उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यात आले आहे. रेल्वेच्या हद्दीत जानेवारी २०२१ पासून जुलै २०२२ पर्यंत विविध प्रकारचे एकूण १४ हजार ३३४ गुन्हे घडले. जानेवारी – डिसेंबर २०२१ या काळात विविध प्रकारच्या सहा हजार ७१९ गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२२ मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढून सात हजार ६१९ वर पोहोचले आहे. एकीकडे गुन्ह्यांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे त्यांची उकल करण्याचे प्रमाण मात्र कमी आहे.
करोनापूर्व काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेतून ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करीत होते. करोनाकाळात निर्बंधांमुळे प्रवाशांची संख्या कमी झाली. निर्बंध शिथिल होताच प्रवासी संख्या वाढत गेली. त्यामुळे लोकल गाड्यांना पूर्वीप्रमाणेच गर्दी होऊ लागली. या गर्दीचा फायदा घेत फलाट, पादचारी पूल आणि लोकल गाड्यांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले. चोरांनी प्रवाशांचे मोबाईल, पाकिट, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असलेल्या बॅगांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. तर गर्दी नसलेल्या ठिकामी महिलांची छेडछाड, विनयंभगाबरोबरच चोरीच्या उद्देशाने मारहाणीच्याही घटना घडू लागल्या आहेत.