Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झुरळं घरात येऊच नये यासाठी करा 'हे' उपाय

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2023 (07:20 IST)
झुरळाचा पहिला अनुभव आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या कायम लक्षात राहणारा असतो. बऱ्याचदा हा अनुभव किळसवाणा आणि जवळजवळ भयानक असतो.
 
माझ्यासाठी तर हा अनुभव खरंच खूप वाईट होता. तेव्हा मी 5 किंवा 6 वर्षांचा असेन. मी आमच्या स्वयंपाकघरातून काचेची बाटली उचलली तर त्याला मागे झुरळ चिकटलं होतं. ते उडून माझ्या मानेवर बसलं.
 
मी भीतीने किंचाळत माझ्या हातातील काचेची बाटली खाली सोडली. याआधीही मी झुरळ पाहिलं होतं, पण असं इतक्या जवळून त्याचा अनुभव आला नव्हता.
 
मग मला झुरळांबद्दल एक प्रकारची किळस वाटू लागली.
 
मी माझ्या भावंडांना झुरळांच्या मिशा पकडून त्याच्याशी खेळताना पाहिलंय.
 
झुरळांचा तिरस्कार आणि भीती दूर करण्यासाठी मला अनेक वर्षे लागली. पुढच्या काळात मी त्यांना उचलण्याचा प्रयत्न करण्यासाठी धैर्य एकवटलं. पण त्यांच्या आकारामुळे बऱ्याचदा ते पळून जाण्यात यशस्वी व्हायचे.
पण आता माणसांनी झुरळांची भीती बाळगण्यात काही अर्थ नाही हे मला कळून चुकलंय.
 
झुरळ इतर कीटकांप्रमाणे रोग प्रसारित करत नाहीत, जसं की डास किंवा गोचीड. ते तुमच्या त्वचेला चिटकून राहत नाहीत किंवा तुमचं रक्तही शोषून घेत नाहीत.
 
आपलं रक्त शोषणाऱ्या आणि जगभर रोग प्रसारित करणाऱ्या सर्वात धोकादायक अशा डासांची आपल्याला कधीच इतकी किळस वाटत नाही.
 
पण जरा झुरळांचंच घ्या, आपल्याला भीती, किळस वाटते. पण हे असं का घडतं?
 
आपल्याला झुरळांची किळस का वाटते?
अरण्य पर्यावरण संशोधन संस्थेतील कीटकशास्त्रज्ञ ब्रोनॉय वैद्य म्हणतात की, त्यांची किळस वाटण्यामागचं एक कारण म्हणजे ते अतिशय दयनीय परिस्थितीत त्यांचं जीवन जगतात.
 
ते सांगतात, "साधारणपणे गलिच्छ परिसर, कचऱ्याची ठिकाणं, स्वच्छतागृह इत्यादी ठिकाणी झुरळ आढळतात. त्यामुळे त्याबद्दल किळसवाणी भावना निर्माण होते."
 
झुरळांमुळे रोग पसरतो अशी भीती प्राचीन ग्रीसमधील लोकांना वाटायची.
 
ब्रोनॉय वैद्य सांगतात, "प्राचीन ग्रीसमधील लोकांना, झुरळांमुळे आजार होण्याची भीती वाटायची. झुरळांमध्ये ट्रोपोमायोसिन नावाचं प्रोटीन असतं."
 
"झुरळाच्या विष्ठेत, त्वचेत आणि शरीराच्या इतर अवयवांमध्ये आढळणाऱ्या या प्रथिनामुळे माणसांना ऍलर्जी होते."
 
प्राचीन इजिप्शियन लोक झुरळांपासून बचाव करण्यासाठी ग्नम नावाच्या मेंढ्याचं डोक असलेल्या देवतेची पूजा करायचे. प्राचीन रोममधील लिनस द एल्डर या लेखकाने झुरळांच्या घृणास्पद स्वरूपाबद्दल लिहिलं आहे.
 
झुरळांची भीती किंवा तिरस्कार वाटणं याला कटसरीडाफोबिया म्हणतात.
 
पृथ्वीवर झुरळांच्या 1300 प्रजाती
ब्रोनॉय वैद्य सांगतात, आपल्या घरांमध्ये सर्वात जास्त पेरिप्लेनेटा अमेरिकाना ही झुरळांची प्रजाती पाहायला मिळते.
 
ते पुढे सांगतात, "पण, झुरळांच्या जवळपास 1,300 प्रजाती आहेत. त्यापैकी फक्त 30 प्रजाती त्यांच्या उपजीविकेसाठी माणसांवर अवलंबून आहेत. बाकीच्या जंगलांसारख्या निर्जन भागात आढळतात."
अन्नामलाई विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक असलेले डॉ. सेल्वामुथुकुमारन थिरुनावुकारासू म्हणतात की, पृथ्वीवर विविध संकटं आली तरीही झुरळांनी त्यातून स्वतःचा बचाव केलाय.
 
डॉ. सेल्वामुथुकुमारन थिरुनावुकारासू पुढे सांगतात की, "350 दशलक्ष वर्षांपूर्वी कीटक पृथ्वीवर आले. त्यानुसार मग झुरळं देखील 300 ते 350 दशलक्ष वर्षांपासून पृथ्वीवर आहेत."
 
"माणसाचं सांगायचं तर, आपलं पृथ्वीवरील अस्तित्व सुमारे 10 लाख वर्षांपासून आहे. पृथ्वीने चार मोठे प्रलय अनुभवले आहेत. मॅमॉथ आणि डायनासोरसारखे प्राणी नामशेष झाले असले तरी झुरळं मात्र टिकून आहेत."
 
निसर्गात झुरळांची भूमिका काय आहे?
पर्यावरणाच्या दृष्टीने वाळवी जशी महत्त्वाची आहे, तशीच जंगली झुरळंही महत्वाची आहेत.
 
ब्रोनॉय वैद्य सांगतात, "ते मृत आणि कुजलेल्या गोष्टी खातात. पर्यावरणाच्या पोषण चक्रात ते महत्त्वाची भूमिका बजावतात."
 
"जेव्हा एखादा जीव मरतो तेव्हा त्याच्या शरीराचा क्षय झाला पाहिजे. यामध्ये अनेक प्रक्रियांचा समावेश असतो. यामध्ये जंगली झुरळांचाही महत्त्वाचा वाटा आहे."
 
टाकाऊ पदार्थांचे कंपोस्टमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत कीटकांची मोठी भूमिका असते.
 
डॉ. सेल्वामुथुकुमारन थिरुनावुकारासू सांगतात, "सर्वभक्षी झुरळं देखील निसर्गात महत्वाची भूमिका बजावतात."
 
"हे कीटक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहेत. या अन्नसाखळीत जर अडथळा निर्माण झाला तर पृथ्वीवरील अन्नाच्या रेणूंचं अभिसरण थांबेल."
 
"त्यातून विकसित वनस्पती आणि प्राण्यांना अन्न न मिळण्याचा धोका उद्भवू शकतो."
 
झुरळांमुळे माणसांमध्ये रोगाचा प्रसार होतो का?
काही लोकांना झुरळांची अॅलर्जी असते.
 
सेल्वामुथुकुमारन सांगतात की, त्यांच्यामुळे मलेरियासारखा रोग प्रसार होण्याची शक्यता नसते.
 
"मलेरिया, डेंग्यू हे रोग डासांमुळे पसरतात. कॉलरा हा माशांमुळे पसरतो. पण झुरळांमुळे माणसांमध्ये कोणताही विशिष्ट आजार पसरत नाही."
पण त्याचवेळी, झुरळ कुजलेले पदार्थ खातात. हे कुजलेले पदार्थ सूक्ष्मजीवांनी समृद्ध असतात. साहजिकच झुरळ आपल्या अन्नावर फिरले तर हे सूक्ष्मजीव त्यात मिसळतात आणि आपल्याला आजार होण्याची शक्यता निर्माण होते.
 
झुरळांचा घरात होणारा शिरकाव कसा रोखाल?
ज्या ठिकाणी अन्नपदार्थ आणि आर्द्र वातावरण असतं, त्या ठिकाणी झुरळं वाढतात.
 
त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता राखणं आवश्यक असल्याचं सेल्वामुथुकुमारन आवर्जून सांगतात.
 
जेवण झाल्यानंतर भांडी ताबडतोब स्वच्छ करा. उरलेलं खरकटं अन्न लगेच फेकून द्या.
घरात कचरा साचणार नाही याची काळजी घ्या.
तुम्ही वापरत असलेली कचरापेटी बंद असावी.
ही कचरापेटी रात्रीच्या वेळी घरात ठेवण्याऐवजी घराबाहेर ठेवा.
झुरळं खिडक्या, दरवाजाचे गज आणि छिद्रातून आत प्रवेश करू शकतात, त्यामुळे गरज नसेल तर ते सीलबंद करा.
घरात पुठ्ठ्याचे बॉक्स असतील तर लक्ष द्या. हे बॉक्स लाकडाच्या लगद्यापासून बनवले जातात. हे झुरळांचं अन्न आहे.
भांडी घासण्यासाठी असलेल्या सिंकच्या पाईप मधूनही झुरळ घरात येऊ शकतात. म्हणून, त्या पाईप स्वच्छ ठेवा. सिंक रात्री झाकून ठेवा.
रात्रीच्या वेळी सिंक ओलं राहणार नाही याची काळजी घ्या, कारण झुरळं अगदी थोड्या पाण्यातही जिवंत राहू शकतात.
घरामध्ये असलेली झुरळं बाहेर घालवण्यासाठी स्प्रे आणि जेलचा वापर केला जातो. पण या वापराने माणसांच्या जीवालाही धोका निर्माण होतो.
 
त्यामुळे झुरळं घरात शिरल्यानंतर आपल्यासाठी घातक ठरणारी रसायनं वापरण्याऐवजी झुरळं येऊ नयेत यासाठी उपाययोजना करणं चांगलं राहील असं सेल्वामुथुकुमारन सांगतात.
 



Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

खजुराचा हलवा रेसिपी

Children's Day 2024 Wishes In Marathi बालदिनाच्या शुभेच्छा

Career in BA Astrology: ज्योतिष अभ्यासक्रम मध्ये बीए

World Diabetes Day 2024 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो, प्रकार, कारणे आणि उपचार जाणून घ्या

Saree Styling : साडी स्टायलिंगसाठी या 8 खास टिप्स तुमचे व्यक्तिमत्व बदलतील

पुढील लेख
Show comments