राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून ३१ बालकांपैकी १९ बालकांना शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या २ पालकांसह जिल्हा रुग्णालय नाशिक येथून फोर्टीस हॉस्पिटल,मुलुंड, मुंबई रवाना झाले आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक डॉ. पुना गांडाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून केले आहे,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ.कपिल आहेर,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किशोर श्रीवास,निवासी वैद्यकिय अधिकारी तथा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ.प्रशांत खैरे उपस्थित होते. प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, महिला व बाल रुग्णालय, मालेगाव येथे २ डी इको शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरात संशयित ह्दयरुग्ण असलेल्या ९० बालकांची २ डी इको तपासणी करण्यात आली. त्यात ३१ बालकांना हदयशस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे आढळले. या ३१ बालकापैकी १९ बालकांना पुढील उपचारासाठी फोर्टीस हॉस्पिटल,मुलुंड,मुंबई येथे पाठविण्यात आले असून उर्वरीत बालकांना टप्प्या टप्प्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, असेही डॉ.थोरात यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. या उपक्रमासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हितेश महाले, जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिकचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक दिपक चौधरी, फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड मुंबईच्या उत्तर महाराष्ट्राच्या मार्केटिंग मॅनेजर अर्चना मेतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.