Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मृत्यूआधी माणसाच्या मेंदूत काय घडत असतं? नव्या संशोधनात काय आढळलं?

मृत्यूआधी माणसाच्या मेंदूत काय घडत असतं? नव्या संशोधनात काय आढळलं?
, रविवार, 14 जुलै 2024 (10:32 IST)
जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या मेंदूत काय घडत असतं? याबद्दल एरवी माहितीचे डोंगर उलथापालथ करणाऱ्या मानवाला काहीही माहिती नाही, हे लक्षात आल्यानंतर हिमो बोरहिईन या न्यूरोसायंटिस्ट थक्क झाल्या.
 
हिमो बोरहिईन यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, "आम्ही उंदरांवर प्रयोग करत होतो. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या मेंदूतून होणाऱ्या स्त्रावाचा आम्ही अभ्यास करत होतो."
 
अचानक त्यातील दोन उंदरांचा मृत्यू झाला. त्यामुळं हिमो यांना मृत्यूदरम्यान त्या उंदरांच्या मेंदूत होत असलेल्या प्रक्रियेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
 
हिमो यांनी सांगितलं की, "त्यातील एका उंदराच्या मेंदूत सेरोटिनिन नावाचं एका रसायन मोठ्या प्रमाणात स्त्रवलं. त्यामुळं या उंदराला हॅलोसिनेशन किंवा भ्रम होण्याचा त्रास तर नव्हता? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला "
 
"सेरोटिनिनचा संबंध हॅलोसिनेशन असतो," असं त्यांनी याबाबत सांगितलं.
 
सजीवांच्या मूड किंवा मनोदशेचं नियंत्रण करण्याचं काम सेरोटिनिन रसायन करतं. प्रयोगातील उंदराच्या मेंदूत सेरोटिनिनचा एकप्रकारे पूर आला होता, ते पाहून हिमा यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
 
यानंतर हिमो यांनी आधीपासूनच उपलब्ध असणाऱ्या माहितीवर संशोधन करण्यास सुरुवात केली. सेरोटिनिन या रसायनाचा स्त्राव होण्यामागं काहीतरी कारण असलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं.
 
"हे संशोधन करत असताना माझ्या लक्षात आलं की, मृत्यूच्या प्रक्रियेबद्दल मानवाला खूप कमी माहिती आहे. त्यामुळं मला आश्चर्याचा धक्काच बसला," असं हिमो यांनी सांगितलं.
 
डॉक्टर हिमो बोरहिईन या अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात मॉलेक्युलर अँड इंटरोगेटिव्ह फिजियोलॉजी आणि न्यूरोलॉजी विभागात सहयोगी प्राध्यापिका आहेत.
 
डॉक्टर हिमो उंदरांच्या मृत्यूवर संशोधन तर करत होत्याच. मात्र त्याचबरोबर माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या मेंदूत काय काय होतं, या गोष्टीचा देखील त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली.
 
डॉक्टर हिमो यांचं म्हणणं आहे की, संशोधन करत असताना त्यांना ज्या गोष्टींचं आकलन झालं ते मृत्यूबाबत आपल्याला जे वाटतं किंवा आपली जी समज आहे, त्याच्या नेमकं उलटं आहे.
 
मृत्यूची व्याख्या
डॉक्टर हिमो यांनी सांगितलं की, प्रदीर्घ काळापासून असं मानण्यात येतं की ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे एखाद्याची नाडी सापडत नसेल तर वैद्यकीय दृष्ट्या त्याला मृत समजलं जातं.
 
या प्रक्रियेमध्ये सर्व लक्ष ह्रदयावर केंद्रीत असतं. कारण याला ह्रदयविकाराचा झटका म्हणतात, मेंदूला झटका आला असं म्हणत नाहीत, असं त्या म्हणतात.
 
हिमो म्हणतात, "वैज्ञानिकांच्या ही बाब लक्षात आली की, मृत्यूच्या वेळी मेंदू असा दिसतो जणूकाही त्यात कोणतंही काम सुरु नाही. कारण मेंदूकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही. मरणारे लोक बोलू शकत नाहीत, उभे राहू शकत नाही, बसूही शकत नाहीत."
 
मेंदूला काम करण्यासाठी किंवा कार्यरत राहण्यासाठी खूप ऑक्सिजनची आवश्यकता असते. मात्र, आपल्या ह्रदयातून रक्ताचा पुरवठा झाला नाही तर मेंदूपर्यत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.
 
"वरवर तर असं दिसतं की मेंदू काम करत नाही किंवा तो निष्क्रिय झाला आहे," असं हिमो पुढं म्हणाल्या.
 
मात्र, डॉक्टर हिमो आणि त्यांच्या टीमनं केलेल्या संशोधनातून पूर्णपणे नवीन माहिती समोर आली आहे.
 
मेंदूचं काम प्रचंड वेगाने सुरू
2013 मध्ये उंदरांवर एक संशोधन करण्यात आलं होतं. त्यातून आढळलं की, जेव्हा उंदरांच्या ह्रदयानं काम करणं थांबवलं तेव्हा त्यांच्या मेंदूतील पेशांमध्ये अनेक हालचाली होताना दिसल्या होत्या.
 
"मेलेल्या उंदरांच्या मेंदूत होणारा सिरोटिनिन या रसायनाचा स्त्राव 60 पटीनं वाढला होता. डोपामिन या रसायनामुळं आपल्याला छान वाटतं. या उंदरांमध्ये डोपामिनचा स्त्रावदेखील 40 ते 60 पटीनं वाढला होता."
 
"तर नोर्पिनेफ्राइन या रसायनंमुळं सजीव अधिक सतर्क होतात. या नोर्पिनेफ्राइनचं प्रमाण तर 100 पट वाढलं होतं."
 
हिमो म्हणतात, "जेव्हा एखादा प्राणी जिवंत असतो तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये ही रसायनं इतक्या मोठ्या प्रमाणात असणं जवळपास अशक्य असतं."
 
2015 मध्ये संशोधकांच्या एका टीमनं मरणाऱ्या उंदरांच्या मेंदूवर केलेल्या आणखी एका अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित केले.
 
"दोन्ही अभ्यासांमध्ये 100 टक्के प्राण्यांच्या मेंदूमध्ये प्रचंड घडामोडी किंवा क्रिया होत असल्याचं नोंदवण्यात आलं. मेंदू प्रचंड वेगानं काम करत होता. मृत्यूच्या वेळेस मेंदू अतिशय सक्रिय होता."
 
गामा लहरी
2023 मध्ये हिमो आणि त्यांच्या टीमनं आणखी एक शोधनिबंध (रिसर्च पेपर) प्रकाशित केला. हे संशोधन चार विशेष माणसांवर करण्यात आलं होतं. ही माणसं कोमामध्ये होती आणि ती लाइफ सपोर्ट सिस्टिमवर, व्हेंटिलेटरवर जिवंत होती. इलेक्ट्रोएनसेफेलोग्राफी करण्यासाठी या माणसांना इलेक्ट्रोड लावण्यात आले होते.
 
त्याच्या माध्यमातून त्यांच्या मेंदूतील सर्व क्रिया किंवा हालचाली नोंदवल्या जाणार होत्या.
 
हे चार जण मृत्यूच्या दारात होते. डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं की "त्या सर्वांना आता कोणत्याही वैद्यकीय उपचार किंवा मदतीनं वाचवता येणार नाही. तेव्हा डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांनी एकत्रितपणे ठरवलं की. आता त्यांचा जीव वाचवण्याचे प्रयत्न थांबवले पाहिजेत."
 
नातेवाईकांच्या परवानगीनं त्यांना लावण्यात आलेले व्हेंटिलेटर काढण्यात आले. याच व्हेंटिलेटरच्या मदतीनं ते चार लोक जीवंत होते.
 
ही सर्व घडामोड होत असताना संशोधकांच्या लक्षात आलं की, दोन रुग्णांच्या मेंदूमध्ये वेगानं हालचाली होत होत्या. मेंदूमध्ये वेगानं मोठ्या प्रमाणात काहीतरी घडत होतं. यातून मेंदूतील क्रियांची माहिती मिळाली.
 
त्या रुग्णांच्या मेंदूतील गामा लहरींना देखील रेकॉर्ड करण्यात आलं. गामा लहरींना मेंदूतील सर्वात वेगवान लहरी मानलं जातं. मानवी मेंदूत माहिती आणि स्मृती जाणून घेण्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा या गामा वेव्हज किंवा लहरी हा एक भाग असतात.
 
आणखी एका रुग्णाच्या मेंदूचा अभ्यास करत असताना, त्याच्या मेंदूच्या टेंपोरल लोब म्हणजे दोन्ही कानांच्या मागे असलेल्या मेंदूच्या भागात वेगानं काही क्रिया घडत असल्याचं दिसलं.
 
डॉक्टर हिमो म्हणतात, मानवी मेंदूचा जो भाग उजव्या कानामागे असतो तो सहानुभूती किंवा संवेदनेसाठी खूपच महत्त्वाचा असतो.
 
"अनेक रुग्ण ह्रदयविकाराच्या झटक्यानंतरदेखील बचावतात. या लोकांनी मृत्यूच्या अतिशय जवळ पोचण्याचा अनुभव घेतलेला असतो. असे रुग्ण सांगतात की, त्या अनुभवानंतर ते अधिक चांगली माणसं झाली आहेत. आता त्यांना दुसऱ्यांच्या समस्या किंवा दु:खाची अधिक जाणीव आहे, त्यांना दुसऱ्यांविषयी अधिक सहानुभूती निर्माण झाली आहे."
 
मृत्यूचा अतिशय जवळून अनुभव
जे लोक मृत्यूच्या दारातून परतले आहेत ते म्हणतात की, त्यांच्या डोळ्यासमोर सर्व जीवनपटच आला होता किंवा त्यांना आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या घटना त्या क्षणी आठवत होत्या.
 
मृत्यूच्या जवळ जाण्याचा अनुभव घेतलेले अनेकजण तर असंही सांगतात की, त्यांना एक प्रखर प्रकाश दिसला होता. तर काही जणांनी असंदेखील सांगितलं की, त्यांना असं वाटलं होतं की ते त्यांच्या शरीराबाहेर पडले आहेत आणि दूर उभे राहून सर्वकाही पाहत आहेत.
 
डॉक्टर हिमो यांनी आपल्या संशोधनादरम्यान मेंदूमध्ये जी प्रचंड सक्रियता किंवा प्रचंड हालचाली पाहिल्या, त्यामुळंच मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या लोकांना असे जबरदस्त अनुभव येत होते का?
 
डॉक्टर हिमो म्हणतात, "हो, मलाही असंच वाटतं."
 
"ह्रदयविकाराचा झटका आलेल्या किमान 20 ते 25 टक्के रुग्णांनी असं सांगितलं की त्यांना पांढरा प्रकाश दिसला. काहीतरी विचित्र दिसलं. याचाच अर्थ त्यांच्या मेंदूतील दृश्य किंवा प्रतिमा तयार करणारा भाग सक्रिय झाला होता."
 
ज्या दोन रुग्णांचे व्हेंटिलेटर काढल्यानंतर त्यांच्या मेंदूत प्रचंड वेगवान क्रिया घडताना आढळून आल्या होत्या, त्यांच्याबद्दल संशोधकांचं म्हणणं आहे की त्या रुग्णांच्या मेंदूतील व्हिज्युअल कॉर्टेक्स (कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी मेंदूचा हा भाग महत्त्वाचा असतो) मध्ये प्रचंड वेगवान क्रिया होताना आढळल्या होत्या.
 
याचा अर्थ, "त्यांना या प्रकारे काही तरी दिसल्याचं अनुभव झाला असेल."
 
डॉक्टर हिमो बोरहिईन यांना वाटतं की, संशोधन करताना त्यांनी खूप कमी लोकांचा अभ्यास केला. जेव्हा एखादी व्यक्ती मरत असते किंवा मृत्यूच्या दारात उभे असते तेव्हा त्याच्या मेंदूत काय काय घडत असतं, या महत्त्वाच्या विषयाबाबत आणखी संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
 
मात्र या विषयावर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संशोधन केल्यानंतर डॉक्टर हिमो यांना एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. त्या सांगतात, "मला वाटतं की जेव्हा ह्रदयविकाराचा झटका येतो, तेव्हा मेंदूचं काम बंद होत नाही. उलट तो जास्त सक्रिय होतो."
 
मात्र, यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याची मेंदूला जेव्हा जाणीव होते, तेव्हा नेमकं काय होतं?
 
हिमो म्हणतात, "याबाबत अद्याप आम्ही अभ्यास करत आहोत. यासंदर्भात फार काही माहिती उपलब्ध नाही. खरं सांगायचं तर यासंदर्भात काहीही माहित नाही."
 
डॉक्टर हिमो सुप्तावस्थेबद्दल सुद्धा सांगतात. त्या म्हणतात की त्यांना वाटतं की काहीतरी असं घडत असेल. उंदीर आणि मानवासह सर्व प्राण्यांमध्ये ऑक्सिजनच्या अभावाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था असते.
 
"आतापर्यत असं मानलं जात होतं की, ह्रदयानं काम करणं थांबवलं की मेंदूदेखील आपलं काम थांबवतो आणि काहीही न करता निष्क्रिय होतो. म्हणजेच ह्रदयाचं धडधडणं थांबलं की मेंदू देखील पूर्णपणे निष्क्रिय होतो. लोकांना असंच वाटतं की अशा परिस्थितीला मेंदू हाताळू शकत नाही आणि त्याचादेखील मृत्यू होतो."
 
मात्र, डॉक्टर हिमो अतिशय ठामपणे त्यांचा मुद्दा मांडतात. त्या म्हणतात की, हे सर्व नेमकं असंच घडतं की आणखी काही होतं याबद्दल आपल्याला निश्चितपणे काही माहिती नाही.
 
डॉक्टर हिमो यांना वाटतं की, मेंदू इतक्या सहजासहजी पराभव स्वीकारत नाही. ज्या पद्धतीनं एरवी आपला मेंदू प्रत्येक कठीण परिस्थितीशी संघर्ष करतो. त्याच प्रकारे तो मृत्यूचा देखील सामना करतो.
 
"सुप्तावस्था हे याचं उत्तम उदाहरण आहे. मला वाटतं की, ऑक्सिजनच्या कमतरतेच्या या आव्हानाला तोंड देण्याची क्षमता मेंदूमध्ये असते. मात्र यासंदर्भात अधिक संशोधन, अभ्यासाची आवश्यकता आहे."
 
अद्याप बरंच संधोधन बाकी
डॉक्टर हिमो बोरहिईन यांना वाटतं की, सहकाऱ्यांसह त्यांनी जी माहिती शोधून काढली आहे ती फक्त कणभर आहे. यासंदर्भात अजून डोंगराएवढ्या माहितीचा शोध लागायचा आहे.
 
"मला वाटतं की, मेंदूमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेवर किंवा तुटवड्यावर मार्ग काढण्याची काहीतरी अशा व्यवस्था असते जी आपल्याला माहिती नाही. अशा परिस्थितीत आपल्याला वरवरची एवढी माहिती आहे की, ज्या लोकांचं ह्रदय काम करणं थांबवतं किंवा धडधडणं थांबतं त्या लोकांना असे विचित्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. आमच्या आकडेवारीतून असं दिसतं की हे अनुभव मेंदूमध्ये सुरू असलेल्या विविध क्रिया किंवा हालचालींमुळे येतात."
 
मरताना मेंदूमध्ये इतक्या जास्त प्रमाणात क्रिया का घडतात? हा आता समोर असलेला प्रश्न आहे.
 
त्या म्हणतात, "आपल्या सर्वांना एकत्रितपणे यासंदर्भात अधिक प्रयत्न करावे लागतील आणि अधिक माहिती मिळवावी लागेल. आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल. यावर संशोधन करून या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. कदाचित कोट्यवधी लोकांचा प्रत्यक्षात मृत्यू होण्याआधीच आपण त्यांचा मृत्यू झाला आहे असं समजत असू. कारण, मृत्यूची नेमकी प्रक्रिया काय आहे, मृत्यूच्या वेळेस नेमकं काय होतं याची अद्याप आपल्याला व्यवस्थित माहिती नाही."
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोणती पाणीपुरी खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकतो? त्यावर उपाय काय?