याचं त्या सांगतात.
 
"त्याची सवय व्हायला जरा वेळ लागला, पण एकदा ते कसे वापरायचे हे समजल्यावर मी इतर पर्याय वापरलेच नाहीत," त्यांनी सांगितलं.
 
"ते खूप सोपं होतं. माझे पैसेही वाचले आणि पर्यायवरणाच्या बचावामध्ये माझा लहानसा हातभारही लागला."
 
त्या पुढे सांगतात, "20 वर्षांपेक्षा जास्त काळ मी पाळीदरम्यान तो एकच मेन्स्ट्रुअल कप वापरला. मी तो मी साबणाने तो व्यवस्थित धूत असे, पण तो कधी स्टरलाईज (निर्जंतुकीकरण) केला नाही, कदाचित हे अयोग्य असू शकतं."
 
सार्वजनिक शौचालयांमध्ये मेन्स्ट्रुअल कप धुण्यासाठी त्यांनी कधी अपंगांसाठीच्या टॉयलेट्सचा वापर केला किंवा 'जोपर्यंत वॉश बेसिनजवळ कोणाचाही आवाज येत नाही, तोपर्यंत वाट पाहिल्याचं' त्या सांगतात.
 
गेली 10 वर्षं आपण मेन्स्ट्रुअल कप वापरत असून इतर पर्याय वापरण्याचा विचारही मनात आला नसल्याचं मँचेस्टरच्या 31 वर्षांच्या मार्टिना फ्रॅटरनली म्हणतात.
 
"दर वेळीच स्वच्छ पाणी असणारं सिंक उपलब्ध असेलच असं नाही, म्हणून त्यावेळी हा पर्याय थोडाचा अवघड ठरू शकतो. पण यामुळे वाचणारा खर्च आणि पर्यायवरणाची टळणारी हानी लक्षात घेता या अडचणी फार लहान आहेत."
 
"मेन्स्ट्रुअल कप इतका सोयीचा आणि कम्फर्टेबल असतो की तुम्ही तो घातला आहे हे बहुतेकदा लक्षातही राहत नाही."
 
"मी नक्कीच असा कप वापरण्याचा सल्ला देईन आणि वर हे देखील म्हणेन की सध्याच्या काळात पर्यावरणाची चिंता भेडसावत असताना अशा मेन्स्ट्रुअल कपवर करसवलत मिळायला हवी आणि इतर पर्यायांपेक्षा या कप्सचा प्रचार-प्रसार जास्त व्हायला हवा."
 
मेन्स्ट्रुअल कप वापरायचा कसा?
तुमच्या शरीरासाठी योग्य त्या साईझचा कप घ्या. तुम्हाला पाळीदरम्यान किती रक्तस्राव होतो, यावर कपची साईझ अवलंबून नसते.
 
हा कप स्वच्छ आणि कोरडा असल्याची खात्री वापरण्याआधी करून घ्या.
 
कप दुमडा आणि योनीच्या आत घाला. आतमध्ये हा कप उघडेल आणि एक लीक - प्रुफ (ज्यातून गळती होणार नाही असं) सील तयार होईल.
 
बाहेर काढण्यासाठी कपची खालची बाजू दाबा आणि सील मोकळं करा.
 
टॉयलेटमध्ये या कपमधल्या रक्तस्रावाचं विसर्जन करा आणि कप स्वच्छ करण्यासाठी तो धुवा वा पुसून काढा.
 
दोन पाळींच्या दरम्यान हा कप स्टरलाईज (निर्जंतुक) करा.
 
जमणार नाही असं वाटतंय?
मेन्स्ट्रुअल कप्सचे विविध ब्रँड्स उपलब्ध आहेत. पण हा मेन्स्ट्रुअल कप सर्वांनाच वापरता येईल असं नाही. याची सवय होऊन कप वापरण्याचा आत्मविश्वास येण्यासाठी कदाचित अनेक प्रयत्न करावे लागतील.
 
रॉयल कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सदस्य आणि गायनॅकॉलॉजी नर्स कन्सलटंट असणाऱ्या डेब्रा हॉलोवे म्हणतात, "बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत आणि आपल्यासाठी काय योग्य आहे चिकाटीने शोधून काढणं गरजेचं आहे."
 
तज्ज्ञांच्या मते महिलांनी काय वापरावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हा निर्णय घेण्यासाठी त्यांना सर्व उपलब्ध पर्यायांविषयीची योग्य माहिती, सल्ला आणि पुरावे देणं गरजेचं आहे.
 
लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनच्या प्राध्यापक पेनेलोप फिलिप्स-हॉवर्ड या संशोधनाच्या मुख्य लेखिका आहेत. त्या म्हणतात, "सध्या जगभरातल्या 1.9 बिलियन (दशकोटी) महिला या पाळी येत असलेल्या वयांतल्या आहे. वर्षभरात साधारण एकूण 65 दिवस त्यांना पाळीदरम्यान रक्तस्राव होतो. असं असूनही पाळीसाठी उपलब्ध असलेल्या साधनांचा सखोल अभ्यास आणि माहिती फारशी उपलब्ध नाही."
webdunia
मेन्स्ट्रुअल कप हे पॅड्स आणि टॅम्पॉन्सपेक्षा स्वस्त आहेत का?
12 ते 52 वर्ष वयांतल्या मूल न झालेल्या महिलेला साधारणपणे 480वेळा पाळी येत असल्याचा NHSचा अंदाज आहे.
 
एका कपची किंमत स्वस्तात मिळणाऱ्या पॅड्सच्या पाकिटापेक्षा जास्त असू शकते. पण हा कप दर महिना वापरता येतो आणि 10 वर्षांपर्यंत टिकतो. यामुळे मोठ्या कालावधीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास हा कमी खर्चिक आहे.
 
शिवाय एका वापरानंतर हा कप फेकून द्यावा लागत नाही. तो पुन्हा वापरता येतो. म्हणून पॅड्स वा टॅम्पॉन्सपेक्षा मेन्स्ट्रुअल कप्सचा पर्याय जास्त पर्यावरणस्नेही आहे.
 
धुवून पुन्हापुन्हा पाळीदरम्यान वापरता येणारी अंतवर्स्त्रंही (Underwear) उपलब्ध आहेत.
 
मेन्स्ट्रुअल कप्स जर जगभर उपलब्ध करून दिले तर त्याने अनेक गोष्टींवर तोडगा निघेल असं अभ्यासकांचं मत आहे. गरीबांसाठीही पाळीदरम्यानचा खर्च परवडणारा होईल, त्यांना एक स्वच्छ पर्याय उपलब्ध होईल. शिवाय जिथे अगदी पाण्याचा तुटवडा आहे वा शौचालयांची स्थिती वाईट आहे तिथेही हा पर्याय वापरण्याजोगा असल्याने संसर्गातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याचं प्रमाण कमी होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन