Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोरोनामुक्तीनंतर ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिसचं प्रमाण का वाढलंय?

कोरोनामुक्तीनंतर ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिसचं प्रमाण का वाढलंय?
, गुरूवार, 3 जून 2021 (20:51 IST)
कोरोनामुक्त झाल्यानंतर 'हार्ट अॅटॅक' आणि फुफ्फुसाचा त्रास होण्यासोबतच 'ब्रेन स्ट्रोक'ची प्रकरणं समोर येत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे, कोणतीही सहव्याधी नसतानाही कोव्हिड-19 मुळे तरुणांमध्ये 'ब्रेन स्ट्रोक'च्या प्रकरणांत वाढ झाल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
केईएम रुग्णालयाच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. संगीता रावत म्हणतात, "कोव्हिडमुळे तरूण वर्गात वाढणारी स्ट्रोकची प्रकरणं चिंतेची गोष्ट आहे."
 
कोरोनासंसर्गाच्या पहिल्या लाटेत कोरोनामुक्त रुग्णांमध्ये स्ट्रोकची प्रकरणं समोर आली होती. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यामुळे हे प्रमाण अधिक वाढलंय.
 
कोरोनामुक्त झाल्यानंतर स्ट्रोक येण्याची कारणं काय? कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यावं हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
कोव्हिडमुळे स्ट्रोक का येतो?
डॉ. रावत पुढे सांगतात, "सामान्य व्यक्तीच्या तुलनेत, कोरोनासंसर्ग झालेल्या व्यक्तीला स्ट्रोक येण्याची शक्यता 7 ते 8 पटींनी वाढते."
 
मध्यम आणि गंभीर स्वरूपाचा कोरोनासंसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये स्ट्रोकची प्रकरणं दिसून आल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. उपचार सुरू असताना आणि कोरोनामुक्त झाल्यानंतरही स्ट्रोक येण्याची शक्यता असते.
 
डॉ. निर्मल सूर्या मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मेंदूविकारतज्ज्ञ आहेत. कोव्हिडमुळे स्ट्रोक येण्याचं कारण ते सांगतात,
 
कोरोना व्हायरस शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रणालीवर हल्ला करतो.
परिणामी रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका वाढतो.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी. तर, कोरोनामुक्त रुग्णांना 2 महिन्यांनंतरही स्ट्रोक आल्याचं तज्ज्ञांना आढळून आलंय.
 
डॉ. संगीता रावत पुढे सांगतात, "लहान रक्तवाहिनीत गाठ तयार झाली तर, स्ट्रोक सौम्य स्वरूपाचा येतो. मात्र, मोठ्या रक्तवाहिनीमध्ये गाठ असेल, तर, स्ट्रोक गंभीर असतो. कोव्हिडमध्ये मोठ्या रक्तवाहिनीत गाठ तयार झाल्याने स्ट्रोक आल्याचं दिसून आलंय."
 
ब्रेन स्ट्रोकमध्ये ऑक्सिजन आणि पोषकतत्त्वं वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीत गुठळ्या होतात. त्यामुळे ही रक्तवाहिनी फुटून मेंदूला रक्त पुरवठा होत नाही.
 
त्या पुढे सांगतात, "कोरोनामुक्त रुग्णांना रक्त पातळ होण्याची औषध तीन महिने दिली जातात. काही रुग्ण औषधं घेत नाहीत तर, काहींना औषध घेऊनही स्ट्रोक येतो."
 
सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्ये वाढलं स्ट्रोकचं प्रमाण
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सामान्यत: पक्षाघाताचा झटका (पॅरालिसिस) वयस्कर व्यक्तींना येतो. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब या सहव्याधी आहेत किंवा सिगारेट आणि मद्यपानाचं व्यसन त्यांना त्याचा धोका अधिक आहे.
 
पण, कोरोनासंसर्गात तरुणांमध्ये स्ट्रोकचं प्रमाण वाढलंय. यातील काही युवा कोरोनामुक्त झाल्यानंतर, दोन महिन्यांनी स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल होत आहेत.
 
डॉ. रावत सांगतात, "कोरोना संसर्गात कोणताही आजार नसताना किंवा आजार होण्यासाठी कारणीभूत धोके नसूनही तरुणांना स्ट्रोक येतोय. ही फार गंभीर गोष्ट आहे."
 
"लहान वयातच पक्षाघात आला तर पुढचं आयुष्य खूप खडतर होतं. त्यामुळे तरुणांना काळजी घ्यावी लागेल," असं डॉक्टर सांगतात.
 
डॉ. निर्मल सूर्या त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या 30 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाची माहिती देतात. "30 वर्षांची ही मुलगी चेहरा सुन्न झाल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आली. काही दिवसापूर्वीच ती कोरोनामुक्त झाली होती. तिला पहाताच हे काहीतरी वेगळं आहे असं लक्षात आलं."
 
म्युकर मायकोसिसमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता?
 
देशभरात काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढतायत. महाराष्ट्रात 3 हजारपेक्षा जास्त रुग्णांना म्युकर मायकोसिसचा त्रास असल्याचं आढळून आलं आहे. बुरशीमुळे होणारा म्युकर मायकोसिस स्ट्रोकसाठी कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
 
डॉ. सूर्या पुढे सांगतात, "म्युकर मायकोसिसचा संसर्ग सायनसमध्ये पसरल्यामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. कॅरोटिड आर्टरीत म्युकरचा संसर्ग पसरला तर स्ट्रोक येण्याची शक्यता असते." तज्ज्ञ सांगतात, डोक्याकडे रक्तपुरवठा करणाऱ्या मानेतील रक्तवाहिनीला कॅरोटिड आर्टरी म्हणतात.
 
म्युकर मायकोसिसमुळे सायनसमध्ये संसर्ग झाल्यानंतर स्ट्रोक आलेले दोन रुग्ण डॉ. सूर्या यांनी पाहिले आहेत. ते सांगतात, "म्युकर मायकोसिसमुळे स्ट्रोक आला तर परिणाम फार गंभीर होतात. संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता फार कमी असते."
 
केईएम रुग्णालयातही म्युकर मायकोसिसमुळे स्ट्रोक आलेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
 
स्ट्रोकची लक्षणं काय?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोव्हिडमध्ये किंवा कोरोनामुक्त झाल्यानंतर स्ट्रोक येण्याची लक्षणं सामान्य स्ट्रोक येण्यासारखीच आहेत.
 
चेहरा, हात किंवा पाय अचानक सुन्न होणं
शरीराच्या एका बाजूची संवेदना जाणं
चेहरा वाकडा होणं
खूप डोकेदुखी
एका किंवा दोन्ही डोळ्याची दृष्टी कमी होणं
बोलता न येणं, बोलणं अवघड जाणं किंवा इतर काय बोलत आहेत हे लक्षात न येणं
तज्ज्ञ म्हणतात, काही रुग्ण स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर, दोन-तीन दिवसांनी त्यांना कोरोनासंसर्गाचं निदान झाल्याचं आढळून आलं.
 
डॉ. रावत सांगतात, "लस घेतल्यानंतर ज्यांना सौम्य कोरोना संसर्ग झाला. त्यांना स्ट्रोकमुळे पॅरालेसिस होण्याची शक्यता कमी आहे."
 
'कोरोनामुळे स्ट्रोक आलेल्या रुग्णांची रिकव्हरी फार हळू होते'
मुंबईतील नानावटी रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रद्युम्न ओक यांनी स्ट्रोक आलेल्या 42 रुग्णांचा अभ्यास केला होता. ज्यात कोरोनाबाधित आणि कोरोनासंसर्ग नसलेले रुग्ण होते.
 
ते सांगतात, "कोरोनासंसर्ग झालेल्या 1.4 टक्के रुग्णांना स्ट्रोक आला होता. पण, या रुग्णांचा रिकव्हरी रेट खूप कमी होता. तर, काहींचा मृत्यू झाला."
 
या कोरोना रुग्णांचं बोलणं, अवयवांची हालचाल अत्यंत कमी होती. या तूलनेत कोरोनासंसर्ग नसलेले पण, स्ट्रोक आलेले रुग्ण लवकर रिकव्हर झाले.
 
"महामारीच्या काळात स्ट्रोकचं लवकर निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत."

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झोपण्यापूर्वी हे 6 योग करा तणावापासून मुक्ती मिळेल