डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ
"डॉक्टर माझ्या लग्नाला तीन वर्ष झालीयेत आता. माझं वय 32 आहे. आम्हाला परदेशी जॉबची खूप चांगली ऑफर मिळालीय दोघांनाही. त्यामुळे अजून तीन वर्ष प्रेगनन्सीचा विचार नाही करता येणार, पण घरी सगळेजण खूप मागे लागलेत प्रेगनन्सीसाठी. मला हा चान्स नाही सोडायचाय. काय करू काही कळत नाहीये."
ईशा खूपच टेन्शनमध्ये होती.
ईशासारख्या अनेक मुली आहेत ज्यांच्यासमोर करिअर आणि कौटुंबिक आयुष्यातला समतोल साधताना असे पेच येतात. करिअरमधल्या संधी स्वीकारताना आपण आयुष्यातली मातृत्वाची संधी गमावणार नाही ना, अशी धाकधूक वाटत राहते.
अशा अनेक मुलींसाठी विज्ञानाच्या सहाय्याने काही नवीन तंत्रं, उपचार उपलब्ध आहेत. ईशाच्याच परिस्थितीचा विचार केला तर तिच्यासाठी Egg Freezing म्हणजे स्त्रीबीजे गोठवून ठेवणे हा उपाय अतिशय उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतो.
काही वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना माहीतही नसणारी ही गोष्ट आता अनेक मुली अवलंबत आहेत. काही सेलिब्रिटींनी Egg Freezing बद्दल बोलल्यामुळे किंवा ही पद्धत अवलंबल्यामुळेही त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. म्हणूनच स्त्रीबीजं गोठवून ठेवण्याच्या पर्यायाबद्दल अधिक विस्ताराने जाणून घेऊया.
भारतीय स्त्रियांची जननक्षमता तिशीनंतर कमी होण्यास सुरुवात होते आणि पस्तिशीनंतर ती झपाट्याने कमी होते.
स्त्रीच्या जननक्षमतेसाठी अंडाशय म्हणजे ओव्हरीत पुरेशी स्त्रीबीजे असणे अत्यावश्यक आहे. मुलगी जन्माला आल्यापासून पाळी सुरू होइपर्यंत या अविकसित स्त्रीबीजांची संख्या भरपूर असते. नंतर मात्र ही संख्या कमी होण्यास सुरुवात होते.
साधारणपणे स्त्रीची पाळी थांबेपर्यंत गर्भाशयात असलेली स्त्रीबीजे तिला पुरतात, पण काही स्त्रियांमध्ये ही स्त्रीबीजांची संख्या खूप झपाट्याने कमी होते आणि त्यामुळे जननक्षमता उतरणीला लागते. भारतीय स्त्रियांमध्ये जननक्षमता कमी होण्याचं वय हे पस्तीस वर्षं आहे.
Serum AMH ही तपासणी आपल्याला स्त्रीच्या जननक्षमतेची नेमकी कल्पना देते. AMH म्हणजे antimullerian hormone. हे हार्मोन स्त्रीबीजांची संख्या चांगली राहावी म्हणून धडपडत असते. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी झाले की स्त्रीबीजं वेगाने कमी होतात.
त्यामुळे AMH चे प्रमाण योग्य असणे हे स्त्रीच्या जननक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. कमी झालेल्या AMH लेव्हलमुळे गर्भधारणा अवघड होते तसंच वारंवार गर्भपात होण्याचे प्रमाण वाढते.
पाळी बंद होण्याआधी जवळपास तेरा ते चौदा वर्षं AMH कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे तिशीच्या आसपास स्त्रियांनी गर्भ धारणेचा निर्णय घेणे संयुक्तिक ठरते. यामध्ये काही प्रमाणात जनुकीय कारणे ही असू शकतात. AMH पातळी कमी झालेल्या स्त्रियांची पाळी इतर स्त्रियांच्या मानाने लवकर थांबते. तसेच AMH कमी झालेल्या स्त्रियांमध्ये स्त्रीबीजांची गुणवत्ता व दर्जा खालावलेला असतो .त्यामुळे गर्भ रुजणे अवघड होऊन बसते तसेच गर्भपाताची शक्यता वाढायला लागते.
स्त्रीबीज गोठवण्याचा निर्णय कधी घेतला जातो?
वय वय वाढत चालले आहे पण ज्यांना गर्भधारणेचा निर्णय घेणे शक्य नाही, अशा स्त्रिया त्यांची स्त्रीबीजे IVF चे तंत्रज्ञान वापरून गोठवून ठेवू शकतात. त्यामुळे स्त्री बीजांची संख्या आणि दर्जा दोन्ही आपण चांगले ठेवू शकतो.
ज्यावेळी स्त्रीची इच्छा असेल तेव्हा त्या स्त्रीबीजांचा वापर करून गर्भधारणा करू शकतात.
स्त्रीचे लग्न झाले असेल, तर स्त्री बीजांच्याऐवजी तयार गर्भसुद्धा गोठवले जाऊ शकतात. याला एम्ब्रियो फ्रिझिंग (embryo freezing) म्हणतात.
या प्रक्रियेसाठी आधी स्त्रीच्या सगळ्या तपासण्या करून प्लॅन ठरवला जातो. यामध्ये egg Freezing करायच्या आधी स्त्रीच्या पालकांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी समजावून सांगणे सुद्धा गरजेचे आहे. ही प्रक्रिया थोडी जास्त काळ चालणारी, खर्चिक असते.
egg Freezing चा निर्णय एकहाती घेणे हे सुद्धा तरुण मुलीकरता सोपे नाही. त्यामुळे पालकांचा पाठिंबा आवश्यक असतो. यासाठी त्यांचे समुपदेशन आवश्यक ठरते.
कशी असते एग फ्रीझिंगची प्रक्रिया?
Egg Freezing साठी पाळीच्या पहिल्या दिवसापासून इंजेक्शन्सला सुरुवात होते. ही वेगवेगळी इंजेक्शन्स बारा ते पंधरा दिवसांपर्यंत चालू राहतात. सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा स्त्रीबीजे मिळावीत अशी अपेक्षा असते. पण हे प्रत्येक स्त्रीवर अवलंबून आहे. स्त्रीबीजे पुरेशी परिपक्व झाली की अजून एक इंजेक्शन दिले जाते. मग बरोबर पस्तीस तासांनी भूल देऊन सोनोग्राफीच्या साहाय्याने ही स्त्रीबीजे काढून घेतली जातात. नंतर मायक्रोस्कोप मधून तपासली जातात आणि मग ही स्त्रीबीजे गोठवली जातात.
ही गोठवलेली स्त्रीबीजे कितीही काळ तशीच राहू शकतात. स्त्रीला जेव्हा गर्भधारणा हवी आहे तेव्हा thawing म्हणजे स्त्रीबीजे पूर्ववत करून शुक्राणूंशी संयोग घडवला जातो आणि गर्भ तयार केले जातात. हा खरंतर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा चमत्कारच आहे.
या सगळ्या माहितीचा उपयोग करून तरुण मुली आणि जोडपी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. आजकाल लग्न उशीरा होताहेत. तरुण जोडप्यांची लगेच मूल होऊ देण्याची इच्छा नसते. पण अती उशीर हानिकारक ठरू शकतो. वयाची तिशी गाठण्याच्या आत गर्भधारणा प्लॅन करणे उत्तम, पण काही कारणाने ते शक्य नसेल तर मग निदान AMH ही तपासणी करून जननक्षमतेचा अंदाज घेणे संयुक्तिक आहे.
लगेच गर्भधारणा शक्य नसेल तर Egg Freezing किंवा embryo freezing चा निर्णय वेळेवर घेणे हा नंतरचे मनस्ताप टाळणारा निर्णय ठरू शकतो. गर्भधारणेच्या बाबतीत स्त्रीचे वय हा सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक आहे ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जोडप्यांनी वजन नियंत्रणात ठेवणे, सिगारेट, दारू,तंबाखू (ई सिगारेट,हुक्का अश्या कोणत्याही फॉर्ममध्ये) अशी व्यसने टाळणे,योग्य आहार या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक.
शेवटी एक महत्वाची गोष्ट...गर्भधारणा वेळेवर होणे हे महत्त्वाचे आहेच पण एक कोवळा जीव या जगात आणण्याधी पतीपत्नींचे नाते परिपक्व आहे ना आणि भोवतालची परिस्थिती अनुकूल आहे ना हे तपासून बघणे या गोष्टींना पर्याय नाही.