एक असतो काऊ. एक असते चिऊ. काऊचं घर असतं शेणाचं. चिऊचं घर असतं मेणाचं.
एकदा काय होतं? एका वर्षी खूप मोठ्ठा पाऊस येतो आणि काऊचं घर जातं वाहून. चिऊचं घर तसंच राहतं.
मग काऊ काय करतो? तो येतो आपल्या चिऊताईकडे. दारावर टकटक करतो आणि म्हणतो:
काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे
काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाचं आंग पुसू दे
काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाची टिटी पावडर करू दे
काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला अंगा घालू दे
काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला गाई करू दे
असं सगळं करून मग एकदाची चिऊताई दार उघडते. कावळ्याला घरात घेऊन त्याला काय हवं-नको ते बघते. खायला-प्यायला देते.
खाऊन झाल्यानंतर काऊदादा काहितरी चघळायला लागतो. तर चिऊताई म्हणते
चिऊ - कडाम कुडुम कडाम कुडुम काय खातोस रे
काऊ - लग्नाची सुपारी मी खातो रे
चिऊ - मला दे मला दे मला दे जरा
काऊ - तू पण घे, तू पण घे , आता जातो मी घरा
असे म्हणून तो थोडीशी सुपारी चिऊलाही देतो आणि मग काऊ आपल्या घरी निघून जातो.