Publish Date: Wed, 26 Aug 2026 (18:02 IST)
Updated Date: Wed, 26 Aug 2026 (18:08 IST)
अर्णवचं वय दहा वर्षांचं होतं. दरवर्षी रक्षाबंधनाला शाळेत जेव्हा सगळे मुलगे आपल्या बहिणीने बांधलेल्या रंगीबेरंगी राख्या दाखवून मिरवायचे, तेव्हा अर्णव शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहायचा. त्याला स्वतःची बहीण नव्हती. आई-बाबांना जेव्हा तो विचारायचा, "मला बहीण का नाही?", तेव्हा आई फक्त प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची.
या वर्षीच्या रक्षाबंधनालाही अर्णवचा चेहरा सुकला होता. तो घराबाहेरच्या बाकावर एकटाच बसून हाताच्या रिकाम्या मनगटाकडे पाहत होता.
तेवढ्यात त्यांच्या सोसायटीत नव्याने राहायला आलेल्या शेजारच्या घरातून पाच वर्षांची छोटी चिमुरडी, अनन्या, बाहेर आली. तिच्या हातात एक छोटीशी, रंगीबेरंगी धाग्याची राखी होती. ती रांगत-रांगत अर्णवजवळ आली आणि त्याच्या बाजूला बसली.
"अर्णव दादा, तू उदास का आहेस?" तिने तिच्या बोबड्या बोलात विचारलं.
अर्णवने आवंढा गिळत म्हटलं, "काही नाही ग अनन्ये, माझ्या मनगटावर बांधायला कोणाकडे राखीच नाहीये."
अनन्याने क्षणभर विचार केला आणि म्हणाली की दादा मी तुला राखी बांधेन पण...
पण काय अर्णवने विचारलं.
तेव्हा ती म्हणाली की मला सुद्धा तुला संध्याकाळी सायकल चालवायला शिकवावे लागेल. तू माझा दादा हो आणि माझ्यासोबत खेळत जा. आता सांग बांधू तुला राखी?
अर्णवच्या डोळ्यांतून टपकन पाण्याचे थेंब खाली सांडले. ज्या गोष्टीसाठी तो वर्षानुवर्षे हळहळत होता, ती इच्छा आज एका छोट्याशा निष्पाप मुलीने पूर्ण केली होती. त्याने लगेच आपला हात पुढे केला. अनन्याने अगदी कौतुकाने तिच्या चिमुकल्या हातांनी अर्णवच्या मनगटावर ती राखी बांधली.
अर्णवने लगेच खिशातून स्वतःचे आवडते चॉकलेट काढले आणि तिच्या हातात दिले. अनन्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. अर्णवला आज समजलं होतं की, नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही, तर काही नाती मनाच्या आणि प्रेमाच्या पक्क्या धाग्याने जोडली जातात.
त्या दिवशी एका भावाला त्याची बहीण मिळाली होती आणि एका चिमुरडीला तिचा रक्षक दादा!