पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे
अन् पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे'
हळूच पाहावे पांघरूणातून
ओढूनिया अंगावर माया
निरखावी मग अंधारावर
जरतारी कशिद्याची किमया'
अन तुझिया हृदयाची धडधड
इवल्याश्या गालास कळावी
खोल, संथ श्वासांची चवरी
टाळूवरती सतत ढळावी
आशांच्या नवलाख कळ्यांनी
स्वप्नंवेल तव डवरून जावी
तुझ्याच अंगाचा अवयव मी,
अशीच काही जाणीव व्हावी
हव्याहव्याची हाव निवावी,
सुकेसुके गंगेत नहावे...