rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची संपूर्ण माहिती

Biography of Bahinabai Choudhary
, रविवार, 24 ऑगस्ट 2025 (10:45 IST)
बहिणाबाई यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी जळगावपासून 6 कि. मी. अंतरावरील असोदे गावातील प्रतिष्ठित महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. तीन भाऊ- घमा, गना आणि घना, तीन बहिणी- अहिल्या, सीता आणि तुळसा. वयाच्या तेराव्या वर्षीच बहिणाबाई चौधरींचा, जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. सासरी एकत्र कुटुंबात बहिणाबाईना सर्वांचा स्नेह लाभला.
ALSO READ: मराठी साहित्यिक, समाजसुधारक साने गुरुजींची संपूर्ण माहिती
पण अगदी तरुणपणीच त्यांना वैधव्य आले. सुरुवातीचे एकत्र कुटुंब विभक्त झाल्यावर आणि नव-याच्या मृत्युनंतर बहिणाबाईना अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली एक कन्या काशी आणि दोन पुत्र ओंकार आणि सोपान यांच्यावर चांगले संस्कार घडवले. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले.
 
घरातील आणि शेतातील कामे करता करता त्यांना काव्य सुचले आणि ते काव्य मराठी कवितेच्या प्रांगणात अजरामर ठरले. मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे. पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुसतीच जुनी नाही तर अनुभवांनी समृध्द आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हतेच. घराची चौकट आणि अगदीच झाले तर शेत अशा दोनच टप्प्यांत स्त्रियांचे जीवन बांधले गेले होते. अशावेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाटयाला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता. तो होता काव्याचा.
ALSO READ: बहुमुखी व्यक्तिमत्त्वाचे धनी प्रल्हाद केशव अत्रे यांचा जीवन परिचय
वर्षभरातील सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हेच माध्यम होते आणि तेच स्त्रियांनी निवडले. त्यामुळेच मराठीला समृध्द अशी स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा लाभली. स्त्रीगीतांची मराठीतील परंपरा समृध्द आहे आणि तिच्या अग्रणी आहेत अंगभूत काव्याचं लेणं लाभलेल्या बहिणाबाई चौधरी.
 
बहिणाबाईच्या कवितांतून आपल्याला निसर्ग भेटतो, नात्या-नात्यांतील परस्परसंबंध जाणवतो, स्त्रीविषयक दृष्टिकोन जाणवतो, उपदेशाचे देशी बोल जाणवतात, सहजसुंदर विनोदाची खोली जाणवते. त्यांच्या कवितांतून गद्य वाक्प्रयोग, बोली भाषेची नाना सुंदर वळणे, बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर आणि सरलता यांचा मिलाफ जाणवतो. त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशीच जाऊन भिडतो. वेडीवाकडी वळणं न घेता येणारी सहजसुंदर अशी बहिणाबाईची कविता आपल्याला शब्दांतून जाणवते.

बहिणाबाईच्या कवितांतून निसर्ग आपल्याला अनेक रुपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडीत निसर्गाची कितीतरी रुपं बहिणाबाईच्या कवितांतून भेटतात. बहिणाबाईचे आयुष्य शेती आणि घर अशा दोन टप्प्यांतले असल्यामुळे निसर्गविषयक काव्य करताना त्यातून आपोआपच आपल्याला शेतीशी संबंधित ब-याच घटनांचे चित्रण जाणवते. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या.
बहिणाबाईच्या काव्याच्या निमित्ताने जळगाव-धुळे जिल्ह्यातील अहिराणी बोली प्रकाशात येते. अहिराणीच्या बोलीभाषेचे स्वरूप या काव्यातून समजते. मराठी साहित्यात ज्या मोजक्या स्त्री साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती केली आहे, त्यापैकीच एक असणा-या बहिणाबाई चौधरी. पण अशिक्षित असूनही जे साहित्य त्यांनी निर्माण केले त्याला खरोखरच तोड नाही आणि हे जाणून घेण्याकरता तरी एकदा का होईना बहिणाबाईच्या काव्याचा आस्वाद घेतला पाहिजे. बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात 3 डिसेंबर 1951 रोजी मृत्यू झाला.

बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादा पेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही, कि कोणाला दोष देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानचे वेगळेपण आहे. बहिणाबाई चौधरींच्या नावारूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव देण्यात आले.
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sunday Special Healthy Breakfast दुधी भोपळ्याचे अप्पे