आयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी कोणत्या धातूची आहेत यावर त्यामध्ये केलेल्या पदार्थाचा गुणधर्म व त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. म्हणूनच वैदिक, आयुर्वेदशास्त्रावरील विविध ग्रंथ तसेच पाकशास्त्रावरील ग्रंथांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्यार भांड्यांकडे विशेष लक्ष दिलेले दिसते.
आयुर्वेदानुसार, सोन्याच्या भांड्यात अन्न ठेवल्याने ते निर्वषी, बलवर्धक होते, सर्व धातूंची पुष्टी करते. चांदीच्या भांड्यातील जेवण त्रिदोषशामक असून ते मेंदू व डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तसेच कांस्याच्या भांड्यातील जेवण त्रिदोषनाशक, बुद्धिवर्धक असून ते रक्तशुद्धी करते. शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी लोखंडी पात्रात जेवण शिजवावे, असे आयुर्वेद शास्त्रात म्हटले आहे. आयुर्वेदात तांबे व पितळ हे औषधी धातू म्हणून ओळखले जातात. तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात वातशामक, स्मृतिवर्धक असतो. तांबे आणि जस्त मिश्रित धातू म्हणजे पितळ. धन्वंतरीला पितळ जास्त प्रिय होते म्हणून त्याला नैवे दाखवताना पितळेची थाळी वापरली जाते, असे म्हटले जाते. पितळेच्या भांड्यात जेवल्याने वायू-कफ दोष नाहीसा होतो. आयुर्वेदात आणि पाकशास्त्रावरील विविध ग्रंथांमध्ये मातीची भांडी ही स्वयंपाकासाठी सर्वश्रेष्ठ सांगितली आहेत. त्यातून शरीरास कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, मॅग्रेशिअम, गंधक मिळते.
अतिशय कोरड्या जागेवरील मातीपासून तयार केलेल्या भांड्यात स्वयंपाक केल्यास रक्तदोष नाहीसे होऊन त्वचाविकार दूर होतात. पाणथळ जागेवरील मातीपासून तयार केलेली भांडी वापरल्यास कफविकार दूर होतात आणि दलदलीच्या जागेवरील माती वापरल्यास पचनसंस्था मजबूत होते. सामान्यतः राजघराण्यांमधून सोने व चांदीची भांडी आवर्जून वापरत, तरसर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात दगड, माती, तांबे व पितळेची भांडी वापरली जात असत. कधी काळी घरची श्रीमंती ही स्वयंपाकघरातील भांड्यांवरून ठरत असे. एखादे धातूचे भांडे चेमले तर ठोकून पूर्ववत केले जाई आणि फुटलेच तर त्याला डाग लावून पुन्हा वापरले जाई. मात्र काळाच्या ओघात तांबे- पितळ महाग झाल्याने तसेच लोखंडी भांड्यांना गंज येत असल्याने या सर्व भांड्यांची जागा स्टेनलेस स्टीलच्या आणि अॅयल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली. सध्याच्या वेगवान जीवनपद्धतीत (फास्ट लाईफस्टाईल)
नॉनस्टिक, उष्णतेमुळे न फुटणार्याच पायरेक्ससारख्या काचेच्या आणि ‘ओव्हन फ्रेंडली' सिरॅमिक्सच्या भांड्यामुळे स्वयंपाक करणे सोपे झाल्याने, घरातील जुनी भांडी एक तर ती अडगळीच्या खोलीत जाऊन पडत आहेत किंवा मोडीत निघत आहेत. मात्र ही भांडी म्हणजे केवळ स्वयंपाक रांधण्याचे साधन नसून तत्कालीन सामाजिक, आर्थिक इतिहास समजावून घेण्याचे एक माध्यमही आहे. अनेकदा या भांड्यांवरून कुटुंबाचा इतिहास समजतो. नवीन भांडे घेत असताना त्यावर आवर्जून नावव तारीखही नोंदवली जात असल्याने त्यावरून आपल्या कुळाचा इतिहास, तत्कालीन भाषेचा-लिपीचा विकास ज्ञात होतो.