Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

World Egg Day : अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट?

Webdunia
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (20:59 IST)
मयांक भागवत
1980च्या दशकामध्ये नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीची 'संडे हो या मंडे...रोज खाओ अंडे' ही जाहिरात खूप लोकप्रिय झाली होती.
 
अंड्यामध्ये शरीराला आवश्यक प्रथिनं (प्रोटीन) आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असतात. सहज उपलब्ध असल्याने याला 'सूपरफूड'ही म्हटलं जातं. शरीराला लागणाऱ्या प्रथमिन्यांची गरज भागवण्यासाठी रोजच्या आहारात एक अंड असायलाच हवं असं आहारतज्ज्ञांचं मत आहे.
 
अंड पौष्टिक आहे. पण यातील पिवळ्या भागात 'कॉलेस्ट्रोल'चं प्रमाण खूप जास्त असतं. शरीरातील वाढलेलं 'कॉलेस्ट्रोल' हृदयरोगासाठी कारणीभूत ठरतं.
 
त्यामुळे अंड्यातील पिवळा भाग खावा का नाही? बलक खाणं चांगलं का वाईट? का फक्त पांढरा भाग (Egg-White) खावं? हा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर आम्ही हृदयरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
अंड्यामधून शरीराला काय मिळतं?
सकाळी हक्काचा, झटपट बनणारा, पौष्टीक आणि पोटभर नाष्टा म्हणजे अंडं. त्यामुळेच ऑमलेट, बॉइल्ड एग किंवा अंड्याचे इतर पदार्थ जगभरात अनेकांच्या ब्रेकफास्टचा कायमचा घटक बनले आहेत.
पौष्टिक आणि समतोल आहार म्हणून अंड्याचा रोजच्या आहारातील समावेश अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे, अंड शरीराला गरजेची प्रथिनं, जीवनसत्व आणि क्षार यांचं सर्वोत्तम मिश्रण आहे.अंड्यामध्ये प्रोटीन्स, अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी-12 आणि शरीराला आवश्यक इतर पौष्टिक घटक असतात.
 
रोज एक अंडं खावं का?
अंड्याचे फायदा आपण वाचलेच. पण रोजच्या आहारात किती अंडी खावीत? हा सामान्यांना पडणारा प्रश्न आहे. हे आम्ही आहारतज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
आहारतज्ज्ञ प्राजक्ता बोरसे बीबीसीशी बोलताना म्हणतात, "अंडं शरीराला आवश्यक प्रोटीन्सचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. शरीरात याचं पचन अगदी सहजतेने होतं. त्यामुळे सामान्य व्यक्तीसाठी रोज एक अंडं खाणं चांगलं आहे."अंडं सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे. बनवण्यासाठी अत्यंत सोपं, परवडण्यासारखं आणि पौष्टिक घटकांनी युक्त आहे.त्या पुढे म्हणतात, "जीममध्ये वर्कआऊट करणारे किंवा लहान मुलं रोज तीन एग व्हाईट (अंड्याचा पांढरा भाग) आणि एका अंड्याचा पिवळा भाग खाऊ शकतात."
 
अंड्यात 78 कॅलरीज आणि 6 ग्रॅम प्रोटीन असतं. आहारतज्ज्ञ म्हणतात, अंड्यातून दररोज 28 ते 30 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतात.
 
ब्रिटीश डायबेटीस असोसिएशनचे सदस्य डॉ. फ्रॅन्की फिलीप म्हणतात, "दररोज एक किंवा दोन अंडी खाणं चांगलं आहे."अंड्यात मोठ्या प्रमाणात आयर्न आणि बायोटिन असतं. बायोटिन मेंदूच्या वाढीसाठी, डोळ्यांसाठी आणि शरीरातील हिमोग्लोबिनसाठी फार उपयुक्त आहे. इतर पदार्थातून आपल्याला बाटोटिन मिळत नाही.
 
विदिशा पारेख मुंबईच्या कोहिनूर रुग्णालयात क्लिनिकल डाएटेशियन आहेत. त्या म्हणतात, "प्रत्येक व्यक्तीने आपल्या बॉडी इमेजनुसार वैद्यकीय सल्ल्याने नियमितपणे अंडी खावीत."कोरोनासंसर्गाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांनाही अंड खाण्याची सूचना करण्यात आल्याचं प्राजक्ता बोरसे सांगतात.
 
धकाधकीच्या जीवनात लोक आरोग्याची काळजी घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे लोकांचा भर कॅलरीज कमी करण्यावर आहे. अंड्यात पिष्ठमय पदार्थ (कार्बोहायड्रेट) अजिबात नाहीत. सारखेचं प्रमाणही नाहीये.सामान्यांनी दररोज एक अंडं खावं अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केलीये.
 
अंड्यातील पिवळा बलक खावा का?
अंड्यातील पिवळा भाग ज्याला आपण बलक म्हणतो. हा बलक खावा की नाही? यावर गेल्या कित्येक दशकांपासून चर्चा सुरू आहे.
अंड्यातील पिवळा भाग किंवा बलक खाणं योग्य आहे? यावर बोलताना आहारतज्ज्ञ प्राजक्ता बोरसे पुढे म्हणतात, "अंड्याच्या पांढऱ्या भागासोबतच पिवळा भागही लोकांनी खाल्लाच पाहिजे."

अंड्याच्या पिवळ्या भागात 'कॉलेस्ट्रोल'चं प्रमाण खूप जास्त आहे. शरीरात वाढणाऱ्या 'कॉलेस्ट्रोल'चा थेट संबंध हृदयविकाराशी आहे. त्यामुळे आवडीने अंड्यावर ताव मारणारे लोक, आरोग्यावर विपरित परिणाम होईल या भीतीने अंड्यातील पिवळा भाग खाणं टाळतात.
 
आहारतज्ज्ञ विदिशा पारेख पुढे सांगतात, "अंड्यातील पांढऱ्या भागापेक्षा पिवळा भाग अधिक पौष्टिक आहे. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये ड-जीवनसत्व (Vitamin-D) असतं. त्यामुळे अंड्याचा बलक खाणं नक्कीच फायदेशीर आहे."
 
पण अंड्यातील पिवळा बलक किती प्रमाणात खावा, याबाबत वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना त्यांनी केलीये.
 
डॉ. अमित पाटील मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ आहेत. पिवळ्या भागामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. या भीतीबाबत ते म्हणतात, "अंड्यातील पिवळ्या बलकाचं ठराविक प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढत नाही."
 
हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अमित पाटील म्हणाले, अंड्यात चांगल्या 'कॉलेस्ट्रोल'चं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अंड्यातील पिवळा बलक पूर्णत: हानीकारक नाही.
 
अंडं आणि 'कॉलेस्ट्रोल'
आपल्याला गरज असणारं कोलेस्टेरॉल शरीर स्वतःच तयार करतं. पण आपण सेवन करत असलेल्या प्राणीजन्य पदार्थांतून म्हणजे बीफ, कोळंबी, अंडी यासोबत चीज आणि बटरमधूनही हे कोलेस्टेरॉल मिळतं.शरीरात 'कॉलेस्ट्रोल'चं प्रमाण जास्त असेल तर हृदयविकार होण्याची शक्यता असते.
 
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, अंड्यात 186 मिलीग्रॅम 'कॉलेस्ट्रोल' असतं. तर अमेरिकेच्या डाएटरी गाईडलाईन्सची शिफारस दिवसा 300 मिलीग्रॅम सेवनाची आहे.
 
यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या माहितीनुसार, अंड्यात 'कॉलेस्ट्रोल' असतं. पण अंड्यातील 'कॉलेस्ट्रोल' पेक्षा आहारातील सॅच्युरेटड फॅटचा शरीरातील 'कॉलेस्ट्रोल'च्या मात्रेवर जास्त परिणाम होतो.
 
बीबीसी फ्युचरशी बोलताना अमेरिकेतील आहारशास्त्रज्ञ एलिझाबेथ जॉन्सन म्हणतात, "आपल्या शरीरात अशाकाही प्रणाली आहेत. ज्यामुळे डाएटरी 'कॉलेस्ट्रोल'ची अनेकांना समस्या होत नाही."
 
एलिझाबेथ जॉन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2015 मध्ये 40 संशोधनांचा अभ्यास केला होता. डाएटरी 'कॉलेस्ट्रोल' आणि हृदयविकाराच्या परस्पर संबंधाचे संशोधकांना कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत.
 
शरीरातील 'कॉलेस्ट्रोल'चं प्रमाण वाढण्यासाठी चुकीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या सवयी, स्ट्रेस आणि जनुकीय घटक कारणीभूत आहेत.

आहारतज्ज्ञ प्राजक्ता बोरसे म्हणतात, "खाण्या-पिण्याच्या सवयी योग्य नसतील तर 'कॉलेस्ट्रोल'चा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त अंड्यातील पिवळा भाग खाल्यामुळे 'कॉलेस्ट्रोल'ची समस्या निर्माण होईल असं म्हणता येणार नाही."
 
तुम्ही 'कॉलेस्ट्रोल'ची तपासणी केली असल्यास त्यात HDL आणि LDL अशा 'कॉलेस्ट्रोल'च्या दोन मात्रा दाखवल्या जातात. HDL ला चांगलं तर LDL ला वाईट 'कॉलेस्ट्रोल' म्हणून ओळखलं जातं.
 
अंड्यातील कॉलेस्ट्रोलमुळे हृदयविकाराचा धोका?
अंड्यातील कॉलेस्ट्रोल आणि हृदयविकार यांचा काही संबंध आहे का? हे आम्ही हृदयविकार तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
डॉ. अमित पाटील मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयात हृदयविकार तज्ज्ञ आहेत. ते म्हणाले, "अंड्यातील पिवळा बलक अतिजास्त प्रमाणात खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो."पिवळ्या भागाचं ठराविक प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढत नाही.दररोज अंड्यातील एक ते तीन पिवळे बलक खाण्यास हरकत नाही, असं डॉ. पाटील सांगतात.
 
अंड्यातील कॉलेस्ट्रोलचा हृदयविकाराशी संबंध आहे का? हा प्रश्न आम्ही नानावटी रुग्णालयाचे इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजी विभागाचे डॉ. सुशांत पाटील यांना विचारला. ते सांगतात, "अंड्यामध्ये कॉलेस्ट्रोल आहे. पण, यामुळे हृदयविकाराचा त्रास होईल असं नाही."बटर, नारळाचं तेल, चीज आणि रेड मीटमधील सॅच्युरेडेट फॅटमुळे कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.
 
रोज एक अंडं खाल्याने कमी होतं हृदयविकाराचं प्रमाण?
चीनमध्ये साल 2018 ला अंडं खाल्यामुळे काय फायदा होतो यावर संशोधन करण्यात आलं. यात 50 हजारपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता.या संशोधनातून पुढे आलं की, "रोज एक अंडं खाल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते."
 
केंब्रीज विद्यापिठाच्या प्रो. निता फोरोही म्हणतात, "या संशोधनातून समोर आलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, रोज एक अंड खाल्याने हृदयविकाराची समस्या निर्माण होत नाही." रोज अंडं खाणाऱ्यांमध्ये, अंडं न खाणाऱ्यांपेक्षा हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका 18 टक्के आणि स्ट्रोकची शक्यता 28 टक्के कमी होते.
 
पण, 2020 मध्ये करण्यात आलेल्या संशोधनात असं आढळून आलं की अतिरिक्त अर्ध अंडं खाल्यानेही हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
 
डॉ. सुशांत पाटील पुढे सांगतात, कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असलेल्यांनी सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाऊ नयेत. पण, या व्यक्ती आठवड्यात 3-4 अंडी खाऊ शकतात. अनेक संशोधनात हे स्पष्ट झालंय की रोजच्या आहारात अंड्याचा समावेश केल्यामुळे हृदय आणि पचनक्रियेला फायदा होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी 5 योगासने, जाणून घ्या सोप्या टिप्स

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments