मुंबई- आविष्कार नाट्य संस्थेचे आधारस्तंभ आणि समांतर रंगभूमीवर रंगायन आस्थेचे संस्थापक सदस्य अरुण काकडे यांचे मुंबईत निधन झाले ते ८९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. गेले ६० वर्षाहून अधिक काळ ते मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. कोणत्याही वादात न पडता सकस नाटकं करता यावीत, यासाठी त्यांनी १९७१ साली ‘आविष्कार’ संस्थेची पायाभरणी केली. वयाची ८५ वर्षे ओलांडली तरी त्यांच्यामधील नाटकासाठी काम करण्याची ऊर्जा युवकाला लाजवेल अशी होती. आविष्कार ही संस्था त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळली.
आविष्कारने उभ्या केलेल्या छबिलदास चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले. अरुण काकडे हे नाटय़ चळवळीचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जायचे.