Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उष्माघात म्हणजे काय? वाढत्या गरमीचा असा कराल सामना

Webdunia
सोमवार, 22 मे 2023 (15:52 IST)
राज्यात सध्या सर्वत्र उष्मा वाढला आहे.सध्याचं वाढतं तापमान पाहता गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं, उन्हात फिरणं टाळावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अशा वातावरणात उष्माघात होऊ शकतो, म्हणून काळजी घ्यावी असं तज्ज्ञांनी म्हटलंय.
 
उष्माघात म्हणजे काय?
कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं. ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर्स सांगतात.
 
बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातील थर्मोरेग्यूलेशन बिघडते, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू होऊ शकतो असं आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात.
 
यापूर्वीही महाराष्ट्रासह देशभरात उष्माघातामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात विशेषत: नागपूर, मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात.
 
राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, अशा काही उष्ण राज्यांमध्येही उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ नागरिकांना सोसावी लागते.
 
जून 2021 मध्ये कॅनडात रेकॉर्डब्रेक उष्णता वाढल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. उष्णतेची लाट आल्याने आणि अनेक शहरांमध्ये पारा 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झाला होता.
 
एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय करावं?
लोकांनी घाबरू नये, पण काळजी घ्यावी असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. उष्णतेची लाट पाहता आवश्यक नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळा असं आवाहन हवामान खात्याने आणि मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.
 
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सरीता पिकळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दर तीन ते चार तासाने लघवीला जाणं आवश्यक आहे, त्यासाठी तेवढं पाणी शरीरात जायला हवं. लघवीचा रंग गडद पीवळा असल्यास शरीरात पाण्याची कमतरता आहे असे समजावे."
उष्णतेच्या लाटेमुळे डोकेदुखी, थकवा तसंच सतत झोप येणं ही लक्षणं सुद्धा दिसतात असंही त्या म्हणाल्या.
 
उष्माघाताची लक्षणं
चक्कर येणे, उल्ट्या होणं, मळमळ होणे.
शरीराचे तापमान जास्त वाढणे.
पोटात कळ येणे.
शरीरातील पाणी कमी होणे.
ही लक्षणं आढळल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत मुंबई महानगरपालिकेनेही काही सूचना केल्या आहेत.
 
तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
दरम्यानच्या काळात, त्याला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं.
ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.
त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.
एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.
त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या.
त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.
 
उष्णतेची लाट म्हणजे काय?
वेगवेगळ्या देशांत तिथल्या भौगोलिक स्थितीनुसार उष्णतेचे वेगवेगळे निकष असू शकतात.
 
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस 37 अंश सेल्सियसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5 अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं.
 
मुंबई आणि रायगड परिसरात अनेक ठिकाणी सध्या या दोन्ही गोष्टी घडताना दिसून येत आहेत. शिवाय हवेतील आर्द्रतेमध्येही काही ठिकाणी घट झाली आहे. त्यामुळे एरवी दमट हवा असणाऱ्या या परिसरात उन्हाची तीव्रता आणखी जाणवते.
 
कलाम तापमानातील वाढ 6.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला अतिउष्ण लाट किंवा सिव्हीयर हीट वेव्ह (severe heat wave) म्हटलं जातं.
 
काय काळजी घ्याल?
तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरिरावर होऊ शकतात. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली ही तापमानवाढ सहन करता येऊ शकते. पण नवजात बालकं, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा वातावरणात आपण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
 
के. एस. होसाळीकर यांच्या मते, उष्णतेची लाट आल्यानंतर आपण थेट ऊन्हाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा.
 
शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं. तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.
 
ORS, लिंबू सरबत, तांदळाची पेज, ताक आदी पेय पिता येऊ शकतात.
 
चहा-कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ते टाळायला हवेत.
हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं.
 
किमान दोनवेळा थंड पाण्याने आंघोळ करावी.
 
याकाळात काय काळजी घ्यायची यासाठीच्या सूचना मुंबई महापालिकेने सोशल मीडियावरून दिल्या आहेत.
 
मुंबई महापालिकेने काय सांगितलं?
उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर जाणं टाळा.
तापमान जास्त असताना बाहेर असाल तर थकवणाऱ्या क्रिया वा हालचाली करू नका.
वेळोवेळी पाणी पीत रहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा.
घराबाहेर पडताना हलके, फिकट रंगाचे, सुटसुटीत सुती कपडे घाला. डोळे झाकण्यासाठी गॉगल्स, छत्री किंवा टोपी, बूट - चपला वापरा.
अल्कोहोल, चहा - कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ही पेयं टाळा.
प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका.
जर तुम्ही उघड्यावर उन्हात काम करणार असाल तर टोपी - छत्री वापरा, ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हात-पाय पुसा.
पार्क केलेल्या बंद वाहनांमध्ये लहान मुलं - पाळीव प्राण्यांना सोडू नका.
तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
ORS, लस्सी, तोरणी (तांदळाचं पाणी), लिंबू सरबत, ताक अशी घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल. याने शरीरातलं पाण्याचं प्रमाण कायम राहील.
प्राण्यांना आडोशाला ठेवा. त्यांना पुरेसं पाणी द्या.
घर थंड ठेवण्यासाठी पडदे किंवा झडपा लावा आणि रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवा.
पंखे, ओला नॅपकीन वापरा. थंड पाण्याने आंघोळ करा.
 
Published By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

लिपस्टिक ओठांवर टिकत नाही या टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात ही 5 फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

Sweet Dish चविष्ट केळीची खीर

पुढील लेख
Show comments