Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोथिंबिरीला ‘राष्ट्रीय औषधी वनस्पती’ ठरवण्याची मागणी होतीये, कारण...

Webdunia
रविवार, 6 नोव्हेंबर 2022 (11:45 IST)
कोणत्याही भारतीय स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या डब्यात डोकावून पाहा. तुम्हाला त्यामध्ये तीन पदार्थ हमखास आढळतील. त्या म्हणजे, हळद, लाल तिखट आणि धनेपूड.
 
या तीन पदार्थांचा वापर करून अनेक भाज्या बनवण्यात येतात. त्यातही धनेपूड किंवा त्याचं कोथिंबीर हे स्वरुप सर्वाधिक उपयुक्त म्हटलं जातं. खरं तर त्याला हळदीसारखा किंवा तिखटासारखा रंग येत नाही. मात्र, त्याच्या केवळ उपस्थितीने पदार्थाची चव खमंग बनते.
 
धनेपूड रसा घट्ट करण्यासाठी वापरली जाते, तर ताजी कोथिंबिरीची पानं पदार्थाला एक सुगंधी आणि तिखट चव देण्याचं काम करतात. शिवाय ती औषधी वनस्पतीही मानली जाते.
 
तुम्ही भारतातील कोणत्याही भाजी मार्केटमध्ये जा. भाजी विक्रेते भाज्या दिल्यानंतर कोथिंबीरीच्या काही काड्या मोफत म्हणून पिशवीत टाकतात. कोथिंबीर ही सर्वव्यापी असल्यामुळेच ते कदाचित असं करत असतील.
 
भारतात कोथिंबीर लोकप्रिय असली तरी जगात इतरत्र कोथिंबीर इतक्या आवडीने खाल्ली जात नाही. उलट तिच्याबाबत तीव्र नापसंती आहे. इतकंच काय तर कोथिंबिरीला आपला विरोध दर्शवण्यासाठी काही सोशल मीडिया पेजही सक्रिय आहेत. याच विचारातून 24 फेब्रुवारी रोजी 'आय हेट कोरिएंडर डे' पाळला जातो.
 
कोथिंबिरीचा तिरस्कार करणारे लोक तिच्या तीव्र वासामुळे तिला साबणासारखी, किटकांसारखी घाणेरडी चव असल्याचा आरोप करतात. पण, कोथिंबिरीचं कौतुक वाटणारे मात्र या वनस्पतीचं वर्णन ताजी, सुवासिक आणि लिंबूवर्गीय वनस्पती म्हणून करतात.
 
कोथिंबिरीवर एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये कोथिंबिर आवडणं किंवा न आवडणं हे आनुवंशिक भिन्नतेमुळे ठरतं, असं दिसून आलं आहे.
 
दक्षिण आशिया परिसरातील लोक हे लहानपणापासूनच कोथिंबिरीच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना तिच्या तीव्र चवीबाबत तिरस्कार वाटत नाही. येथील लोकांसाठी कोथिंबीर ही केवळ मसाल्याचा पदार्थ नाही, तर त्यांच्यासाठी ती एक भावना आहे.
 
दक्षिण आशियातील लोक स्वयंपाक करताना त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर कोथिंबिरीचा वापर जाणुनबुजून करताना दिसतात. रस्सा बनवताना धनेपूड, हळद आणि जिऱ्यासोबत वापरली जाते.
 
धने (कोथिंबीरीच्या बिया) फोडणीतही टाकले जातात. गरम तेलात तळल्यास सुगंध आणि चव देण्याचं काम ते करतात.
 
कोथिंबिरीची पाने साधारणतः चटणीमध्ये वाटून वापरतात किंवा अतिशय कमी प्रमाणात वरून घातली जातात. भाजी- कोशिंबिरीमध्ये बारीक चिरून घातलेली कोथिंबीर त्याला परिपूर्ण चव देण्याचं काम करते.
 
एकूणच, कोथिंबीर हा भारतीय स्वयंपाकाशी संबंधित एक महत्त्वाचा पदार्थ आहे. मात्र तरीसुद्धा ती प्रचंड दुर्लक्षित राहिली आहे. सहज उपलब्धता, स्वस्त दर यांमुळे ती गृहीत धरली जाते. नेमकं हेच हेरून शेफ रणवीर ब्रार कोथिंबिरीबाबतचं लोकांचं मत बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
'कोथिंबिरीशिवाय अन्नपदार्थ म्हणजे...'
रणवीर ब्रार हे लोकप्रिय शेफ, लेखक आणि रेस्टॉरंट चालक आहेत. त्यांनी मास्टरशेफ इंडियाचे परीक्षक म्हणूनही काम केलेलं आहे.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "मी पंजाबी कुटुंबात वाढलो आहे. एक शेतकरी कुटुंब म्हणून आमच्या आहारात कोथिंबीर महत्त्वाचा भाग होती. आम्ही कालव्याजवळ धने फेकून द्यायचो. तिथे कोथिंबीर उगवल्यानंतर ती तोडून घ्यायचो.
 
रणवीर ब्रार यांनी भारतीय स्वयंपाक पद्धतीचा सखोल अभ्यास केला. संपूर्ण भारतभर प्रवासही केला. त्यानंतर ते प्रादेशिक भारतीय पाककृतींमध्ये कोथिंबिरीच्या वापरबाबत जणू प्रेमातच पडले.
 
ते म्हणतात, "भारतात सगळ्याच राज्यांमध्ये धने वापरले जातात. मग ते कच्च्या वाटणाच्या स्वरुपात किंवा चटणी म्हणून अथवा नारळासोबतही वापरलं जातं. त्यामुळे वेगळ्या सुगंधासह पदार्थाला वेगळीच चव प्राप्त होते.
 
तरीही, कोथिंबिरीचं फारसं कौतुक होत नाही, ही गोष्ट ब्रार यांना अस्वस्थ करते. त्यामुळेच त्यांनी मार्च 2022 मध्ये एका हलक्याफुलक्या सोशल मीडिया पोस्टमधून आपल्या भावना मांडल्या.
 
change.org या वेबसाईटवर एक याचिका दाखल करून त्यांनी कोथिंबिरीला तिचा मान मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली.
 
कोथिंबिरीला भारताची राष्ट्रीय औषधी वनस्पती, असा दर्जा द्यावा, असं त्यांनी याचिकेत म्हटलं. त्याला 32 हजार जणांनी स्वाक्षरी करून पाठिंबाही दर्शवला आहे. 35 हजार स्वाक्षरी मिळताच सर्वाधिक पाठिंबा मिळालेली ही याचिका होईल.
 
ब्रार म्हणतात, "कोथिंबिरीशिवाय अन्नपदार्थ म्हणजे मुकूटाशिवाय राजकुमारीसारखा आहे."
 
कोथिंबिरीसाठी मोहीम
change.org च्या मार्केटिंग कॅम्पेन मॅनेजर माधुरी जानकी झुत्शी यांच्या मते, "ब्रार यांच्या याचिकेवर 87% स्वाक्षऱ्या भारतातील लोकांकडून आल्या आहेत.त्याशिवाय इतर देशांतील भारतीयांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
 
"खरोखर, कोथिंबीर ही आपली राष्ट्रीय औषधी वनस्पती आहे. त्याशिवाय आपली डिश पूर्ण होईल असा विचार आपण करू शकत नाही," अशा स्वरुपातील प्रतिक्रिया यावर दिसून येतात.
 
change.org ने हा मुद्दा भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारा यांच्यासमोर मांडला. देशाची राष्ट्रीय औषधी वनस्पती म्हणून अधिकृतपणे घोषणा करण्याच्या प्रक्रियेत त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे.
 
आपल्या याचिकेला यश मिळेल, अशी अपेक्षा ब्रार यांना आहे. ते म्हणतात, "इटलीकडे बेसिलसारखी वनस्पती आहे. फ्रान्समध्ये मार्जोरम आहे, तर मग भारताची औषधी कोणती असायला हवी? आपण कोथिंबिरीला हे स्थान देऊ शकत नाही का? आपल्या देशाचं ते प्रतीक आहे.
 
खरं तर, दक्षिण आशियातील देशांमध्ये कोथिंबिरीचं स्थान हे केवळ स्वयंपाक करण्यापेक्षा खूप खोलवरचं आहे.
 
कोथिंबिरीचे औषधी उपयोग
पाकिस्तानी वनौषधी तज्ज्ञ डॉ. बिल्कीस शेख यांच्या मते, "कोथिंबीर ही आपल्या स्वयंपाकघरातील डॉक्टर आहे."
 
कोथिंबिरीचा वापर हजारो वर्षांपासून औषधी म्हणून होत आला आहे. वजन घटवण्यासाठी तसंच आरोग्यासाठी ती उपयुक्त मानली जाते. भारतात वेद आणि संस्कृत लिखाणात (अनुक्रमे इसवी सन पूर्व 6000 आणि इसवी सन पूर्व 1500 पासून) त्याचा उल्लेख आढळतो.
 
शेख म्हणतात, "हा गरीबाच्या घरचा ओवा आहे. फॅशनेबल लोक ओव्याचा वापर करतात. आपण कोथिंबीर आणि घरगुती उपचार वापरतो."
 
डॉ. बिल्किस म्हणतात, "अपचनावरील उपाय म्हणून बडीशेपमध्ये धने मिसळून ती खाण्याचा सल्ला दिला जातो. पाठदुखी आणि मासिक पाळीच्या दुखण्यातून त्वरित आराम मिळवण्यासाठी कोथिंबीरची 20-25 पाने दुधात उकळून प्या.
 
याशिवाय, तोंडाचा अल्सर, टाळूवरील फोड किंवा निद्रानाश अशा समस्यांवर उपचार करण्यासाठीही कोथिंबीर उपयुक्त आहे," असं डॉ. शेख सांगतात.
 
कोथिंबिरीला अनेक औषधी गुण सभोवतालच्या वातावरणामुळे तसंच वेगवेगळ्या प्रदेशांतील गुणवैशिष्ट्यांमुळे प्राप्त होऊ शकतात. हे समजावून सांगताना रणवीर ब्रार यांनी भोपाळ शहराचं उदाहरण दिलं.
 
ते म्हणतात, "भोपाळ शहरातील जड असलेलं तलावाचं पाणी (ज्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या विरघळलेल्या खनिजांचे प्रमाण जास्त आहे) इथं नव्याने राहण्यास आलेल्या लोकांना पचतंच असं नाही.
 
त्यामुळे येथील लोक अपचनावरील उपाय म्हणून कोथिंबीर खाण्यास सुरुवात केली. याच प्रयोगातून कदाचित या प्रदेशातील भोपाली रेझा (मठ्ठा) हा पदार्थ जन्माला आला असावी. हा पदार्थ येथील ओळख बनला आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर असतं."
 
कोथिंबिरीचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हिचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो. तिच्या पानापासून ते मूळापर्यंत प्रत्येक गोष्ट वापरता येते.
 
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये निहारी नामक एक पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहे. निहारी म्हणजे मंद आचेवर विशिष्ट वेळ शिजवलेलं मांस. या पदार्थामध्ये कोथिंबिरीच्या मुळांचा वापर होतो.
 
निहारी बनवताना लवंग, दालचिनीच्या काड्या, जिरे आणि मिरपूड यांसारख्या इतर मसाल्यांसोबत कोथिंबिरीचाही वापर केला जातो. अखेरीस, पदार्थ बनल्यानंतर ताटात काढताना त्यावर थोडी कोथिंबिरीची पानेही घातली जातात.
 
कूक बुकच्या लेखिका सायरा हॅमिल्टन यांना वनस्पतीच्या मुळांचा वापर करून अन्नपदार्थ बनवायला आवडतं.
 
त्या म्हणतात, "मुळे आणि देठ याच वनस्पतीचा सर्वोत्तम भाग आहेत. पाश्चिमात्य शेफना ते आवडत नाही, पण कोथिंबिरीचे देठ चावून पाहिलं तर त्याची जी रसाळ चव असते, ती मला आवडते."
 
मिशेलिन स्टार स्पर्धा जिंकणारी महिली भारतीय महिला बनण्याचा मान मिळवणाऱ्या गरिमा अरोरा यांचं बँकॉकमध्ये स्वतःचं रेस्टॉरंट आहे.
 
त्या म्हणतात, "कोथिंबीरचा वापर हे अतिशय जाणीवपूर्वक पद्धतीने केलेलं कृत्य आहे. यामध्ये शेफला त्याच्याबाबत पूर्ण माहिती असते."
 
अरोरा यांची डुकराच्या मांसाची एक रेसिपी आहे. यामध्ये त्या डाळिंब आणि कोथिंबिरीचा वापर करतात.
 
त्यांच्या मते, कोथिंबीर ही एक अशी औषधी वनस्पती आहे, जी भारतीय खाद्यपदार्थांसोबत अगदी सहजपणे जोडली जाऊ शकते.
 
भारतीय भूमी ही स्वयंपाकाच्या विविधतेने नटलेली आहे. राष्ट्रीय औषधी वनस्पती म्हणून अनेक वनस्पतींचा दावा आहे. पण त्यासाठी कोथिंबीर हाच पर्याय योग्य आहे, असं रणवीर ब्रार यांना वाटतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

एलोवेरा जेलमध्ये कधीही मिसळू नये या 3 गोष्टी, त्वचेसाठी फायद्याऐवजी नुकसानदायक

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

पुढील लेख
Show comments