Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जागतिक महिलादिनानिमित्त : ती फुलराणी...

जागतिक महिलादिनानिमित्त : ती फुलराणी...
, शनिवार, 7 मार्च 2020 (14:08 IST)
हिरवेहिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या खालीचे
त्या सुंदर खालीवरती
फुलराणी ही खेळत होती...
 
वर्तमानपत्रातील (नागपूर) हिंगणघाटच्या फुलराणीचा संघर्ष... मन हेलकावणारी बातमी वाचता वाचता बालकवींच्याकवितेच्या ओळी एका वेगळ्या अर्थाने मनात उमटत होत्या. आज स्त्रियांच्या बाजूने निर्माण केलेले असंख्य कायदे, संघटना, उपक्रम या स्त्रीवादी कायद्यांच्या मखमलीवर ही फुलराणी नक्की खेळत आहे की जळत आहे, असा प्रश्न तितक्यात आवेशाने उभे राहिले.
 
स्वप्नवत वाटणारी ही कविता प्रत्क्षात कधी उतरणार, याची वाट पाहण्यापलीकडे स्त्रीकडे काही उरलेच नाही. सध्या घडत असलेल्या वर्तमानपत्रातील बातम्या पाहाता एकीकडे स्त्रियांच्या परिस्थितीत होणारी अमूलाग्र प्रगती आणि त्याचबरोबर तिचा होणारा र्‍हास पाहाता फुलराणी ही जळत होती या ओळी अधिक साथ ठरल्या असत्या. कारण प्राचीनकाळी अग्निचा शोध लागला तेव्हापासून गुहेमध्ये अग्नी जळत ठेवण्याची जबाबदारी स्त्रियांवर होती. कालांतराने चुलीभोवती तिचे जीवन स्थिर झाले. ते आजच्या आधुनिक काळातही ती गॅसभोवती आजही घुटमळत आहे. थोडक्यात काय तर स्वयंपाक घर आणि स्त्री हे समीकरणच समाजाने ठरवून टाकले आहे. शतके बदलत राहिली, पण स्त्री वेगवेगळ्या रुपाने जळतच राहिली.
 
जरी स्त्रिया आज मोठोठ्या पदावर काम करीत असल्या, अगदी राजकारणापासून ते भारतीय सेनेपर्यंत तिने आपली मजल मारली असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र तिच्यावर असलेली कुटुंबाची स्वयंपाक घरातील अग्नी तेवत ठेवायची जबाबदारी कायम आहे. सती बळीची जागा हुंडाबळीने घेतली. गर्भजल परीक्षण, विनयभंग, बलात्कार अशा अनेक रुपाने स्त्रिया आजही सती जात आहेत. आजची परिस्थिती पाहाता असे वाटते की, मग स्त्री सुधारणावादी कायद्यांनी केले काय? तर केवळ अन्याय अत्याचाराचे मुखवटे बदलले आणि स्त्री बाबतचा पारंपरिक दृष्टिकोन, तिचा छळ, अपमान कायम राहिला. स्त्रियांच्या बाजूने असंख्य कायदे, संघटना असल्या तरी तिचे प्रश्न कायम आहेत. निष्ठावान विवाहित स्त्रियांचे   प्रश्न आहेत. घटस्फोट घेतला नाही तर छळ आहे. प्रेम मान्य केले तर ठीक नाही तर फुलराणीप्रमाणे जळणे आहे. म्हणजे स्त्रियांच्या बाजूने मखमलीचे कायदे असले तरी ती वेगवेगळ्या रुपाने जळत आहे.
 
लागेना डोळ्याशी डोळा-काय जाहले फुलराणीला? या काव्यपंक्तीप्रमाणे सारेच कावरे बावरे होतात. जेव्हा प्रत्येकाच्या फुलराणीला घरी यायला उशीर होतो, एकीकडे भाषणातून स्त्रियांबद्दलचे आदराचे शब्द, तिच्या कामगिरीचे शब्द, कौतुकाचे शब्द गायीले जातात. मात्र प्रत्यक्षात हे सर्व भाषणापुरतेच राहातात.
 
मोबाइलच्या इंटरनेटने तर अश्लिलतेचा कळस गाठला अहे. आणखीन किती निर्भया, फुलराणी बनवेल माहीत नाही. आता यावर पूर्ण बंदी आणण्याचा प्रयत्न दिलासा देणारा वाटत आहे. पण तो किती यशस्वी होईल? शासनाचे अशा गुन्ह्यांबाबत लवचिक धोरण यामुळे प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या अधाशी नजरा टपलेल असतात. ना नात्याचा, ना वयाचा ना माणुसकीचा विचार असतो. त्या नराधमांना हवी असते ती शिकार फक्त शिकार आणि म्हणून अनेक चिमुरड्यादेखील उमलण्याच्या आधीच खुडत आहेत.
 
स्त्री ही कुणाची तरी आई, कुणाची बहीण, पत्नी, मुलगी असते. या सर्व भूमिकेतून आपल्या पुरुष असलेल्या मुलास, भावास व पतीस सांगावे लागेल. जसा आमचा राखतोस तसा आमच्यासारख्या स्त्रियांदादेखील मान राख. आता ही जबाबदारीदेखील स्त्रियांवरच आली आहे. 
 
बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा नुसता हवेत नको तर प्रत्येकाच्या अंतरंगात असणे गरजेचे आहे. या देशात घडत असलेल घटना पाहताना बेटी कैसे बचाएंगे हाच मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. एकतर्फी प्रेम, जबरदस्तीचे प्रेम, आपल्याला न मिळालेले प्रेम, दुसर्‍यालादेखील मिळू देणार नाही, अशा संस्कारांचा आमचा देश नाही. मग का होत आहे हे सगळे? आमची संस्कृती बदलत चालली आहे? त्यामागे प्रेम असते, दुसरच्या सुखात स्वतःचे सुख शोधायचे असते. हे विचार गेले कुठे?
 
जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने महिलांचे एकत्रिकरण, सबलीकरण, आदरीकरण, आनंद, उत्साह, पारितोषिके, सन्मान, गौरव, पुरस्कार यामुळे दरवर्षी महिला दिन प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा वाटतो. मरगळलेल्या स्त्रीत्वाला एक उजाळा देण्यासाठी हा दिवस प्रेरक ठरेल. पण हे केवळ याच दिवसापुरते नसावे. आपल्या नात्यातील पुरुष वर्गाला जर स्त्रीविषयक चांगले संस्कार मिळाले तर निश्चितच हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या, मारहाण, शिवीगाळी, पुरुषप्रधान संस्कृतीतील मुस्कटदाबी थांबण्यास निश्चितच हातभार लागेल. या हिला दिनाच्या दिवशी एक आशा करू या की फुलराणी जळणार नाही तर खुलणारी, खेळणारी होईल आणि मग त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत होती... या ओळी सार्थ ठरतील. 
 
प्रा. डॉ. वंदना भानप

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोकरी सोडून ग्राहकसेवा